Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

ओळख : कागदावरची नव्हे; कर्मातून घडलेली..!!

अनिता व्यवहारे ता.श्रीरामपूर जि अहिल्यानगर

0 5 1 7 9 6

ओळख : कागदावरची नव्हे; कर्मातून घडलेली..!!

माणसाची ओळख नेमकी कशातून घडते? नाव, पद, की कागदपत्रांवर लिहिलेल्या माहितीमधून? की ती त्याच्या विचार, कर्म आणि माणुसकीतून? आयुष्याच्या प्रवासात आलेल्या काही अनुभवांनी मला ओळख या शब्दाचा खरा अर्थ शिकवला. त्या अनुभवातून उमजलेला हा माझा छोटासा प्रवास…!!

“नाव सांगितलं की माणूस कळत नाही,
पद मिळालं की ओळख होत नाही,
कर्मातून जेव्हा उमटते माणुसकीची छाप,
तेव्हाच खरी ओळख घडत असते आपोआप…”

८७ सालची गोष्ट…!! मी नुकतंच बी.एड. पूर्ण केलं आणि नोकरीच्या शोधाला सुरुवात केली. वेगवेगळ्या शाळांमध्ये अर्ज करणे, मुलाखती देणे सुरू झाले. अर्थात हे सर्व करताना मला माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत होते, कारण ते दोघेही प्राथमिक शिक्षक होते. अर्ज केल्यानंतर मुलाखतीचे पत्र आले की, नेहमीप्रमाणे सर्व कागदपत्रांची फाईल घेऊन मुलाखतीला जायचे. त्या फाईलमध्ये नाव, पत्ता, शिक्षण, अनुभव अशी सर्व माहिती असायची. जणू तीच माझी ओळख. पण हळूहळू एक गोष्ट लक्षात आली की, कार्यालयांना ती ओळख पुरेशी वाटत नव्हती. तेव्हा मला जाणवलं की आपली ओळख ही फक्त कागदपत्रांमध्ये बंदिस्त नसते. ती आपल्या अस्तित्वाची आणि कर्तृत्वाची साक्ष असते. जिथे जाईल तिथे माझ्या पात्रतेपेक्षा “माझी / आमची कोणाशी ओळख आहे का?” याचाच शोध घेतला जायचा.

तेव्हा मनात एक प्रश्न उभा राहिला. नाव कागदावर लिहिलं की ओळख होत नाही, कर्तृत्वातून उमटलेली छापच खरी ओळख असते. माझ्या बाबतीत म्हणाल, तर माझी ओळख इतकीच… मी कोण आहे, कशी आहे? ‘लहानपणापासून वागणं, बोलणं, अभ्यास आणि गुण यातून तयार झालेली माझी प्रतिमा’. आणि ‘ओळख’ म्हणाल तर अजून इतका अनुभव नव्हता की मी कोणाला ओळखू शकेन.

स्वामी विवेकानंद म्हणत, “तुमची ओळख तुमच्या शब्दातून नव्हे; तर तुमच्या कृतीतून निर्माण होत असते.” माझे सासरे मात्र माणसं ओळखण्यात पक्के होते. पण त्यांची ओळख वेगळीच होती. शिक्षकी पेशाचा साधेपणा, सत्याची कास आणि कर्तव्यनिष्ठा. ‘व्यवहारे गुरुजी’ म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि गावात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. परंतु एखाद्याकडून शिफारस घेणे, वशिला लावणे किंवा कोणाला सांगून नोकरी मिळवून देणे, ही पद्धत त्यांच्या स्वभावात नव्हती. त्यामुळे काही काळ नोकरी मिळवणं माझ्यासाठी कठीणच झालं.

पण पुढे एक गोष्ट घडली. त्यांच्या सत्यनिष्ठा, कष्ट आणि प्रामाणिकपणातून निर्माण झालेली ओळखच माझ्या नोकरीसाठी कामी आली. आणि तिथून मला ‘ओळख’ या शब्दाची खरी महती कळली.

“ओळख पदावरून होत नाही,
ती माणसाच्या वागण्यातून घडते,
नाव क्षणात मिळतं,
पण ओळख आयुष्यभर घडत असते.”

तेव्हा जाणवलं की, आपली ओळख ही पद, प्रतिष्ठा किंवा संपत्तीवरून तयार होत नाही. ती आपल्याच कर्मातून, विचारातून आणि वागण्यातून निर्माण होत असते. या संदर्भात पु. ल. देशपांडे यांचे एक वाक्य मला आठवतं,
“माणूस मोठा त्याच्या पदामुळे होत नाही, तर त्याच्या माणुसकीमुळे मोठा होतो.”

“ओळख मिळवायची नसते… ती बनवायची असते.” लोकांच्या मागे धावून नाही, तर ध्येयाच्या मागे लागून ती घडवावी लागते. काम तुमचं बोलू लागलं की, नाव सांगावं लागत नाही. माणसाच्या कर्मातूनच त्याची ओळख तयार होत असते. हे करताना लोक काय म्हणतील याकडे फारसं लक्ष द्यायचं नसतं. परिस्थितीमुळे आपण बदलू नये, याकडे लक्ष द्यावं लागतं. हे सर्व मला कळून चुकलं आणि मी ठरवलं…!! माझी ओळख माझ्या कर्मातून, विचारातून आणि माणसांशी असलेल्या वागणुकीतून दिसली पाहिजे.

अर्थात यासाठी लागणारे संस्कार आणि आचार-विचारांची शिदोरी मी माझ्या माहेरहून आई-वडिलांकडून घेऊन आले होते. त्यातच भर पडली माझ्या आदर्श सासू-सासऱ्यांच्या मार्गदर्शनाची. म्हणूनच कदाचित… मी जेव्हा या पदावर काम करू लागले, त्या पहिल्या वर्षापासून ते सेवानिवृत्तीपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनात माझी ओळख जपली गेली आणि आजही ती टिकून आहे. याचा मला अभिमान आहे.

“कर्मात प्रामाणिकपणा, विचारात असू दे सचोटी,
वागण्यात माणुसकी असेल तर घडते खरी ओळख मोठी,
नाव क्षणात मिळतं, पण विश्वास कमवावा लागतो,
माणूस म्हणून जगलो तरच जीवनाचा अर्थ सापडतो..”

एक माणूस म्हणून माझी ओळख जपण्याचा आणि जोपासण्याचा मी प्रयत्न करत आहे. लोक काय म्हणतील यापेक्षा, मी कोण आहे हे जपणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. कारण शेवटी माणसाचं नाव कागदावर लिहिलेलं असतं, पण ओळख मात्र लोकांच्या मनात कोरली जाते. पद, पैसा आणि प्रसिद्धी कधी ना कधी बदलतात, पण माणुसकीतून घडलेली ओळख आयुष्यभर टिकून राहते. आणि कदाचित हाच ‘ओळख’ या शब्दाचा खरा अर्थ असावा.

अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि अहिल्यानगर
(लेखिका सेवानिवृत्त पदवीधर शिक्षिका आहेत.)
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 9 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे