काजळी
तू सहसा डोळ्यांनीच बोलतोस..
अलगद कानी येतात माझ्या..
आवाज न करता येणारे शब्द..
वाचता येतात सहजपणे…
पापण्यांआड दडलेले भाव निशब्द…!
तुझी स्नेहार्द नजर शलाका…
खूप काही सांगून जाते..
नैराश्याने काळवंडलेल्या मनात..
आशेचा नंदादीप उजळून जाते..
प्रकाशमान होतो मनगाभारा..
आणि निराशेची काजळी..
आपोआप दूर होते…
नाउमेद मनाला…
मिळते नवी उभारी…
आणि निस्तेज मलूल मी…
बनते नव्याने करारी…
तू असा “प्रतिमाबद्ध” …
तरीही साधतोस मूक संवाद…
माझ्या अंतर्मनाच्या सादेला…
तू देतोस हळूच प्रतिसाद…
आणि मला जाणीव होते..
इथे मी एकटी नाही…
तुझी उणीव मात्र…
कदापी भरून निघणार नाही…
मात्र तू सोबत असल्याची…
मला निःसंदिग्ध मिळते ग्वाही..
म्हणून तर लढतेय निकराने..
भिडतेय आव्हानाला कोणत्याही..
कितीही थकले भागले तरी…
तुझ्या प्रतिमेसमोर उभी राहताच..
संचारते नवी ऊर्जा…
मग कशाला करू तमा?
काळजीची वा काजळीची..?
तू आहेस चिरंतर काळजात…
देहाची चितेत राख झाली तरी…
माझी चिंता वाहण्यासाठी…
बनला आहेत चिंतामणी….
तूच बनला आहेस चिंतामणी…
वर्षा मोटे पंडित
छ. संभाजीनगर



