Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरसाहित्यगंध

पाहुणे येती घरा, तोचि दिवाळी-दसरा..!

डॉ. राजेश काळे ‘राजस’ ता. जिल्हा नागपूर

0 6 3 8 4 0

पाहुणे येती घरा, तोचि दिवाळी-दसरा..!

बदलत्या काळात हरवत चाललेला पाहुणचार आणि माणुसकीचा ओलावा!

‘पाहुणे येती घरा, तोचि दिवाळी-दसरा!’ ही एक जुनी म्हण. पूर्वीच्या काळात या म्हणीला केवळ शब्दांचा अर्थ नव्हता, तर ती प्रत्येक घराच्या जगण्याचा एक संस्कार होता. पाहुणे येणे म्हणजे घरात आनंद येणे, घराला चैतन्य येणे आणि माणसांच्या भेटीतून नात्यांना नव्याने उजाळा मिळणे. पण आज ही म्हण केवळ जुन्या आठवणींच्या कप्प्यात जाऊन बसली आहे. पाहुणचाराची ती परंपरा, तो आपलेपणा, तो जिव्हाळा आणि माणुसकीचा ओलावा हळूहळू लुप्त होत चालला आहे.

एक काळ असा होता की, कुणाच्या घरी जायचे असेल तर, आधी फोन करून परवानगी घेण्याची गरज नव्हती. अचानक दारात उभे राहिलो तरी घरातील मंडळींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहायचा. ‘अरे वा! आज कसे काय येणे केले?’ या एका वाक्यात किती आपुलकी असायची! पाहुण्यांचे स्वागत अगदी मनापासून व्हायचे. पाय धुण्यासाठी पाणी, प्यायला गूळपाणी, त्यानंतर चहा, नाश्ता… घरात जे असेल ते प्रेमाने समोर यायचे. पदार्थांची रेलचेल नसायची, पण आग्रहात आणि आदरात कुठलीही कमतरता नसायची.

पाहुणे निघण्याची तयारी करू लागले की, ‘अहो, एवढ्यात कुठे निघालात? थोडा वेळ बसा ना!’ असा आग्रह सुरू व्हायचा. पाहुण्यांना थांबवण्याची जणू स्पर्धाच असायची. निघताना हातात काहीतरी दिल्याशिवाय त्यांना जाऊ द्यायचे नाही. घरातील सवाष्ण स्त्री असेल तर तिच्या हातात ब्लाऊजपीस, थोडे पैसे ठेवले जायचे. कपाळाला कुंकू लावल्याशिवाय उंबरठा ओलांडू दिला जात नसे. घरातील थोरामोठ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले जायचे. या सगळ्या गोष्टी केवळ रीतिरिवाज नव्हत्या, तर त्या आपल्या संस्कृतीतील प्रेम, आदर आणि सन्मानाचे प्रतीक होत्या.

पाहुण्यांना निरोप देण्याची पद्धतही किती सुंदर होती! घरातील कुणीतरी त्यांना बाहेरपर्यंत सोडायला यायचे. शक्य असेल तर बसस्थानक किंवा रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचवायला जायचे. बस किंवा रेल्वे सुरू होऊन पाहुणे डोळ्यांच्या आड होईपर्यंत तिथेच थांबायचे. जाताना सोबत शिदोरी द्यायचे. त्या शिदोरीत पदार्थांपेक्षा प्रेम जास्त असायचे. पाहुणे निघून गेल्यावर घर रिकामे झाल्यासारखे वाटायचे आणि घरी परतताना पापण्या जड झालेल्या असायच्या. निरोपातही एक भावनिक ओलावा असायचा.

पण काळ बदलला… माणूस बदलला… आणि त्याचबरोबर माणसांच्या भेटीगाठींचे अर्थही बदलले. हळूहळू माणूस अधिकाधिक व्यस्त होत गेला. काम, व्यवसाय, नोकरी, स्पर्धा, जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या विश्वात रमण्याची सवय वाढत गेली. याच धावपळीत माणूस आपल्या माणसांपासूनच दूर लोटला गेला. नाती टिकून राहिली, पण त्यातील जिव्हाळा कमी झाला. भेटीगाठी कमी झाल्या आणि औपचारिकता वाढली.

आता कुणाकडे गेलो तर थोड्याच वेळात परतण्याची घाई असते. पूर्वी पाहुण्यांना थांबवण्यासाठी आग्रह व्हायचा, आता पाहुणे निघण्याची वाट पाहिली जाते, असे वाटू लागते. नमस्कार, पाय धुण्यासाठी पाणी, गूळपाणी, चहा-नाश्ता, आग्रह या गोष्टींचे स्वरूप बदलले आहे. चहा किंवा नाश्ता मिळेलच याची अपेक्षाही ठेवू नये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उलट, ‘पाणी घेणार का? चहा देऊ का?’ असा प्रश्न आधीच विचारला जातो. पाहुण्यांनी उत्तर द्यायला क्षणभर उशीर केला तरी तो नकार समजून विषय संपवला जातो. पाहुणे निघाले की त्यांना थांबवण्याऐवजी ‘बरं, चला मग!’ एवढेच औपचारिक शब्द कानावर पडतात. पूर्वी उंबरठ्यापर्यंत सोडायला येणारी माणसे आता दरवाज्यापर्यंतही येत नाहीत. आपण घराबाहेर पडलो की दार बंद! ना रामराम, ना नमस्कार, ना बाय-बाय! निरोप देण्याचे संस्कारही जणू काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

कधी कधी तर मनात विचार येतो, आपण निघून गेल्यानंतर घरात काय चर्चा सुरू होत असेल? ‘किती वेळ बसले होते!’, ‘लवकर जायला हवे होते!’ किंवा ‘बरं झालं गेले, नाहीतर उगाचच चहा-नाश्त्याची उठाठेव करावी लागली असती!’ अशी कुजबुज तर होत नसेल ना? अर्थात, प्रत्येक घर असेच आहे असे नाही; आजही अनेक घरांमध्ये पाहुणचाराची परंपरा जपणारी माणसे आहेत. पण एकंदर बदलणारी मानसिकता नक्कीच विचार करायला लावणारी आहे.

याला काही अंशी परिस्थितीही कारणीभूत आहे, हे मान्य करावेच लागेल. आज घरातील सर्वच मंडळी नोकरी – व्यवसायानिमित्त बाहेर असतात. घरात कुणीच नसेल तर पाहुण्यांचे स्वागत करणार कोण? सुट्टीच्या दिवशी प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे नियोजन असते. कुणाला बाहेरगावी जायचे असते, कुणाला खरेदी करायची असते, तर कुणाला स्वतःसाठी वेळ काढायचा असतो. त्यामुळे आज कुणाकडेही जाण्यापूर्वी त्यांची संमती घेणे आवश्यक झाले आहे. फोन करून विचारावे लागते, ‘यायला चालेल का?’ त्यांनी हो म्हटले तरच जायचे, अन्यथा नाही. खरे तर यात गैर काहीच नाही. दुसऱ्याच्या वेळेचा आणि वैयक्तिक आयुष्याचा आदर करणे हीदेखील चांगली गोष्ट आहे. पण प्रश्न परवानगी घेण्याचा नाही, तर त्या परवानगीमागे असलेल्या भावनेचा आहे. पूर्वी अचानक आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आनंदाने व्हायचे; आज ठरवून आलेल्या पाहुण्यांनाही कधी कधी औपचारिकतेपलीकडे काही मिळत नाही. मग फरक नेमका कुठे पडला?

आज माणसाकडे साधनांची कमतरता नाही, पण वेळेची कमतरता आहे, असे तो सांगतो. मात्र याच माणसाला फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या समाजमाध्यमांवर तासन्‌तास घालवायला वेळ असतो. कुणाचा वाढदिवस असेल तर ‘Happy Birthday’, कुणाला यश मिळाले तर ‘Congratulations’, कुणाचे निधन झाले तर ‘RIP’ किंवा ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ लिहायला क्षणाचाही विलंब होत नाही. शेकडो संदेशांना प्रतिसाद द्यायला वेळ मिळतो; पण आपल्या जवळच्या माणसाला प्रत्यक्ष भेटायला, दोन प्रेमाचे शब्द बोलायला मात्र वेळ मिळत नाही. मोबाईलच्या पडद्यावर आपण शेकडो लोकांशी जोडलेलो आहोत; पण प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या माणसांपासून तुटत चाललो आहोत. ‘आभासी जगात आपले मित्र वाढत आहेत आणि वास्तव जगात आपलेपणा कमी होत आहे’. एखाद्या पोस्टला मिळणाऱ्या शेकडो लाईक्सपेक्षा एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधानाचे हास्य कितीतरी मोलाचे असते, हे आपण विसरत चाललो आहोत.

पूर्वी घरात पाहुणे आले की, घरातील लहान मुलांनाही त्यांचा नमस्कार करायला शिकवले जायचे. मोठ्यांशी कसे बोलावे, पाहुण्यांना कसा मान द्यावा, निरोप कसा द्यावा, हे संस्कार नकळत रुजवले जायचे. आज आपण मुलांना डिजिटल शिष्टाचार शिकवतो, पण प्रत्यक्ष भेटीत माणसांशी कसे वागावे, हे शिकवायला विसरत आहोत की काय, असे वाटते. एक म्हण आहे, ‘अतिथी देवो भव!’ याचा अर्थ प्रत्येक पाहुण्याला देव मानून त्याची सेवा करावी, असा केवळ धार्मिक संदर्भ नाही; तर आपल्या दारात आलेल्या माणसाला सन्मान, प्रेम आणि आपलेपणा द्यावा, हा त्यामागचा खरा भाव आहे. पाहुण्याला पंचपक्वान्नांचे ताट वाढणे आवश्यक नाही; पण दोन प्रेमाचे शब्द, एक हसरा चेहरा आणि थोडासा वेळ दिला तरी पुरेसे आहे.

कारण पाहुणचार हा पदार्थांच्या संख्येवर मोजला जात नाही, तो मनाच्या श्रीमंतीवर मोजला जातो. आजही आपण आपल्या जुन्या आठवणी सांगतो. ‘अमुक काकांकडे गेलो होतो, किती छान स्वागत केले होते!’ ‘तमुक मावशीने जाताना किती आग्रहाने शिदोरी दिली होती!’ या आठवणी आजही आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात. कारण त्या आठवणींमध्ये माणसे आहेत, त्यांचे प्रेम आहे, त्यांचा जिव्हाळा आहे. घर मोठे होते म्हणून ते सुंदर नव्हते; तर त्या घरातील माणसांची मने मोठी होती म्हणून ते घर आपले वाटायचे.

आता काळ बदलला आहे, हे आपण नाकारू शकत नाही. प्रत्येकाने प्रत्येकासाठी आपला वेळ मोकळा ठेवावा, अशी अपेक्षाही अवास्तव आहे. पण बदलत्या काळाबरोबर आपले संस्कार, आपुलकी आणि माणुसकीही बदलायला हवी का? नक्कीच नाही! कुणाकडे जाण्यापूर्वी परवानगी घ्या, पण गेल्यावर मनमोकळेपणाने भेटा. वेळेची मर्यादा ठेवा, पण नात्यांची मर्यादा आखू नका. पाहुण्यांना चहा देता आला नाही तरी चालेल, पण एक ग्लास पाणी आणि प्रेमाचे दोन शब्द नक्की देता येतात. बाहेरपर्यंत सोडता आले नाही तरी, दारात उभे राहून हसतमुखाने निरोप देता येतो. कारण या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मोठी नाती जपली जातात.

शेवटी एवढेच वाटते… घराला मोठे बनवतात त्या भिंती नाहीत, तर त्या घरात राहणारी माणसे आणि त्यांच्या मनातील आपुलकी असते. घरात किती खोल्या आहेत यापेक्षा त्या घरात किती माणसांसाठी जागा आहे, हे अधिक महत्त्वाचे! पाहुणे येणे ही अडचण नसावी, तर आनंदाची संधी असावी. त्यांच्या येण्याने घराचा वेळ जाऊ नये, तर घरातील नात्यांना थोडा वेळ मिळावा. कारण पैसा पुन्हा कमावता येतो, वस्तू पुन्हा विकत घेता येतात; पण एकदा दुरावलेली माणसे आणि निसटलेले क्षण पुन्हा सहज मिळत नाहीत.

म्हणूनच आज पुन्हा एकदा ती जुनी म्हण जगण्याची गरज आहे… ‘पाहुणे येती घरा, तोचि दिवाळी-दसरा!’ कारण दिवाळी-दसरा केवळ कॅलेंडरवरच्या तारखांनी साजरा होत नाही; तो माणसांच्या येण्या-जाण्याने, भेटीगाठींनी, प्रेमाने आणि आपुलकीने साजरा होतो. दारं बंद करण्यापेक्षा मनाची दारं उघडी ठेवूया. कारण घरात येणारा पाहुणा कदाचित पुन्हा येणार नाही, पण त्याच्या मनात राहिलेली आपुलकीची आठवण आयुष्यभर टिकून राहील!

डॉ. राजेश काळे ‘राजस’
ता. जिल्हा नागपूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 8 4 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे