मैत्रीचे पान
वसुधा वैभव नाईक
मैत्रीचे पान
मित्र म्हटले की, पहिले वर्गातले आपल्या बेंच पार्टनर असतात ते आठवतात. लहानपणीची मस्ती आठवते. तो बेंच, केलेली मजा, खेळलेले खेळ, मारामारी त्या सर्व आठवणी जाग्या होतात. पुढे आपण कॉलेज लाईफ मध्ये गेल्यानंतर तिथे अभ्यास आणि मजा दोन्ही चालू असतं. इथले मित्र जरा वेगळे होतात. पहिली ते दहावीच्या मुलांची साथ इथे असेलच असे नसते. अगदी ठराविक मुलं आपल्याबरोबर असतात. कॉलेज लाईफची मैत्री जरा आपल्याच धुंदीत असते. मुलींची छेड काढणे, मुलींना त्रास देणं, शिक्षकांचा न ऐकणं, असे काहीसे चालू होते. काही मुले असतात प्रामाणिक अभ्यासाशी ते वेगळे.
कॉलेज लाईफ नंतर येते ते नोकरीतला जीवन. नोकरी लागल्यानंतर येथील आपला बॉस आपला फ्रेंड सर्कल बदलतं. कामाच्या गोष्टी होऊ लागतात. नवनवीन शिकण्याचं हे वय असतं. नवीन शिकून पैसे कमवण्याचे हे वय. मग आता संसारात पडायचं, प्रपंचात पडायचं. मग मुलाला मुलगी बघणं होतं, मुलीला मुलगा बघणं होतं. नाही तर ठरलेला आहेच आपला प्रेम विवाह. आता मात्र कौटुंबिक जीवन सुरुवात होते. या कुटुंबात एकत्र राहताना विचारांची देवाणघेवाण, आर्थिक अडचणी, कुटुंबातील वादविवाद, इत्यादींना सर्वांना सामोरे जावे लागते.
अशातच संसाराच्या वेलीवर फुले फुलायला लागतात. त्यांची जोपासना होते, संगोपन होते. कुटुंबातील सर्व एकमेकांचा आधार असतात. एकमेकांच्या साथीने मुलांचा सांभाळ होतो. पण हल्ली संसार करणाऱ्या ह्या दोघांना घरात वयोवृद्ध नको असतात. मग ह्या मुलाला वाढवला जात पाळणा घरात. पण काही ठिकाणी असंही आहे की, मुलांच्या संगोपनासाठी आई-वडिलांना जवळ केले जाते. मग मुलाचे संगोपन आजी-आजोबांच्या सानिध्यात उत्तम होते. आता आली चाळीशी. आता मात्र जरा घर सोडून आपण काहीतरी करावे. नोकरीतून आपल्याला विरंगुळा मिळावा. यासाठी पूर्वीचे मित्र संशोधन चालू होते. पहिली ते दहावीचे बॅच आठवण येते. फोन नंबर शोधले जातात.
आजकाल फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअप इत्यादी मीडियामुळे आपल्याला आपला मित्र कुठे ना कुठेतरी सापडतो. मग बोलणे व्हायला सुरुवात होते. आपण त्यांच्या मेळाव्यात रमून जातो. सुखदुःखाची देवाण-घेवाण व्हायला सुरुवात होते. शाळेमध्ये शिक्षकांना घेऊन गेट-टुगेदर केले जाते. मस्त फोटो सेशन होते. व्हिडिओज काढले जातात. आपल्या जुन्या शाळेत आपण परत एकत्र आलो आहोत त्याचा अभिमान सर्वांना वाटतो. आणि एक दिवसाच्या आठवणींच्या ह्या मेळाव्यात आनंदाची शिदोरी घेऊन पुढील प्रवासाला परत सुरुवात केली जाते. पुन्हा तेच घर, पुन्हा मुलं, पुन्हा नवरा बायको, पुन्हा तोच जॉब इकडे वळावेच लागते ना! ते सोडून कुठे चालतंय. पण हा एक दोन दिवसाचा विरंगुळा खूप आनंद देऊन जातो.
काही ठिकाणी मैत्री खरच घनिष्ठ असते. तिथे पैशांचा विचार न करता माणुसकीचा विचार केला जातो.आणि मैत्रीमध्ये पैसा आला की मैत्री तुटते. खास पैशांचा व्यवहार असा आहे की जर आपण व्यवस्थित परत केला तर मैत्री टिकून राहते. वेळेवर आपण पैसा घेतो पण वेळेवर द्यायला जमला नाही तर आपल्या मित्रालाही वाईट वाटतं. कारण, त्याने तो आपल्याला मिळवून दिलेला असतो. आपण परत देताना मात्र वेळेवर देत नाही. यामुळे कदाचित दोन मित्रांमध्ये मैत्रीचे नाते संपुष्टात येऊ शकते. पण जिथे मैत्री घनिष्ठ आहे. तिथे समजून घेऊन वागले जाते.
मित्रांनो ‘मैत्रीचे पान’ आपल्या जीवनात असावेच, या मैत्रीच्या पानावर निखळ आनंद लिहायचा असतो. दुःखाचे पान वगळून टाकायचे असते. चला तर मित्रांनो आपण आजपासून असं एक ठरू या की, प्रत्येक दिवशी आपल्या मैत्रीच्या पानावर नव्याने काय आनंद घ्यायचा आहे? हे आपणच ठरवायचे आहे. आणि जगातला सर्वात मोठा आनंद आपल्याला मिळवायचा आहे हे विसरायचं नाही.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
=====



