Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

रमणीय व निसर्ग सौंदर्याने नटलेले ‘बेट बहेगाव’

सौ. स्वाती मराडे-आटोळे

0 4 8 2 9 7

रमणीय व निसर्ग सौंदर्याने नटलेले ‘बेट बहेगाव’

खळखळ वाहणारी कृष्णामाई. कृष्णामाईच्या कुशीत एक सुंदर बेट. कुशीत म्हणजे अगदी नदीपात्रातच बरं.. त्या बेटावर श्रद्धास्थान असणारे रामाचे मंदिर व समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले मारूतीचे मंदिर. पूलाच्या वरच्या बाजूला बोटींगची सोय.. अशी सुरेख सैर करायची असेल, नदीपात्रातील बेट पहायचे असेल तर जावे लागेल सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे येथील रामलिंग बेट पहायला. हे नागरिकाचे श्रध्दास्थान व पर्यटनस्थळ म्हणून सांगली जिल्हयात प्रसिध्द आहे.

इस्लामपुरापासून तेरा किलोमीटर अंतरावर बहेलगत कृष्णा नदीच्या पात्रात हे रामलिंग बेट आहे. बेटावर चिंच, वड, पिंपळ, जांभूळ व इतर फुलझाडे यांसारख्या वृक्षवेलींनी परिसर सुशोभित आहे. रावणवध करून परत येत असताना राम-लक्ष्मण यांनी बहे या गावी मुक्काम केला असे म्हटले जाते. परत येताना श्रीरामचंद्र कृष्णा स्नानासाठी याठिकाणी उतरले जवळच असलेल्या शिरटे गावात सीतामाई स्नानासाठी राहिल्या. श्रीरामांनी स्नान करून तेथे शिवलिंग स्थापले. शिवलिंगाची पूजा चालू असताना कृष्णेस उल्हास येऊन ती गर्जना करू लागली हनुमान जवळच उभे होते. महापूर येतोय असे पाहून त्यांनी नदीला आलेले पाणी दोन्ही बाहुनी थोपवले व नदीतील पाणी दोन बाजूंला विभागून वाहू लागले अशी आख्यायिका आहे.

कृष्णा नदीला महापूर आल्यावर बेटाकडे जाण्याचे सर्व मार्ग बंद होतात. परंतु कृष्णा नदीला उन्हाळ्यातही पाणी असल्याने येथे अगदी मे महिन्यात जाऊनही पर्यटनाचा आनंद घेता येतो‌ अंत्यत रमणीय परिसरामुळे नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण व पर्यटन स्थळ म्हणून या बेटाचा उल्लेख करावा लागेल. या बेटावर वर्षभर धार्मिक उत्सव सुरू असतात. पौष अमावस्येला मोठी यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असे उत्सव साजरे केले जातात. वाळवे तालुक्याबरोबरच सांगली जिल्हा व शेजारच्या जिल्ह्यातून या बेटाला भेटी देण्यासाठी नागरिकांची वर्दळ असते. एक दिवसाची छोटी सहल आयोजित करण्यासाठी हे ठिकाण रमणीय व निसर्गसौदर्याने संपन्न आहे.

श्रीक्षेत्र बहे – बोरगाव कृष्णा नदीच्या किनारी बोरगावजवळ बहे हे गाव आहे. त्यामुळे या ठिकाणाला बहे – बोरगाव म्हणतात. बहे-बोरगांव येथील मारुती मूर्ती ही भव्य असून मूर्तीच्या डोक्यावर उंच मुकुट आहे. या बेटावर राममंदिर आहे. या राममंदिराच्या पाठीमागेच मारुतीची स्थापना शके १५७३ मध्ये समर्थांनी केलेली आहे. मंदिर अतिशय प्रसन्न व निसर्गरम्य ठिकाणी आहे. भक्तिरसाने भरलेले भीमरूपी स्तोत्र समर्थांना याच मारुतीचे ध्यान करीत असताना सुचले असेही म्हटले जाते. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी निसर्गसृष्टीने बहरलेला व अगदी रम्य असा इथला परिसर आहे. मारुती मंदिराबरोबरच या कृष्णा नदीत अनेक लहान-लहान बेटे व अनेक समाधी इथे आहेत. कृष्ण-माहात्म्यात ‘बाहुक्षेत्र’ असा या स्थानाचा उल्लेख आढळतो. या बेटापासून मच्छिंद्रगड जवळच आहे.

सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे