माझी नसलेली विद्यार्थीनी
स्वाती मराडे-आटोळे
माझी नसलेली विद्यार्थीनी
“नाव काय गं तुझं?”
“अग नाव सांग ना.”
“……. संजना”
“अरे वा छानच आहे नाव, उद्या घरून कुणाला तरी शाळेत नाव घालायला घेऊन ये हं.” गेले पंधरा दिवस ती फक्त हो म्हणत होती पण घरून कुणाला घेऊन येतच नव्हती. नवीन शाळेत माझी बदली झालेली. शाळेत एकूण आठ शिक्षक.. एक शिक्षक वगळता सगळेच नवीन बदली होऊन आलेले. शाळा सुरू होताच सर्वांची कामाची व वर्गवाटणी झाली. माझ्याकडे पहिलीचा वर्ग आला. खरेतर खूप आनंद झाला कारण नवीन शाळेत माझा हा वर्ग असाच पुढील इयत्तांसाठी माझ्याकडेच राहणार होता. सुरूवातीपासूनच वेगाने शिकवण्यासाठी माझी लगबग सुरू होती. त्यातच वर्गासाठी शासनाकडून भरपूर साहित्य मिळाले होते. गणित पेटी, भाषा पेटीचा पुरेपूर वापर करून माझी वाटचाल सुरू होती. पटनोंदणी व पहिलीची मुले यामुळे वर्गात अजिबात उसंत मिळत नव्हती.
पट जास्त असणा-या शाळांत विद्यार्थी बाहेरगावी जाणे, इतर शाळेतून नवीन विद्यार्थी येणे हे चालूच असते. इथेही ते चालूच होते. मुख्याध्यापक व आम्ही सर्व शिक्षकांनी याबाबत आढावा घेतला. तेव्हा या मुलीचे कोणी नाव टाकायला आलेच नाही असे मी सांगितले. तिला पुन्हा बोलवले व पूर्ण नाव विचारले तर दुसरीचे शिक्षक म्हणाले हे नाव तर दुसरीच्या पटावर आहे. मग आम्ही तिला विचारले ‘तू मागच्या वर्षी शाळेत येत होतीस ना..?’ तर तिने रडायलाच सुरुवात केली. तिच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत बोलावून घेतले. आजी शाळेत आली. तिला सांगितले तुमची मुलगी पहिलीच्याच वर्गात बसत आहे. तिचे नाव तर दुसरीच्या वर्गात आहे. ‘होय मॅडम. तिचं नाव मागच्या वर्षी घातलंय, पण ती शाळेत यायला खूप घाबरायची.. कधीतरीच शाळेत यायची. यावर्षी पहिलीला शिकवायला मॅडम आहेत म्हणून ती रोज शाळेत येतेय.
तिला तुम्ही शिकविलेलं समजतंय पण चांगलं. तिचं नाव पहिलीतच घ्या. ती कुठल्याही सरांच्या वर्गात बसायला घाबरते.’ त्यांना नियम समजावून सांगितले त्यानुसार तिला दुसरीतच ठेवावे लागेल असे म्हटले. पण आजीच्या चेह-यावर काळजी दिसू लागली. मलाही वाटायला लागले बळजबरीने तिला दुस-या वर्गात पाठवले तर पुन्हा कदाचित ती शाळेत यायची बंद होईल. मध्यममार्ग म्हणून तिला माझ्याच वर्गात बसू दिले. मी दररोज तिच्याशी बोलणे वाढवले. आठवडाभरानंतर ती माझ्याशी छान बोलू लागली. मग हळूहळू मी तिला समजावून सांगितले तू माझ्याजवळ पुढे बसायचे आणि पहिलीच्या मुलांपेक्षा जास्त अभ्यास करून लवकर वाचायला शिकायचे. तिलाही ते पटले. ती भराभर अभ्यास करून मला दाखवायची आणि दोनच महिन्यांत ती छान लिहू वाचू लागली दरम्यानच्या काळात मी तिला मुद्दाम काहीतरी आणायचे निमित्त करून दुसरीच्या वर्गात पाठवायचे. दुसरीचे सरही तिला त्यावेळी छान बोलायचे त्यामुळे आता तिच्या मनातील भिती दूर झाली होती.
एक दिवस मी तिला म्हटले. तुझे पहिलीचे सगळे पुस्तक शिकून झाले. आता या वर्गात तू कोणता अभ्यास करणार.. त्यापेक्षा दुसरीच्या वर्गात बसशील का तिथला अभ्यास करायला?’ तिला ते पटले होते पण तरीही धाडस होत नव्हते तिकडे जायचे. ‘अगं कशाला घाबरतेस. चल बरं.. मी सरांना सांगते तुला कधी मारायचं नाही म्हणून.’ विश्वासाने ती उठली आणि दुसरीच्या वर्गात जाऊन बसली. खरेतर ती माझ्या वर्गातून गेली म्हणून थोडी हुरहूर वाटली, पण तिची योग्य प्रगती झाली हे पाहून आनंदही वाटला. मधल्या सुट्टीत ती आवर्जून माझ्याकडे येत होती आणि वर्गात कोणता अभ्यास केला हे सांगत होती. आता ती मुलगी शिक्षणप्रवाहात आलीय हे मनोमन पटले आणि हजेरीपटावर माझी नसलेली विद्यार्थिनी माझी झाली याचा अभिमानही वाटला.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.