अस्थिरतेतही एक अद्भुत समाधान शोधते ते ‘मन उधाण वा-याचे’; सविता पाटील ठाकरे
'बुधवारीय काव्यरत्न' स्पर्धेचे परीक्षण

अस्थिरतेतही एक अद्भुत समाधान शोधते ते ‘मन उधाण वा-याचे’; सविता पाटील ठाकरे
‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेचे परीक्षण
मायेच्या हळव्या…
स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात…
धुंद मोहरते,
मन उधाण वाऱ्याचे,
गुज पावसाचे…
का होते बेभान,
कसे गहिवरते…
या गाण्यात मानवी मनाच्या चंचल आणि हळव्या अवस्थेचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. हे गाणे मनाला उभारी देणारे आणि सकारात्मकता निर्माण करणारे आहे. ‘मन उधाण वाऱ्याचे अर्थात….प्रेमाच्या पहिल्या धुंद झंकाराची जिवंत अनुभूती, मनाच्या गाभाऱ्यात दडलेल्या कोवळ्या भावनांना जणू सुवर्णाक्षरांनी कोरलेला शब्द.’ ‘उधाण’ हा शब्दच किती बोलका! उधाण म्हणजे सीमांचे भान हरपणे, बंधनांचे विस्मरण होणे, आणि एका अदृश्य शक्तीच्या ओढीने भरकटत जाणे. प्रेमात पडलेले मनही असेच असते ते तर्काच्या चौकटी मोडते, व्यवहाराच्या सीमारेषा ओलांडते, आणि स्वप्नांच्या अथांग नभात भरारी घेते.
“मन उधाण वाऱ्याचे……” अर्थात मनाची अस्थिरता प्रिय व्यक्तीचा केवळ स्पर्श नव्हे, तर तिच्या अस्तित्वाची जाणीवसुद्धा मनाला अस्वस्थ करते हे स्पष्ट करते. प्रत्येक श्वासात तिचा सुगंध, प्रत्येक ठोक्यात तिची चाहूल, प्रत्येक क्षणात तिची प्रतिमा सामावलेली असते. या प्रणयभूत संकल्पनेत केवळ आकर्षण नाही, तर एक आत्मीयता आहे. जणू दोन जीवांमधील अदृश्य बंध एकमेकांना सतत हाक देत आहेत. मनाला कळत नाही की, ही ओढ कशाची आहे ती शब्दांत मावत नाही तर ती अनुभवांतूनच उमलते.
वारा…..जो दिसत नाही, पण जाणवतो प्रेमही तसेच. ते पकडता येत नाही, पण मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याची चाहूल असते. वाऱ्याची झुळूक जशी अंगावरून सरकते आणि अंगावर रोमांच उभे करते, तसेच प्रिय व्यक्तीची आठवण मनाच्या तारा झंकारून जाते. ‘मन उधाण वाऱ्याचे’ हे प्रेमाच्या त्या टप्प्याचे चित्रण आहे, जिथे मन स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. ते भिरभिरते, धुंद होते, आणि तरीही त्या अस्थिरतेतच एक अद्भुत समाधान शोधते. आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी “मन उधाण वाऱ्याचे” हा विषय दिला.या विषयाने सर्वच समूहात प्रेमाच्या तारा छेडल्यात.
आज धुलीवंदन… धुलीवंदन हा केवळ रंगांचा सण नाही तर तो मनाच्या अंतरंगात साचलेल्या धुळीला झटकण्याचा क्षण आहे. वर्षभर आपण नकळत अहंकार, स्पर्धा, मत्सर, अपेक्षा यांचा थर मनावर चढवत राहतो. आणि मग एक दिवस येतो ज्या दिवशी रंगांच्या उधळणीत आपण स्वतःलाच विसरतो. “मन उधाण वाऱ्याचे” ही अवस्था धुलीवंदनात प्रकर्षाने जाणवते. वारा जसा कोणत्याही बंधनात अडकत नाही, तसंच त्या दिवशी मनही साचेबद्ध चौकटी मोडून बाहेर पडतं. रंग लावतांना आपण समोरच्या व्यक्तीचा दर्जा, वय, भेद विसरतो. त्या क्षणी उरते ती केवळ माणुसकीची ओळख.
धुळीच्या कणांतून उगवणारा हा रंगोत्सव आपल्याला शिकवतो… जीवन म्हणजे सतत बदलत राहणारी रंगपंचमी. मन उधाण वाऱ्यासारखं मुक्त ठेवलं, तर प्रत्येक दिवस धुलीवंदनासारखा नवचैतन्यमय होऊ शकतो. अर्थात आज सर्वांनी आपापल्या परीने विषयाला योग्य न्याय दिला व सर्वच समूहात धुलीवंदन सारखी काव्यरंगांची उधळण पहावयास मिळाली. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन आणि पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा…!!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



