एक शीळ घातल्यावर क्षणार्धात ताणतणाव निघून जातात : डाॅ.मधुसूदन घाणेकर
वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे
एक शीळ घातल्यावर क्षणार्धात ताणतणाव निघून जातात : डाॅ.मधुसूदन घाणेकर
वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे
पुणे (दि.8 नोव्हेंबर ): जेव्हा आपल्या मनाला वाटेल तेव्हा सहज एखादी शीळ घालून पहा- क्षणार्धात सगळे ताणतणाव दूर होऊन सकारात्मक उर्जा प्राप्त होईल. शीळवादन करत रहा, वय विसराल !आनंदाने जगण्याची उमेद वाढेल ,असे प्रतिपादन विश्वविख्यात शीळवादक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.
शीळवादक हा कलावंत अजून उपेक्षितच आहे , त्याची प्रतिष्ठा अधिकपणे उंचावली जावी याबाबत समाजानेच दखल घेण्याची आवश्यकता असल्याचेही डाॅ.घाणेकर यांनी सांगितले. ज्येष्ठ शीळवादक
उषा फाल्गुने यांना व्हिसल वर्ल्ड संस्थेतर्फे नुकताच डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते आंतरराष्ट्रीय शीळवादन जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात डाॅ.मधुसूदन घाणेकर बोलत होते.
याच सोहळ्यात डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी अनियतकालिकाच्या 967 व्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.ज्येष्ठ शीळवादक अनघा आगाशे सावनूर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. निमंत्रक आणि मधुकर्णिका फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी सांभाळली.
कवयित्री आणि काव्यशिल्पच्या माजी अध्यक्ष ऋचा कर्वे यांनी सूत्रसंचालन केले.या सोहळ्यात उषा फाल्गुने, अनघा आगाशे सावनूर यांच्यासह किरण गांधी, चंद्रशेखर धर्माधिकारी, प्रमोद परदेशी आणि गणपत तरंगे यांनी शीळवादन केले.
याप्रसंगी डाॅ.दीपक फाल्गुने, तितिक्षा इंटरनॅशनल या संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष प्रिया दामले, दीपाराणी गोसावी, विलास जोशी , अंकुश शिर्के, अशोक शहा, मंगल पसरणीकर, सीताराम मनवल, चंद्रशेखर कोरडे बाबा ठाकूर, नंदकिशोर गावडे आदि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
समारोपात अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी गेल्या शतकावर प्रभाव टाकणा-या 18 गायक- गायिकांची गाणी गायन आणि शीळवादनाने सादर करुन रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला.”जीवनरुपी शेल्यातून मला शीळवादनाची कला आत्मसात झाली ” असे सत्काराला उत्तर देताना उषा फाल्गुने यांनी सांगितले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शीळवादकांच्या शिट्टीवरील वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.





