Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनरायगड

संविधान दिनानिमित्त ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉमध्ये अमली पदार्थविरोधी जनजागृती व सायबर सुरक्षेवर मार्गदर्शन

तुषार थळे, बिनधास्त न्यूज प्रतिनिधी

0 6 7 7 6 5

संविधान दिनानिमित्त ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉमध्ये अमली पदार्थविरोधी जनजागृती व सायबर सुरक्षेवर मार्गदर्शन

संविधानिक मूल्ये, नागरिकांची कर्तव्ये, युवा सहभाग आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीचा मान्यवरांचा संदेश

तुषार थळे, बिनधास्त न्यूज प्रतिनिधी
अलिबाग, जि. रायगड

अलिबाग, (दि. २५ नोव्हेंबर) : संविधान दिन २०२६ निमित्त ‘मेरा युवा भारत, अलिबाग – रायगड’ (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार) आणि जनता शिक्षण मंडळाचे ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या सहकार्याने विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. डॉ. गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी संविधानिक मूल्ये, नागरिकांची कर्तव्ये, युवा सहभाग, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय श्री. किशोर साळे यांनी अमली पदार्थांची वाढती उपलब्धता, सेवन आणि त्यासंबंधित गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी सजग राहण्याचे आवाहन केले. अमली पदार्थांपासून स्वतः दूर राहण्याबरोबरच मित्रपरिवार व समाजातील इतरांना यापासून परावृत्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. अमली पदार्थांची तस्करी किंवा संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यास पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे स्वरूप स्पष्ट करून विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षिततेबाबत आवश्यक खबरदारी आणि सतर्कतेचे महत्त्व पटवून दिले.

विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. नीलम हजारे यांनी अमली पदार्थांचे स्वरूप, त्यांची निर्मिती, भारतात त्यांची आयात व वितरण होणारे मार्ग यांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, विकसित भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या युवकांनी अमली पदार्थांच्या विरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.

सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुचेता साळवी यांनी भारताच्या युवा शक्तीचे महत्त्व अधोरेखित करत तरुणांना व्यसनांच्या आहारी जाण्यापासून परावृत्त करण्याची गरज व्यक्त केली. अमली पदार्थांच्या विळख्यामुळे युवकांची क्षमता, ऊर्जा आणि देशाच्या विकासातील योगदान बाधित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार व कर्तव्यांचे महत्त्व विशद करत त्यांनी विद्यार्थ्यांकडून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून घेतले.
कार्यक्रमात प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या कु. तपस्वी गोंधळी यांनी प्रास्ताविक सादर करून नशामुक्तीविषयक ध्वनीचित्रफीत दाखवली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनही त्यांनी केले.

जे.एस.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. नॅक समन्वयक प्रा. नीलम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी डी.एल.एल.ई. विभाग प्रमुख प्रा. कौशिक बोडस, प्रा. सूरज पुरी आणि लिगल एड सेल प्रमुख प्रा. चिन्मय राणे यांनी पार पाडली. यावेळी महिला विभाग कक्ष प्रमुख प्रा. वर्षा पाटील, प्रा. डॉ. संदिप घाडगे, प्रा. पियुषा पाटील, प्रा. स्वराली साईकर, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून युवकांमध्ये संविधानिक जाणिवा, सामाजिक जबाबदारी, नशामुक्त जीवन आणि सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. युवा शक्तीने संविधानिक मूल्यांचा अंगीकार करून सामाजिक हितासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन या कार्यक्रमातून करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 7 6 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे