“गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘गाव तसं चांगलं’ हे वाक्य उच्चारताना मनात एक हळवा गंध दरवळतो, मातीचा, नात्यांचा आणि आठवणींचा. ‘गाव म्हणजे केवळ भौगोलिक स्थान नसते, तर ते एक संस्कार केंद्र असते’. जिथे माणूस ‘माणूस’ म्हणून घडतो. शहर माणसाला यश शिकवते, पण गाव त्याला जगणे शिकवते. महात्मा गांधी यांनी म्हटले होते, “भारताचा आत्मा खेड्यांत वसतो.” या विधानामागे केवळ भावनिक आवाहन नव्हते, तर एक सामाजिक तत्त्वज्ञान होते. गावातील जीवनपद्धती ही परस्परावलंबित्वावर आधारलेली असते. एक शेतकरी दुसऱ्यावर अवलंबून असतो. सण-उत्सव सामूहिक असतात, दु:खही वाटून घेतले जाते. येथे ‘मी’ पेक्षा ‘आपण’ मोठे असतो. ही सामूहिक जाणीवच गावाचे खरे सौंदर्य आहे.
परंतु या सौंदर्याची एक वेगळी बाजूही आहे. गावात परंपरा आहेत, पण काही वेळा त्या परंपरा विवेकाला आव्हान देतात. अंधश्रद्धा, जातीयता, स्त्री-पुरुष असमानता या गोष्टी अजूनही काही ठिकाणी वास्तव आहेत. त्यामुळे प्रश्न पडतो गाव तसं चांगलं, पण बदलाच्या वाटेवर ते किती सजग आहे? गाव तसं चांगलंच आहे म्हणून तर काटेवाडी मधून शरद पवार, बाभुळगाव मधून विलासरावजी देशमुख, देवराष्ट्र मधून यशवंतराव चव्हाण यासारखे अनेक दिग्गज राजकारणात पुढे आले. पण हेही दुर्लक्षित करून चालणार नाही की या गाव गाड्यातच राईनमपाडा तालुका साक्री, गडचिंचले जिल्हा पालघर सारख्या दुर्दैवी घटना देखील घडल्यात.
तात्त्विक दृष्टिकोनातून पाहिले तर गाव म्हणजे ‘मुळं’ आहेत. झाडाची मुळे जशी जमिनीशी नातं जोडून ठेवतात, तशीच गावाची संस्कृती आपल्याला आपल्या ओळखीशी जोडून ठेवते. शहरात माणूस प्रगती करतो, पण अनेकदा एकाकी होतो. गावात कदाचित भौतिक साधनांची कमतरता असेल, पण भावनिक समृद्धी असते. एखाद्या घरात दुःख आले तर सारा गाव त्याच्या पाठीशी उभा राहतो ही केवळ सामाजिक रचना नाही, तर माणुसकीचे जिवंत तत्त्वज्ञान आहे.
आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने “गाव तसं चांगलं” या चिंतनात्मक विषयावरती मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी सर्वांना लिहीतं केलं. परीक्षणार्थ रचना वाचताना विषयाला संपूर्ण न्याय देण्याचं उत्तर कार्य अर्थातच सर्व शिलेदार कवी कवयित्रींनी मनापासून केलं. “गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं” या वाक्यातील ‘पण’ काढून टाकायचे असेल, तर गावाला परंपरेची उब आणि आधुनिकतेची दिशा दोन्ही स्वीकारावी लागेल. विवेक, समता आणि शिक्षण यांचा संगम झाला, तर गाव केवळ चांगलेच नव्हे तर आदर्श ठरेल हाच सर्वांचा मोलाचा संदेश ठरला. तेव्हा तुम्हा सर्व कवी कवयित्रींचे मनापासून खूप खूप अभिनंदन. पुढील लिखाणासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



