जिद्द अन् अभ्यासातील सातत्याच्या जोरावर ‘पारधी बेडा टू पीएसआय’ प्रवास
प्रतिनिधी :- अखिलेश रोडे
जिद्द अन् अभ्यासातील सातत्याच्या जोरावर ‘पारधी बेडा टू पीएसआय’ प्रवास
अठराविश्व दारिद्र्यातही माऊली म्हणाली, तू शीक अन् लेक बनला ‘पीएसआय’
गोंडखैरीवासीयांनी मिरवणूक काढून दिल्या शुभेच्छा
प्रतिनिधी :- अखिलेश रोडे
नागपूर/ गोंडखैरी : पारधी बेडा म्हटले की गुन्हेगारीचे आश्रयस्थान, असाच काहीसा समज, अठराविश्वे दारिद्र्याने थपथपलेले पाल बघितले की या संवेदनांची जाणीव अधिक गडद होते. त्यात शिक्षण कोसो दूर. बेड्यावर अधूनमधून धडकणारी पोलिसांची कुमक दहशत तर कुणाला तरी आज उचलले असावे, हेच सांगून जायची. हा डाग पुसून टाकण्यासाठी शिक्षणाची कास धरली. आई लिलाबाई , पत्नी राजेश्वरी व साळा अक्षय यांनी हिंमत दिली. उपजत धाडस, अभ्यासाचे नियोजन आणि प्रचंड मेहनत या भरवशावर पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली. गावकऱ्यांनी त्याचे कौतुकच केले नाही तर थेट गावातून मिरवणूक काढत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तो फासेपारधी समाजातील जिल्ह्यातील पहिला पीएसआय ठरल्याचे बोलले जाते.
राहुल गंगाधर राजपूत, असे या यशस्वी तरुणाचे नाव. तो मूळचा उमरेड तालुक्यातील राजूलवाडी, उदासाचा रहिवासी आहे. त्यांची सासूरवाडी ही गोंडखैरी आहे. त्याने २०२२ च्या परीक्षेत लोकसेवा आयोगाच्या पीएसआयपदाकरिताची ५३३ वी रैंक तर एसटी संवर्गातून २२ वी रैंक प्राप्त केली. १९ सप्टेंबरला निकाल आला. राहुलला वडील नाही. आई लीलाबाईने त्याचा सांभाळ केला. परिस्थिती नव्हती, मात्र शिक म्हणून हिंमत त्या माउलीची होती. तिने कष्ट करून त्याचे जीवन घडविले. आईची प्रकृती व्यवस्थित राहत नसल्याने राहुलने गोंडखैरी येथील पारधी वेड्यावरील राजेश्वरी राजू पवार हिच्याशी विवाह केला. पत्नी व साळा अक्षय यांनी विश्वास दिला. पुणे, मुंबई येथे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी जाण्यास मदत केली. मार्गदर्शक व पारधी समाजातील उच्चशिक्षित शुभम पवार यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळेच त्याला हे लक्ष्य गाठता आले, असे राहुल आवर्जून सांगतो. राहुलचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा राजूलवाडी, माध्यमिक शिक्षण चंद्रभान पाटील जिचकार हायस्कूल उदासा, उच्च माध्यमिक शिक्षण अशोक कनिष्ठ महाविद्यालय, पदवी शिक्षण रणधिरसिंग भदोरिया महाविद्यालय उमरेड येथून घेतले. पारधी समाजावर अनेक वर्षांपासून गुन्हेगारीचा शिक्का होता. समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घेत लोकसेवा आयोगातून महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी बनण्याची संधी दवडू नये. शिक्षणच हा शिक्का पुसू शकते. पोलीस दलात चांगले काम करून समाज व खात्याची मान अभिमानाने उंचाविणार असल्याचे राहुल या यशानंतर भरभरून सांगत होता.
▪️पुण्यातील शैक्षणिक वातावरणाच्या प्रभावामुळे जिद्द, चिकाटी, मेहनत व सातत्याच्या जोरावर चार वर्षे अभ्यास केला. ही मेहनत कामी आली, यात यश आले. माझ्या समाजाला माझी नेहमीच मदत राहील. त्यांनी मुख्य प्रवाहात येऊन स्वतःची लढाई, स्वतः लढावी. मोठे अधिकारी बनावे, हीच माझी अपेक्षा आहे.
– राहुल राजपूत, यशस्वी उमेदवार



