उजाड माळरानावर माणुसकीचे नंदनवन फुलविणारे महामानव: बाबा आमटे
संकलन: भुमेश्वरी सातपुते खोंडे ता उमरेड जि.नागपूर

उजाड माळरानावर माणुसकीचे नंदनवन फुलविणारे महामानव: बाबा आमटे
माझ्या जडणघडणीत माझ्या आईचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. वरोऱ्यापासून पाच-सहा मैलावर गोरजे गावात माझ्या वडिलांची मालगुजारी होती. माझे बालपण अतिशय थाटामाटात व श्रीमंतीत गेले. मी वडिलांशी दूरदूर व भिऊन वागत असे. पण आईशी मात्र माझी फार जवळीक होती. माझी आई स्वतंत्र वृत्तीची व इतरांपेक्षा वेगळीच होती. आई स्वतः चित्रे काढायची. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ती चतुराईने द्यायची. आई समाधानकारक उत्तरे देत असल्याने माझी जिज्ञासा वाढली. लहानपणी माझी आई मला एक पटकोडगे बाहुले खेळायला देई. हे बाहुले खाली पडले तरी आपोआप उठून बसे. तेव्हा त्या बाहुल्याकडे बघून आई सांगायची, “अरे आयुष्यात असेच पराभवाचे, भुईसपाट होण्याचे प्रसंग येतील, पण अशा वेळेला भिऊ नकोस, हरलो तरी माणसासारखे लढणे हेच जीवनाचे दुसरे नाव आहे!” आईचे हे बोलणे माझ्या मनावर इतके ठसले की हेच मी माझ्या जीवनकार्याच ध्येय बनविले. कुष्ठरोगासारख्या व्याधीने ग्रस्त असलेल्या, मरणप्राय यातना सोसणाऱ्या, जगण्याची आसक्ती नष्ट होऊन पडलेल्या हजारो दुःखितांना मी जगण्याची चेतना देऊ शकलो ते माझ्या आईमुळेच !
संकलन: भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता उमरेड जि.नागपूर
==========



