Breaking
आरोग्य व शिक्षणखानदेशपरीक्षण लेखमहाराष्ट्रसाहित्यगंध

आजची शिक्षण पद्धती दशा व दिशा

सीमादेवी निंबाजी बेडसे ग्रामपंचायत अधिकारी, चाळीसगाव

0 6 4 5 3 2

आजची शिक्षण पद्धती दशा व दिशा

नाही म्हणता – म्हणता आपण 21व्या शतकात पदार्पण करून चुकलोत. विसाव्या शतकाच्या शेवटी झालेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्काराने मानवी जीवनाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. जिकडे तिकडे खाजगीकरण जागतिकीकरणाचे वारे वाहू लागलेत आणि यातच हे युग स्पर्धेचे युग केव्हा झाले कळलेच नाही. प्रत्येक बाबतीत स्पर्धा चढाओढ यामुळे मानवी जीवन हे जीवघेण्या स्पर्धेनेच व्यापून टाकले आहे, त्यामुळे प्रत्येकाला “जमाने को दिखाना है, जमाने के साथ चलना चाहिए” असे वाटते आणि मग तो स्वतःच्या अस्तित्वाला, शरीराला, कुटुंबाला विसरून एखाद्या यंत्राप्रमाणे काम करू लागला आहे. मग कुठली आली सामाजिक बांधिलकी आणि कसलं आलं देशप्रेम सगळं काही अगदी स्वार्थी वृत्तीनेच चालत असते.

ही झाली सद्यस्थिती,मग या परिस्थितीशी दोन हात करणे म्हणजे सूर्याला हात लावण्यासारखे आहे. पण यानंतरची येणारी पिढी अशीच असू नये याकरिता त्यांना काहीतरी वेगळे स्वरूपाची शिकवण दिली जाऊ नये का ? त्यांना विद्यार्थी दशेपासूनच घर- कुटुंब – समाज – देश आणि स्पर्धा याबाबतीत परिपूर्ण केले गेले पाहिजे, आणि हे केवळ शिक्षणाच्या माध्यमातूनच शक्य आहे.

परंतु आजची आपली शिक्षण पद्धती विचारात घेतली तर असे दिसून येते, की ही शिक्षण पद्धती केवळ पुस्तकी ज्ञान देणारी आहे.अशा पुस्तकी ज्ञानाचा आणि बाहेरच्या व्यवहारिक जगाचा काडीमात्र संबंध नसतो. परिणामी पदवीधर असलेल्या तरुणांना त्यांच्या योग्यतेपेक्षा कमी प्रतीचे काम करावे लागते. आणि त्याचा या शिक्षण क्षेत्राकडे आणि समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो त्याला सामाजिक बांधिलकी राहत नाही. आपण समाजाचे काही देणे लागतो किंवा समाजाप्रती आपली काही कर्तव्य,जबाबदाऱ्या आहेत हे तो विसरून जातो. जेव्हा त्याला समाजाशी काही संबंध नाही असे वाटते तेव्हा; देशाबाबतीत त्याचे प्रेम झोपून गेलेले असते, जे फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी जागे होते. अशा गोष्टी घडण्यामागचे कारण केवळ एकच आणि ते म्हणजे “आजची शिक्षण पद्धती.”

आपल्या आजच्या शिक्षण पद्धतीत कुठल्याही प्रकारचे मूल्यशिक्षण, देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी शिकविल्या जात नाही, त्यामुळे तरुण विद्यार्थी वर्ग पूर्णपणे भरकटत आहे. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते, की आपल्या पाल्य शिकून चांगल्या नोकरीला लागावा किंवा त्याने आपल्या पायावर उभे राहावे, पण पदवीधर होऊनही आपल्या तरुणांना कित्येक वर्ष नोकरीसाठी किंवा पायावर उभे राहण्यासाठी खस्ता खाव्या लागतात. कारण आजच्या शिक्षण पद्धतीत अजूनही विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जात नाही, तसेच आजच्या शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे स्वावलंबत्व येत नाही. त्याकरिता आजचे शिक्षण पद्धती पूर्णपणे बदलून टाकली गेली पाहिजे.

ज्यात असेल… एक सुजाण नागरिक बनण्याची क्षमता आणि तरुणांमध्ये अधिकाधिक सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याची ताकद ज्यात विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख शिक्षण दिले जाईल, त्याचा जीवन विषयक दृष्टिकोन आदर्श केला जाईल, त्यांना अधिकाधिक व्यावसायिक शिक्षण दिले जाऊन त्यांच्यात एक अधिकारी, एक उद्योजक, एक कर्मचारी घडवला जाईल, प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी बनेल आणि प्रत्येक जण व्यवसायिक स्वरूपाच्या शिक्षणामुळे स्वावलंबी होऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यास समर्थ ठरेल अशी असावी शिक्षण पद्धती.

ही शिक्षण पद्धती केवळ बारावी नंतर पदवी शिक्षणासाठी अमलात आणली गेली तर काही उपयोग नाही, कारण पदवीपर्यंत खूप वेळ निघून गेलेली असते याकरिता अशा स्वरूपाचे मूल्यधिष्टीत व्यवसायाभिमुख शिक्षण हे प्राथमिक शिक्षणापासून दिले गेले पाहिजे, जेणेकरून देशाच्या आधारस्तंभाची जडणघडण अत्यंत सुव्यवस्थितपणे आणि कार्यक्षमतेने होईल आज पदवीधर युवकाकडे समाज चांगल्या दृष्टिकोनातून पाहतो त्यांना व्यावसायिक दृष्ट्या एक सुजाण आणि परिपक्व नागरिक समजलं जातं पण आपल्या शिक्षण पद्धतीतून पदवीधर युवकांमध्ये कितपत परिपक्वता येते हा अजूनही एक प्रश्नच आहे आणि यावर उत्तर एकच, ‘आजची शिक्षण पद्धती बदलायला हवी..’

सीमादेवी निंबाजी बेडसे
ग्रामपंचायत अधिकारी, चाळीसगाव
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 4 5 3 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे