जे.एस. कॉलेज व ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये सेमिनारचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
जे.एस. कॉलेज व ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये सेमिनारचे आयोजन
“कामाच्या ठिकाणी लैंगिक छळास प्रतिबंधात्मक उपाय” विषयावर सेमिनार; डॉ. नीलम हजारे यांचे मार्गदर्शन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग, दि. ३० सप्टेंबर २०२६ : जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. डॉ. गौतम पाटील आणि जे.एस.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जे.एस. कॉलेज आणि ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या महिला विकास कक्ष व अंतर्गत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “कामाच्या ठिकाणी लैंगिक छळास प्रतिबंधात्मक उपाय” या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. वर्षा पाटील, प्रा. शिल्पा कवळे प्रा.मिनल पाटील आणि प्रा. पियुषा पाटील यांनी केले. कार्यक्रमात ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या प्रभारी प्राचार्य डॉ. नीलम हजारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे डॉ. नीलम हजारे यांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाचे विविध प्रकार, त्याचे मानसिक व सामाजिक परिणाम तसेच अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली. न्यायालयीन निवाड्यांमधून विकसित झालेली कायदेशीर तत्त्वे आणि त्यांचा कायद्याच्या विकासावर होणारा परिणाम याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
“कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३” या कायद्याच्या तरतुदी स्पष्ट करताना प्रत्येक संस्थेत प्रभावी अंतर्गत समिती असणे, कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि तक्रारदाराला सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या नॅक समन्वयक प्रा. निलम म्हात्रे ,प्रा. डॉ. संदिप घाडगे, प्रा. सुनिल ठोकळे,प्रा. चिन्मय राणे, प्रा. कौशिक बोडस आणि प्रा. सुरज पुरी उपस्थित होते. तसेच विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महिलांनी तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या कायदेशीर अधिकारांची माहिती करून घ्यावी आणि अन्यायाच्या प्रसंगी उपलब्ध कायदेशीर यंत्रणेचा योग्य प्रकारे वापर करावा, असे आवाहन डॉ. हजारे यांनी केले.



