मनोरमा ऑईल इंडस्ट्रीजच्या विषारी धुरामुळे मालेवाडा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
ग्रामस्थांची तहसीलदारांकडे तक्रार; पण कारवाई शून्य
मनोरमा ऑईल इंडस्ट्रीजच्या विषारी धुरामुळे मालेवाडा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
शेतीची गुणवत्ता घसरली.. पिकांना बेभाव
जनावरांनाही होतोय त्वचारोग
जिकडे तिकडे काळ्या धुराचा लोट
ग्रामस्थांची तहसीलदारांकडे तक्रार; पण कारवाई शून्य
आमदार संजय मेश्राम यांनाही निवेदन; त्यावर कार्यवाहीची ग्वाही
रजत डेकाटे, प्रतिनिधी
भिवापूर/मालेवाडा: मालेवाडा येथे उमरेड-भिशी मार्गावर मनोरमा ऑईल इंडस्ट्री ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून ऑईलची निर्मिती व निर्यातीचे काम करत आहे. पण या कंपनीत कच्चामाल तयार करण्याकरिता जे लाकडे व वाहनांची टायर्स जाळली जातात, त्यातून विषारी काळा धूर बाहेर पडतो. हा धूर लगतच्या शेतातील पिकांवर बसतो त्यामुळे शेतातील पिकांचा रंग हा काळा व चिकट होतो. त्यामुळे या पिकांची गुणवत्ता कमी होत असल्याने या पिकांना भावही मिळत नाही. भाव घसरणीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
या कंपनीच्या धुरामुळे कंपनीच्या परिसरातून जी जनावरे जातात त्या जनावरांच्या अंगावर येथील काळा धूर बसत असून त्यामुळे जनावरांचा रंगही काळा होतो आहे. त्यामुळे जनावरांना अनेक त्वचेच्या आजारासही सुरुवात झालेली आहे.
तसेच या कंपनी लगतच ‘गोटाळी’ नावाची वस्ती असून या कंपनीतील टायर्स जाळण्याचा दुर्गंध हा गोटाळी गावापर्यंत जात असल्याने तेथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. व श्वसनासही त्रास होतो आहे. कंपनीमध्ये कच्चा माल तयार करण्याकरिता बॉयलरचा वापर करण्यात येत नसून धूर वाहणारे नळकांडेही कंपनीने लावलेली नाहीत. त्यामुळे ही कंपनी त्वरीत बंद करण्याची मागणी दिगांबर डोमाजी सहारे यांच्यासह गावातील नागरिकांनी भिवापूर तहसीलदारास व ग्रामपंचायत मालेवाडा येथील महिला सरपंचास निवेदन केली होती..
पण काहीच परिपूर्ती न झाल्याने स्थानिक गावकऱ्यांनी याबाबतीत उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम यांना निवेदन दिले. आमदार संजय मेश्राम यांनी याची दखल घेतली असून ही बाब सर्वांच्या आरोग्यासाठी खरंच गंभीर असल्याने चिंता व्यक्त केली.
व गावकऱ्यांनी दिलेल्या सदर निवेदनातील बाब ही गंभीर स्वरूपाची असल्याने त्यावर शासकीय नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याकरीता त्यांनी जातीन लक्ष घालून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळातील प्रशासकीय अधिकाऱ्यास तसे निर्देश त्यांनी स्वतः दिलेले आहेत.. त्याबाबतीत परिपत्रक त्यांनी पाठवलेले आहे व नागरिकांना योग्य तो न्याय मिळावा हा त्यांचा यामागचा हेतू आहे.