क्षणभर किलबिलाट, विद्यार्थीरुपी पाखरांचा
वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
क्षणभर किलबिलाट, विद्यार्थीरुपी पाखरांचा
काळ पुढे सरकत राहतो. आयुष्याची पानेही त्यासोबत उलटत राहतात. पण आयुष्याच्या या प्रत्येक पानावर काही सुखद नोंदी होत राहतात. विशेष करुन शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या आमच्यासारख्या शिक्षक-शिक्षिकांच्या आयुष्याची पाने तर विद्यार्थीरूपी पाखरांच्या किलबिलाटाच्या नोंदींनी कायम भरलेली असतात आणि अजूनही भरत आहेत.
अशाच विद्यार्थीरुपी पाखरांनी २५ वर्षांपूर्वीच्या आठवणी जागवत घरी येऊन किलबिलाट केला. त्या क्षणाला जाणवले आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठी मिळकत कोणती? तर जगातील कुठल्याही रत्नांहूनही मौल्यवान असे आपले विद्यार्थी. ज्यांनी आपल्या मनाच्या एका कप्प्यात अजूनही प्राथमिक शिक्षकांना जपून ठेवलेले आहेत. दिनांक २७ डिसेंबर २०२४ ला माझ्या घरी भेटायला आलेले इयत्ता चौथी १९९९ च्या बॅचमधील दुहिता डोये, सोनाली पाथरकर, प्रीती चामलवार, अविनाश जाधव, सुमीत चोपणे. या सर्वांनी आमच्या माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट मराठी प्राथमिक शाळेच्या मु. अ.सिस्टर सौम्या, खान टिचर, नंदा टिचर यांच्या वर्गांतील आठवणींना उजाळा देत क्षणभर मनाचा गाभारा आनंदाने भरून टाकला.
त्याच दिवशी आमच्या ‘मराठीचे शिलेदार’ समूहात कवी-कवयित्रींना ‘लिहत राहा’, असे आवाहन करणारा विषय मुख्य प्रशासक राहुलदादा पाटील यांनी दिला होता. मग मनात विचार केला, आज ही पंख फुटलेली मुले आपल्या भेटीस आली त्याच आनंदाला आपण शब्दबद्ध केले तर…कारण आपल्या मनात कायमच सुखद-दुःखद आठवणींचे द्वंद्व सुरू असते. त्यांना जेव्हा आपण शब्दांत मांडतो तेव्हा सुखद क्षण दुप्पट होतात तर दुःख जरा हलके होते. याच प्रेरणेतून माझी ‘लिहत राहा’, ही रचना आकारास आली. कदाचित गुरू-शिष्यातील हे अतूट बंध मराठीचे शिलेदार समूहातील परीक्षकांना भावले आणि माझी रचना सर्वोत्कृष्ट रचना म्हणून शुक्रवारला प्रसारित करण्यात आली. त्याबद्दल मी मुख्य प्रशासक व आयोजक माननीय राहुलदादा पाटील, प्रशासक व मुख्य परीक्षक सौ. सविता पाटील ठाकरे, संस्थेच्या सचिव सौ. पल्लवीताई पाटील, विश्वस्त श्री. अरविंद उरकुडे आणि श्री. अशोक लांडगे यांचे मनापासून आभार मानते.
तसेच त्याच बॅचमधील नरेंद्र पिवाल (पीएसआय) दि. २८ डिसेंबरला २०२४ ला दूरध्वनीवरुन संपर्क साधून शाळेबद्दल अतिशय जिव्हाळ्याने बोलला…खरंच ही श्रीमंती शब्दातीत. अशा या माझ्या विद्यार्थ्यांसाठी काही ओळी….!
‘क्षितिज वाढतं, पंख फुटतात
तरीसुद्धा मनाच्या कोपऱ्यात,
विद्यार्थी आपापल्या जपतात
तेच खरं शिक्षकाचं वैभव असतं’
वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर