Breaking
आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“आनंदोत्सवाचे प्रतिक म्हणून, अशी उभारावी गुढी”; स्वाती मराडे

गुरूवारीय 'चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 5 1 6 4 1

“आनंदोत्सवाचे प्रतिक म्हणून, अशी उभारावी गुढी”; स्वाती मराडे

गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

वसंत ऋतू घेऊन आला, चैतन्याचा बहर
वृक्षलतांनी रंग उधळता, उमटे आनंदाची लहर..,
रानोरानी खाऊन मेवा, तृप्त जाहली मनी पाखरे
दिस सुगीचे सुरु जाहले, धनधान्ये भरली कोठारे…”

इवल्या पांढऱ्या फुलांनी नटलेला कडुनिंब, कैऱ्यांनी लगडलेला आम्रतरू, झाडांवर पानांऐवजी लालसर ज्योतींचे निरांजन आहेत की काय असा भास होणारी पळसफुले, चांदण्यांनी झाडावर लगडावे तसे फुललेली मोगरा, जुई, शेवंतीची गोंडस फुले.. गंध व रंगांची लयलूट करणारा वसंत, आमराईतील लयदार कोकीळकुजन, नवपल्लवीत झालेले लतावृक्ष, कुठे सोनसाज लेऊन काढणीस आलेली पिके, तर कुठे धान्याच्या राशींनी ओसंडणारी खळी, ती रास पाहून मन भरून पावणारा बळीराजा, उत्तरायणाच्या मध्यावर आलेला सूर्य.. ना थंडीचा कडाका, ना ऊन्हाची काहिली‌. वातावरणात एक आल्हाददायकपणा. अशा मधुमासातील गोड वातावरणात सुरू होते नववर्षाची सुरुवात.

या आनंदोत्सवाचे प्रतिक म्हणून उभारली जाणारी गुढी. पाटावर उंच वेळूची काठी, काठीच्या शेंड्यावर साडी अथवा भरजरी वस्त्र, त्यावर कडुनिंबाची पाने, हार, गाठी व तांबडा कलश उपडा करुन, घरासमोर गुढी उभारली जाते. त्यास गूळ व कडुलिंबाची पाने एकत्र करून नैवेद्य दाखवला जातो. गुढी म्हणजे बहर, चैतन्य, आनंद, उत्साह, आशा.. हिंदूंचा नववर्ष सण. एकमेकांत असलेली कटुता विसरून गुळाचा गोडवा नात्यात व जगण्यात आणणारा सण. त्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्यात पित्त प्रकोप होऊ नये म्हणून या सणाच्या निमित्ताने केले जाणारे कडुलिंबाचे सेवन.. मनाचे व शरीराचे आरोग्य जपणारेच.

गुढी उभारताना ती कशी उभारावी, उभारावी की नाही याविषयी काही मतमतांतरे आढळतात. सामान्य माणूस त्यामुळे बुचकळ्यात पडतो व शंकानिरसन करण्यासाठी एकमेकांना विचारतो.. गुढी कशी उभारावी? सण उत्सव साजरे करत असताना विशेषतः स्त्रिया उत्साहाने सर्व करत असतात. त्यामुळे साहजिकच गुढी कशी उभारावी? हा प्रश्न त्यांना अधिक सतावतो. याच अनुषंगाने चर्चा करत असणाऱ्या स्त्रियांचे चित्र आज ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी आले. याशिवाय यावर्षी या सणाच्या आनंदास गालबोट लावणाऱ्या जागतिक पातळीवरील घटना पाहता ‘गुढी कशी उभारावी ?’ हा भावनिक प्रश्नदेखील मनास पडतो. युद्धामुळे अनेकांचे आप्तस्वकीय परदेशी अडकले आहेत. गॅस, इंधन कमतरता यासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अवकाळी पावसाचे सावट व त्यामुळे वाढलेली उन्हाची काहिली.. माणसासोबत निसर्गसुद्धा विपरीत वागू पाहतोय व उत्साहाची उधळण करणाऱ्या सणासही नजर लावतोय असेच वाटू लागले.

तरीही आशावाद पेरत सकारात्मकता जपणारी आपली भारतीय संस्कृती.. कटूगोड आठवणी आनंदाने गिळून, नववर्षाचे स्वागत करू, सर्व मिळून.. असं म्हणत हे नववर्ष सुखदायी होवो अशी ईशाकडे प्रार्थना केली जाते. सणांच्या निमित्ताने का होईना मनातील मरगळ, निराशा झटकली जाते‌. गुढी कशी उभारावी? यासारख्या प्रश्नावरही मात केली जाते. हीच तर ताकद असते सण उत्सवांमध्ये.

आज ‘गुरूवारीय चित्रचारोळी’ स्पर्धेसाठी आलेल्या सर्वच रचना आशयघन. युद्ध, महागाई, अवकाळी, वाढलेली उन्हं, बाहेरगावी अडकलं जाणं, संभाजीराजांची आठवण.. या अनेकविध आशयावर, अडचणी असल्या तरी त्यावर सकारात्मक विचारांची मात. त्यामुळे आपसूकच मनातून ‘वाहह’ अशी दाद आली. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार. ‌

स्वाती मराडे, इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक/लेखिका/कवयित्री
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 4 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे