“शेती हा जुगार नसून जगाला पोसणारा रोजगार व्हायला हवा”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
“शेती हा जुगार नसून जगाला पोसणारा रोजगार व्हायला हवा”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
‘परिवर्तन हा संसाराचा नियम आहे’. काळाचा महिमा इतका अगाध आहे की, कधीकाळी आपण एखादी गोष्ट त्याज्य ठरवली, दुर्लक्षित केली किंवा तिच्यापासून दूर गेलो, तर पुढे कधीतरी फिरून त्याच गोष्टीची अपरिहार्यता, काळ आपल्याला पटवून देतो आणि ती आपण स्वीकारतो. शेती ही एक त्यातलीच गोष्ट आहे. आज घटते रोजगार आणि सुशिक्षित बेरोजगारांची संख्या पाहता उदरभरणासाठी शेती हाच पर्याय असू शकतो. जगाच्या पाठीवर कुठेही अशी प्रयोगशाळा नाही की, जिथे अन्नधान्य कृत्रिम पद्धतीने बनवले जाऊ शकते. यासाठी निसर्ग आणि शेतीवरच अवलंबून रहावे लागणार आहे.
भारत एक कृषिप्रधान देश आहे. मात्र शेतीकडे तरूणाला आकर्षित करण्यासाठी खूप मोठी कृषिक्रांती घडवून आणणे आवश्यक आहे. पारंपारिकता, आधुनिकता आणि विज्ञानाची सांगड घालत उत्पादन वाढीचे प्रयोग करणे आवश्यक आहे. याकरता स्वतंत्र कृषी धोरण आणि स्वतंत्र कृषी अर्थसंकल्पाची योजना आखून, तरूण वर्गाला शेतीकडे वळवणे गरजेचे आहे. कर्ज हा एक हातभार होऊ शकतो पर्याय नाही. इस्त्रायल सारख्या देशाने केलेली कृषिक्रांती विचार करण्यासारखी आहे.
आज तरुणांना आयटी क्षेत्राचे प्रचंड आकर्षण आहे. असायला हरकत नाही मात्र आय टी मध्ये ऐटीत वावरणाऱ्यांना आयती भाकरी बनवता येत नाही. त्यासाठी मातीतच यावे लागते. आज भारतात बहुचर्चित असलेला नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात उतरवल्यास खूप मोठी क्रांती दृष्टीक्षेपात येऊ शकते. “शेती हा एक जुगार आहे” ही संकल्पना मोडीत काढून “शेती म्हणजे जगाला पोसणारा रोजगार आहे” हे सिद्ध करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती जागृत होणे आवश्यक आहे. कारण प्रचंड संख्येचा युवा वर्ग ही देशाची खरी ताकद आहे. ती बेरोजगारीमुळे नैराश्यात न जाता त्यांना शेतीत आशेचा किरण दिसायला हवा आहे. प्रयोगशील शेतकरी बनवण्यास शासनाने पुढाकार घेऊन उपलब्ध संसाधनात नाविन्यपूर्ण योजना आखत शेतीव्यवसायाला पुनर्जीवित करणे काळाची गरज आहे. शेवटी धरणी आईची माया कधीच वाया जाणारी नसते. फक्त तिच्यासाठी काया झिजवायची तयारी असायला हवी.
शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेकरीता आदरणीय राहुल दादांनी दिलेले चित्र हेच दर्शवते की, यापुढे शेतीचा ताबा समस्त युवावर्गाने घ्यायला हवा. अर्थार्जनाचे खुंटलेले मार्ग प्रशस्त करण्यासाठी आधुनिक पद्धतीने काळ्या आईची ओटी भरल्यास नक्कीच घराघरात सुख समृद्धी येईल यात शंका नाही. सर्व हायकूकारांना शुभेच्छा.. आणि मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहूल दादांचे मनःपूर्वक आभार.
- विष्णू संकपाळ, बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य/परीक्षक/सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह