Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

असंही घडतं कधी कधी…!!

सौ. स्वाती मराडे-आटोळे

0 4 8 2 9 0

असंही घडतं कधी कधी…!!

एके दिवशी कामात असताना अचानक अनोळखी नंबरवरून फोन आला. एकतर काम चालू त्यात अनोळखी नंबर.. घ्यावा की नाही विचार करत होते.? पुन्हा वाटले पाहूया कोणं आहे ते. नाहीतर कट करता येईल. फोन उचलला तर पलीकडून आवाज, ‘ओळखलं का ?’ एकतर हा आवाज पहिल्यांदाच ऐकत होते आणि हा सरळसरळ विचारतोय ओळखलं का? ‘नाही, कोण बोलतंय?’ ‘अगं मी शिंदेवाडीचा बाबू.. आठवलं का?’ ‘डोक्यावर ताण दिला तरी चेहराच काय, नावही आठवेना. ‘साॅरी.. नाही ना आठवत?’ थोडा ताण कमी व्हावा म्हणून मीच हसत म्हटले, ‘बहुतेक मेमरीसाठी बदाम खावे लागतील मला. पण मी बरी लक्षात राहिले बाबा तुझ्या..!’ ‘अगं शाळेत नाही का तू मला राखी बांधली होतीस. त्यामुळे तू पक्की लक्षात आहेस माझ्या.’ ओहहह.. हे ऐकून मला मग शाळा आठवली आणि जरा हायसं वाटलं. ‘हो का? असेल.. असेल. ते पण आठवेना बघ मला. तू एक काम कर, फोन ठेवला की तुझा फोटो दे पाठवून.’ आणखी थोडंफार बोलणं झालं नि फोन ठेवल्यावर त्याने फोटो पाठवला व एकेक पदर उलगडत शाळेतल्या रक्षाबंधनाजवळ मन पोहोचले. कधी कधी मनात आलेली वेगळीच शंका चुकीची ठरते व मन एका चांगल्या आठवणीत हरवून जाते.. असंही घडतं कधीकधी.

आणखी एक असाच अनुभव. माझी व मैत्रीणीची शाॅपिंग सुरू होती. मी जरा तिच्यापासून थोड्या अंतरावर काही घेत होते. तेव्हा तिला ओळखून एकजण तिच्याजवळ आला. ओळख सांगितली व माझ्याविषयी विचारले. तिने माझ्याकडे बोट केले. तो माझ्यासमोर. ओळखलं का मी अमुकतमुक. नाव ऐकल्यावर माझ्या लक्षात आले. तेव्हा त्याच्याकडे फोन नव्हता. माझा नंबर दे म्हणाला पण नेमका पेन जवळ नव्हता. तुझ्या फोनमध्ये माझ्या घरातील नंबर घे आणि मला फोन कर असे म्हणून तो गेला. अर्थात मी फोन करणारच नव्हते. दोन तीन महिन्यांनी त्याने कुठूनतरी माझा नंबर मिळवला. अनोळखी नंबरवरून त्याचा फोन आला. ‘हा नंबर ऑफिसमधला आहे सेव करून ठेव.’ तोही नंबर मी सेव केला नाहीच. आपण कुठे फोन करणार आहे म्हणून. पुन्हा महिनाभराने ऑफिसमधल्या दुसऱ्या नंबरवरून त्याचा फोन. मनात उगाच शंका आली. हा फोन का करतोय ? पुन्हा घ्यायचाच नाही फोन असा नंबर दिसला की. पण नाही गं.. तो तर किती व्यवस्थित बोलतो. उगाच कशाला ताण देतेस मेंदूला असंही वाटलं.

आणखी महिनाभराने पुन्हा वेगळ्याच नंबरवरून त्याचा फोन. एकतर बाहेर स्पिकरचा मोठा आवाज चाललेला व माझेही काम चालू होते त्यात याचा फोन. मी वैतागले तरीही शांत राहून सांगितले गोंगाटामुळे आवाज येत नाही. मी थोड्या वेळाने फोन करते. मी फोन करणार नव्हतेच. थोड्या वेळाने त्याचा पुन्हा फोन आला यावेळी मी त्याला थोडं खडसावणारच होते. पण तो म्हणाला, ‘अगं मी गडबडीत यासाठी फोन केला की आता रक्षाबंधन जवळ येतंय तर तुला गिफ्ट घेऊन पाठवायचंय किंवा तू गिफ्ट घे मी तुला पैसे पाठवतो.’ माझा पारा गपकन खाली आला आणि खुश होऊन मी म्हटले, ‘अरे तू विचारलंस हेच खूप मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. पुन्हा आपली कधी भेट होईल तेव्हा गिफ्ट दे. आता खरेच नको.’ बरं झालं मी आधी त्याचं ऐकलं तरी. नाहीतर उगाचच त्याला बोलले असते. खरंय ना.. असेही गैरसमज होतात ना कधीकधी. येणाऱ्या रक्षाबंधनच्या निमित्ताने हे दोन्ही प्रसंग आठवले.

सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे