आवासमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी कात्रण स्पर्धेचे आयोजन
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
आवासमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी कात्रण स्पर्धेचे आयोजन
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आयोजनात सहभागी विद्यार्थी
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
अलिबाग: महाराष्ट्र सरकारने समग्र शिक्षा मोहिमे अंतर्गत वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे, दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून दि. १६ अॉगस्ट २०२४ ते ३१ अॉगस्ट २०२४ या कालावधीत महावाचन उत्सव -२०२४ उपक्रम राबविण्याचे पत्राद्वारे राज्यातील सर्व शाळांना कळविले होते.
त्यानुसार आ.सा.धो. रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या सुनियोजनातून व मार्गदर्शनातून तसेच सर्व शिक्षकाच्या, सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागातून इ. ५ वी ते इ.१२ वी या वर्गांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमांपैकीच एक उपक्रम म्हणून विद्यालयात नवराष्ट्र वर्मानपत्र कात्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थी दररोज वर्तमानपत्र खरेदी करून त्याचे वाचन करीत आहेत व त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कूपनवर लिहून ते कूपन फाॕर्मवर चिकटवत आहेत. कात्रणे चिकटवून पूर्ण झाल्या नंतर तो फॉर्म नवराष्ट्र वर्तमानपत्राच्या कार्यालयात जमा करणार आहेत. याद्वारे यशस्वी विद्यार्थ्यांना नवराष्ट्र वर्तमानपत्रा कडून आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होणे, विद्यार्थ्यांना देश – विदेशातील दररोजच्या घडामोडींचे ज्ञान होणे, विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान वाढीस लागणे ही उद्दिष्टे साध्य होणार आहेत. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
या कात्रण स्पर्धेमध्ये रोजच्या रोज वर्तमानपत्र आणणे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे, नोंद ठेवणे, ही सर्व जबाबदारी स्वत:हून विद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक गणेश काशिनाथ राणे सर आणि संगणक शिक्षिका शतदा म्हात्रे मॅडम यांनी स्विकारलेली असून दि. १ आँगस्टपासून त्यांचे कार्य अविरतपणे चालू आहे, त्यामुळे याकार्यामध्ये त्यांचे विशेष उल्लेखनीय योगदान आहे.





