Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजननागपूरराजकियविदर्भसाहित्यगंध

“विदर्भ साहित्य संघातली निवडणूकपूर्व मांदियाळी”; बबन नाखले

बिनधास्त न्यूज नेटवर्क

0 5 1 7 8 0

“विदर्भ साहित्य संघातली निवडणूकपूर्व मांदियाळी”; बबन नाखले

काल मी विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीत बऱ्याच कालावधीनंतर प्रवेशलो. तर काय आश्चर्य ! अनेक जाने-पहचाने चेहरे – जे फक्त facebook वर दिसतात – त्यांची अख्खी मांदियाळी बसलेली दिसली – एवढी सुपरिचित साहित्यिक मंडळी, आजकाल साहित्य संमेलनातही दिसत नाहीत. हे पाहून मी तर सद्गदितच झालो. त्यात रवीन्द्र, नरेन्द्र, बळवंत, यशवंत, कीर्तीवंत, नामवंत, राम, श्याम, गोविंदा तर होते. प्रमोदही होते,अनिल आणि-सुनीलही दिसलेच. बरं वाटलं ! येत्या १५ मार्चला निवडणूक संपेल – आणि हे सर्व सारस्वतपुत्र आपापल्या F.B. पेजवर पुन्हा जाणार ! पुन्हा पाच वर्षे तिष्ठत हीच वाट बघत राहणार !!

या संध्यासमयी, अध्यक्ष प्रदीप प्रदीप दाते यांचं दालन गच्च भरलं होतं,ते मतदार आणि साहित्यिकांनी.ते सर्वांना या, बसा (जागा नसतानाही), चहा घ्या ! कसं काय चाललं? वगैरे विचारपूस करीत होते. अगत्यपूर्वक बोलत होते. सर्व पॅनलमधील मतदार तिथं होते. काहींच्या हातात कोऱ्या मतपत्रिका तर काही पुडके सांभाळून चर्चा करीत होते.अर्थात ही चर्चा ‘मराठीच्या व्यापक हितासाठीच’ होती. मधूनच प्रदीपजी नजीकच्या अँटी चेंबरमध्ये कुणाशी ‘गुफ्तगू’ करायला निघून जात होते. चर्चा संपल्यावर परत स्थानापन्न होत होते. वि. सा. संघाच्या अध्यक्षांच्या खुर्चीवर सध्या दाते सर आहेत.आता निवडणूक निकालानंतर ही खुर्ची तीच, अध्यक्षांचीच,परंतु बसणार कोण? हे लवकरच ठरणार आहे.
प्रदीप दाते – पेशानं शिक्षक. – ‘अक्षरमैत्री’ पॅनलचे सर्वेसर्वा. अक्षरांशी खरी ‘मैत्री’ राखणारा – ठेवणारा हा माणूस. गेल्या १०-१५ वर्षात, स्व. मनोहर म्हैसाळकरांच्या कारकीर्दीत, त्यांनी वि. सा. संघाच्या शाखांचा विस्तार केला, संमेलनं घडवून आणली, अगदी अखिल भारतीय सम्मेलनंसुद्धा… दातेंचं हे साहित्य चळवळीतलं कार्य डोळ्यात भरण्यासारखं आहेच. नाहीतर, वि. सा. संघाच्या शतक महोत्सवाच्या कार्यकाळात, डॉ.भाऊसाहेब कोलते वगळता (ना. रा. शेंडे यांचा अपवाद ) बहुजन समाजाला लाभलेला अध्यक्ष म्हणजे प्रदीप दाते.म्हैसाळकरांच्या मृत्युनंतर, हे पद दातेंकडे आलं ते आपसूकच. मनोहररावांचा वचक होता. मनोहरराव साहित्यप्रेमी, समन्वयक, रसिक आणि उत्तम प्रशासक होते. त्यांच्या काळात एका निवडणुकीचा अपवाद वगळता, साहित्य संघात निवडणूक झालीच नाही,हे खरं आहे.
मनोहररावांच्या गमनानंतर प्रदीप दाते नियुक्त झाले नाहीत, तर त्यावेळी निवडणूक झाली होती आणि कार्यकारिणीच्या बहुमताने ते निवडून आले होते – अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष त्यांच्या विरोधात होते म्हणे ! दाते म्हणजे दानशूर पाटील माणूस! हो, हे खरं तर सांगावं लागतं. मी विदर्भ दौ-यावर असताना,संघाचे मतदार विचारते झाले, की, काय बबनराव! तुम्ही पुरोगामी, बहुजनवादी – अन् दातेसारख्यांचा प्रचार करता, हे बरं आहे का?
मग मला सांगावं लागलं – अरे बाबा! ते माझे नातेवाईक आहेत- गांधींच्या जिल्हयातले – वर्ध्याचे – बहुजन – पाटील आहेत.
मग संघावाल्यांसोबत कसा? दुसरा प्रश्न.
माझं उत्तर असायचं, मग कोणत्या पॅनलमध्ये संघ-वाले-नाहीत, सांगा बरं!
मंडळी नंतर गप्प बसायची. मला दातेंची अशी ओळख करून द्यावी लागली. पण दाते मात्र यापासून दूरच. समन्वयवादी – गांधीजी, साने गुरुजींच्या विचारात वाढलेले. ‘भाऊंचे गांधी असणे वेगळे – प्रदीप भाऊंचे वेगळे ! –
मला खूप उमेदवारांचे फोन आलेत. कुणी आमच्यासाठी मतं द्या,तर कुणी – माझ्यासाठी – पण पॅनलसाठी मतदान मागणारी मला प्रदीप दातेंची मंडळी दिसली.
मध्यंतरी,पश्चिम महाराष्ट्रातील, सातारा जिल्ह्यात, एका आदर्श खेड्यातील शाळेत गेलो होतो – तिथं एक म्हण वाचण्यात आली – ती अशी : ” लबाडी ही एका आखूड चादरीसारखी असते. तिने पाय झाकावे तर तोंड उघडे पडते. अन् तोंड झाकावे तर पाय उघडे पडतात ” तसंच या निवडणुकीचं झालं आहे. स्वतःला मत मागतांना कित्येक सुविद्य साहित्यिकांना पॅनलचा विसर पडतो, हेच खरं !
खरंतर, प्रामाणिकपणा सिध्द करावा लागतो का? माझ्या मते नाही. कारण तो तुमच्या दैनंदिन जीवनातून आणि कृतीतून दिसावा लागतो.” – कमी अधिक प्रमाणात हे विधान मला ‘प्रदीप दाते’ यांच्याबाबतीत दिसतं – हा प्रामाणिकपणा मला त्यांच्या पॅनलमधील सर्वच सदस्यांमध्ये दिसला. म्हणजे,बाकी पॅनलमध्ये असे लोक नाहीत काय? तर आहेत. तुम्हाला खात्रीनं सांगतो की, पन्नास टक्के मतदान संमिश्रपणे- आपापल्या ‘CHOICE’ नुसार होणार आहे. अध्यक्षपदासाठी मात्र हे खरं नाही. दातेंनी खूप जुळवाजुळव- अगोदरच पूर्ण तयारी केली नाही. मतदान यादीचा घोळ – (सन २०१५ ला बदलले ) मृत मतदार शोधून या याद्या अद्ययावत करावयास हव्या होत्या. नको त्या साहित्यिकांची बाजू घेऊन, त्यांनी अ. भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत, आपल्याच समजलेल्या, साहित्यिकाला पोहचविले – ही त्यांची घोडचूक ! कारण हेच साहित्यिक लोक आता त्यांच्या विरोधात उभे होऊन आव्हान देत आहेत!
स्वतःचा चहा पाण्याचा, इतरांच्याही चहा पाण्याचा -नाश्त्याचा-जेवणाचा खर्च, खिशातून करणारा हा साहित्यिक की व्यापारी ??? आपलं एकाही पैशाचं बिल मी साहित्यसंघाला देत नाही – हे वर्तन काय सांगतं? ही वर्तन विसंगती नक्कीच नाही. ‘पांढरीचा गाव नाही आणि मिशीला अजून ताव नाही! असं हे सळसळीत हसरं व्यक्तिमत्त्व ! ही भलावण नव्हे, तर वस्तुनिष्ठ निरिक्षण आहे माझं.

‘लाभार्थी’ ची लागण नसलेला, साहित्यप्रेमी’ असणं, हे आजकालचं दुर्मीळ वास्तव. साहित्यसंस्था चालविणं, संमेलनं भरवणं, अनेक सांस्कृतिक उत्सव, महोत्सव साजरे करणं, पुरस्कार, बक्षिसं देणं – यशवंत दाते व्याख्यानमाला सातत्यानं चालविणे, भा. ल.भोळे -यशवंत सुमन’ व्याख्यानमाला, पुरस्कार कार्यक्रम आयोजित करणं – आणि तेही पदरमोड करुन – हे साधं सोपं काम नव्हे. आपण कुणावर उपकार करतो किंवा पुरस्काराचे लाभार्थी म्हणून त्यांना मते मागतो – हे तर त्यांच्या मनालाही शिवत नाही. वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर आलेल्या पोस्ट किंवा बातम्यांचा त्यांच्यावर कोणताच परिणाम होत नाही- असे ते दिसतात. आपण आपलं काम शांतपणे करीत राहावं – असं ते सांगतात.
“मनाचा निर्मळ,
वाचेचा रसाळ,
त्याचे गळा माळ
असो नसो॥”
असे साक्षात तुकाराम महाराज म्हणतात.
या निवडणुकीनिमित्तानं, बरेच अनुभवले, जे अनुभवले, ते आपणास सांगावेसे वाटले.

एका सुप्रसिद्ध समीक्षक आणि अ.भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष असलेल्या, साहित्यिकाने – व्हाट्सअपच्या देवाण घेवाणीतून मला विचारले, हे सगळं कशासाठी चाललंय बबनराव? हेच कळत नाही. याचं बेसिक कारण काय? ते विचारते झालेत.
मी बोललो. वि. सा. संघाची ही निवडणूक ही साहित्यिकांची किंवा मतदारांची राहिलीच नाही – त्यात मोठे राजकारण दडले आहे. या निवडणुकीत भल्या – भल्यांचा कस लागणार आहे म्हणे! कुणाला पद्मश्री तर कुणाला येऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत उतरायचं आहे. ही त्यांची ‘लिटमस टेस्ट’ आहेच. बऱ्याच – अश्या इच्छुकांनी – आपापली प्यादी प्रत्येक पॅनलमध्ये घुसविली आहेत. वि. सा.संघ आता ‘हायजॅक’ झाल्याचं चित्र आहे. त्याला आता राजकीय निवडणुकीचं स्वरुप आलं आहे.वर्तमानपत्र उघडल्यावर याच बातम्या आता चर्चेचा विषय बनल्या आहेत. समन्वयाने ही निवडणूक झाली असती, तर हे रामायण घडलं नसतं.

एक दाते सोडले, तर या पाच पॅनलमध्ये सर्वच डॉक्टर आहेत. काहींनी डॉक्टरकी कमविली – आणि काहींनी मिळविली, हाच तो फरक ! दाते डॉक्टर नसलेले उमेदवार आहेत. त्यांचं ‘अक्षरमैत्री-पॅनल’ अक्षरांशी, शब्दांशी मैत्री साधणारं आहे. सृजन नावावर सेतू उभारणारे, डॉ. गिरिश गांधी यांचं ‘सृजनसेतू’. तर डॉ. श्रीपाद जोशींचं – वि. सा. संघ वाचवा – असा SOS देणारं पॅनल मतदारांचं लक्ष वेधून आहे. त्यांचेच चेले गुरुबंधू डॉ. शोभणे यांनी साहित्यसंघाच्या निवडणुकीत आपल्या पॅनलला ‘राष्ट्रसंत तुकडोजी- महाराज’ यांचं नाव दिले आहे .एक अपूर्ण पॅनल घेऊन,ते अध्यक्ष पदाची निवडणूक जिंंकू पाहतात. डॉ. रंजन दारव्हेकर मात्र ‘एकला चालो रे’ च्या भूमिकेतून आपल्या सुवाच्य हस्ताक्षरातून, ‘आर्त’ भावनेनं, मतदारांना आवाहन करीत आहे.
एकूणच काय, तर साहित्यप्रेमी, राजकारणी, पत्रकार, नाटककार, साहित्यिक आपापले मोहरे पुढे करुन, ही मंडळी ‘रणांगण’ गाजवू पाहात असल्याचं चित्र आहे. अजूनही ज्यांना मतदानाचा हक्क आहे, ज्यांची नावं मतदार यादीत आहेत, पण लिफाफे पोचले नाहीत, किंवा परत आलेत किंवा परस्पर पळविले- अश्यांनी हात पाय हलवावेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष पोहचून आपला ‘लिफाफा’ हस्तगत करावा आणि येत्या १५ मार्चपर्यंत आपले मत नोंदवावे, ही आमची विनंती.आता रात्र वैऱ्याची नाही, तर मित्रही वैऱ्याचे आहेत, हे विसरू नये.

“पतझड में सिर्फ पत्तेही गिरते है।
नजरोंसे गिरनेका कोई मौसम नही होता।।”
हे कटू आहे पण सत्य आहे; हे रसिकांसाठी.पण साहित्यिकांसाठी ‘ “CLOTHES MAKE THE MAN,
BUT NEVER JUDGE A BOOK BY ITS COVER !! “

‘अंदरका माल पारखून घ्यावा’, ही मतदार साहित्यिकांना विनंती.

बबन नाखले
मोबाईल -9423680607

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 8 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे