रक्तरंजित बलिदानाची गाथा ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे ऐतिहासिक परीक्षण

रक्तरंजित बलिदानाची गाथा ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे ऐतिहासिक परीक्षण
जागतिक, ऐतिहासिक व प्रसिद्ध अजिंठा, वेरूळच्या लेण्या या जिथल्या कला संपन्नतेचा वारसा आहे, पैठण मधील संत एकनाथ महाराजांचे कार्यक्षेत्र उभ्या भारतास अभिमानास्पद आहे. नांदेडची भूमी गुरुग्रंथ साहेबांचे पावित्र्य जोपासत आहे. बीड, उस्मानाबाद भागात संत परंपरा व लोककला आजही तेवढीच मजबूत आहे.जेथे अण्णाभाऊ साठे, शंकर पाटील, द.या. पाटील, शंकरराव खरात यासारखे ग्रामीण कथाकार तर विलासराव देशमुख, वसंतराव नाईक यासारखे दिग्गज राजकारण करणारी मंडळीही याच भूमीत घडली. ही भूमी म्हणजे ..मराठवाडा..!! “निधडी छाती..निस्पृह बाणा.. लववी ना मान..अशा या मराठवाड्याचा..आम्हास अभिमान….”.
इतिहास, संतपरंपरा,साहित्य चळवळी यांचा त्रिवेणी संगम असलेल्या मराठवाड्याचा…आज १७ सप्टेंबर अर्थात.. मुक्ती दिन आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण हैदराबाद संस्थान मात्र निजामाच्या अधिपत्याखालीच राहिले, रझाकारी अत्याचाराने जनता त्रस्त झाली.स्वामी रामानंद तीर्थ,सिद्धेश्वर महाराज, गोविंदभाई श्रॉफ, वसंतराव नाईक,विठ्ठलराव वाघ अश्या अनेक दिग्गज नेतृत्वाखाली शेतकरी, कामगार,विद्यार्थी,स्त्रिया रस्त्यावर उतरल्या १३ ते १७ ऑगस्ट दरम्यान भारत सरकारने ही “ऑपरेशन पोलो” नावाची सैनिक मोहीम चालवली.
“लाथांचा मार सहन केला..
तरी झुकली नाही मान..
मराठवाड्यांच्या वीरांनी…
लिहिला स्वातंत्र्याचा प्राण…”
एकीच्या जोरावर भारतीय सैन्याने निजामाला पराभूत केले व १७ सप्टेंबर १९४८ ला मराठवाडा स्वतंत्र झाला व महाराष्ट्राचा एक भाग बनला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस ‘मराठवाडा मुक्तीदिन’ म्हणून साजरा केला जातो. आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘मुक्तीसंग्राम’ हा विषय दिला. सर्व कवी कवयित्रींनी कवितेतून अंतर्मनातील भावनांना अत्यंत सूक्ष्मतेने शब्दबद्ध केले. शब्दांची निवड, ओळींचा रचनात्मक ताल आणि आशयाची प्रगल्भता या साऱ्याचा संगम एका वेगळ्याच अनुभूतीत घेऊन गेला.एकूणच सर्व कविता हृदयाला स्पर्श करणाऱ्या आणि मनात दीर्घकाळ गुंजणाऱ्या अशाच आहेत..तेव्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन.
पण थोडे काही.. प्रत्येक कवितेमध्ये तुमचा एक खास आवाज उमटतो. त्या कवीवाणीला गमावू नका. “इतरांची शैली प्रेरणा ठरू शकते,परंतु स्वतःचा ठसा तुमच्या लेखणीच़ खरं सौंदर्य आहे.” काव्य हे काळाचं आरसपान असावं. जे तुम्ही पाहता, जगता, अनुभवता त्यावर लिहा. नवीन विषय, नव्या जाणिवा, आणि नवे दृष्टिकोन यांचं स्वागत करत रहा.” तूर्तास एवढेच…!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह





