“फाटक्या गोधडीतील उब देणारी आठवणीतील …लाडाची आजी”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“फाटक्या गोधडीतील उब देणारी आठवणीतील …लाडाची आजी”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘आजी गं आजी , कर ना भाजी, ताजी ताजी’; नातवंडावूनही लहान होऊन त्यांचे बालपण जपणारी व्यक्ती, नातवंडांसाठी प्रेमाचा ओलावा, घासातला घास भरवणारी, सुट्ट्यांमध्ये आतुरतेने वाट पाहणारी, नातवंडांची खुशी, गोड गोड गाणी, गप्पा, गोष्टी , अंगाई गीत, मायेची उब, खरबरीत पण प्रेमळ स्पर्श, डोळ्यातील आतुरता, गालावरून फिरणारा मायेचा हात, साजूक तुपातील गोड भात म्हणजेच लाडाची आजी…. खरं आहे ना हे?
कोणी कोणी अनुभवले आहेत, आपापल्या आजींचे प्रेमळ अनुभव? खरंच ती माणसे खूप नशीबवान. ज्या घरांमध्ये आजी-आजोबा आहेत ते घर म्हणजे देवघरच म्हणायला हरकत नाही. कारण, त्या प्रेमळ देवांचा वावर सतत त्या घरामध्ये असतो. घरात मोठ्यांचा आधार असणे खरंच सौभाग्याची गोष्ट आहे. मुलांचे बालपण तेथेच तर फुलते, उमलते,खेळते,हसते,नाचते, बागडते … नाही का?
आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये थोडेसे मौन होऊन पहा..! एकटी बसणारी मुले विमनस्क अवस्थेत किंवा मोबाईल मध्ये गुंतलेली, ज्यांच्या आयुष्यात ना खेळ, ना गप्पा, गोष्टी ,गाणे यांचा वावर असतो. एकाकी होऊन जगताहेत अगदी. नको वाटत आहेत जुनी खोडं लोकांना पण त्या जुन्या खोडाने दिलेला आधार किती महत्त्वाचा आहे, त्यांची जुनाट सावली केवढे अनुभवाचे भांडार घेऊन आलेली आहे, त्यांच्या जुनाट गोधडी मध्ये जगावेगळी सुरक्षितता मायेची उब लपलेली आहे, हे विसरू नका.
ज्या घरात आजी-आजोबांचे प्रेम मिळते ती मुले वेगळीच असतात. एकमेकांना समजून घेणारी, प्रेमळ, सुसमायोजित, एकमेकांना मदत करणारी, पटकन माफ करणारी, हट्टी नसणारी.. आजी आजोबांचे प्रेमळ छत्र जणू सध्या हरवले आहे ज्यांना आजी-आजोबा नाहीत ते तर दुर्दैवीच परंतु ज्यांच्याकडे आजी-आजोबांचे छत्र आहे आणि हे छत्र वृद्धाश्रमात किंवा कुठल्यातरी मंदिरात ,रस्त्याच्या कडेला आढळून येत असेल तर यापेक्षा दुर्दैव ते कोणते!
नातवंडांना सर्वात जवळचे असणारे हे प्रेमळ खोड “लाडाची आजी” आज समूहामध्ये प्रेमाचा वर्षाव घेऊन आली. प्रत्येक शिलेदारांनी आपापल्या बालपणीच्या प्रेमळ आठवणींना उजाळा देण्याचे काम केले. आजीकडून करून घेतलेले कोड कौतुक मांडण्याचा छानसा प्रयत्न सर्वांनी केला. आपण ज्या आजी आजोबांच्या छत्राखाली वाढलो तेच छत्र आपल्या मुलांना देण्याचा संकल्प करूयात. घरातील या फाटक्या गोधडीतील उबेला जपुयात आणि मुलांसमोर आपल्या वृद्धात्वाचा निवारा आपणच निर्माण करूयात…. तरच दिलेल्या विषयाचा काहीतरी उपयोग झाला असे म्हणता येईल.
कदाचित हे खोड जपण्यासाठीच राहुल दादांनी ‘लाडाची आजी’ हा विषय दिला असावा. आपल्या आजी आजोबांच्या आठवणींना उजाळा देऊन आपण आजी आजोबा होण्याचे सुख, नातवंडांबरोबर पुन्हा बालपण जगण्याचा आनंद कदाचित आपल्याला पुढे उपभोगता यावा याची पूर्वतयारीच म्हणून हा विषय राहुल दादांच्या संकल्पनेतून पुढे आला. मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल राहुल दादांचे शतशः ऋण! चला तर मग, “करूया संकल्प, जपूया घरातील वृद्धत्व, वृध्दींगत करूया पुन्हा मातृत्व, अन् शिकवू नव पिढीला दातृत्व..”!!
शर्मिला देशमुख -घुमरे बीड
मुख्य परीक्षक/कवयित्री/ लेखिका
©सहप्रशासक,संकलक मराठीचे शिलेदार समूह



