गौराईचं सख्यांना पत्र
अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर जि.अहिल्यानगर
गौराईचं सख्यांना पत्र
प्रिय सख्यांनो, सप्रेम आशीर्वाद..!
“फुलांच्या सुगंधासारखी तुमची माझी भेट झाली,
स्नेहाच्या धाग्याने हृदयाशी नाती जोडली…”!
मी सुखरूप सासरला आले गं, काळजी करू नका… इथंही स्वागत झालं. पण ‘माहेर ते माहेरच!’ माझ्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या तुम्ही इतक्या प्रेमाने मला जपलं, की त्या दोन-तीन दिवसांत स्वर्गीय आनंद लाभला. ओटीतलं कुंकू, गाण्याच्या तालावर केलेली आरास, उदबत्त्यांचा सुगंध, आरतीचा मंगल ध्वनी यां सगळ्यांनी मन भारून गेलं.
“जणू गौरी आली घरोघरी आनंदाची सर आली,
वसुंधरेवर नंदनवन फुलवून गेली…”
तुम्ही सजवलेले मंडप, धान्याच्या राशी, फराळाचा थाट.. सगळं पाहून मन सुखावलं. दुसऱ्या दिवशीचा पंचपक्वान्नाचा थाट, पुरणपोळी, भाज्या, गोडधोड… किती काय सांगू! तेही तुम्ही हसत-हसत, प्रेमाने केलंत, हे पाहून डोळ्यांत पाणी आलं. ‘माझं येणं जणू तुमच्या घरात आनंदाची उधळण करतंय असं मला वाटलं’, पण मला फक्त तीन दिवसच राहता आलं. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे म्हणून मान्य करावं लागतं. तरी एक गोष्ट कळली… ‘उत्सव दोन दिवसांचा असतो, पण मनातला सण कायम टिकतो’
तुमच्यातली एकता, आदर, प्रेम पाहून मन भरून आलं. आई-मुलगी, सासू-सून, नणंद-भावजय या नात्यांत जर थोडं समजून घेतलं, चुकांकडे दुर्लक्ष केलं, तर घर खरंच मंदिर होतं. सोन्या-चांदीने नाही, तर प्रेमानेच घर उजळतं. आणि एक गं … यावर्षीचा एक खास अनुभव – तुमचे सेल्फी! रोज माझ्याबरोबर फोटो काढून तुम्ही मला आधुनिक काळाची गोड मज्जा दिलीत. आमच्याकडे मोबाईल, व्हाट्सअप, इन्स्टा नसले तरी, ते सगळे फोटो मी मनात सेव करून आणलेत.
“क्षणभराची भेट तुमची- माझी, मनात ठेवते साठवून,
तुमच्या संसारात सुख-शांती-समाधान अखंड वाहत राहो.”
अशाच प्रेमाने, एकमेकींचा हात धरून, आनंदाचा प्रकाश पसरवत राहा. पुढच्या वर्षी भेटायचंच… तोवर मी आठवणींचा सुगंध मनात साठवून ठेवते.
तुमचीच,
गौराई..!
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि.अहिल्यानगर
========



