“सामुराई योद्धा महान, जपानचा सार्थ अभिमान”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

“सामुराई योद्धा महान, जपानचा सार्थ अभिमान”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
जगाच्या पाठीवर क्षेत्रफळाच्या दृष्टीने अशी अनेक छोटी छोटी राष्ट्रे आहेत, जी आपल्या विशिष्ट संस्कृती, परंपरा, रितीरिवाज याकरिता प्रसिद्ध आहेत. एका ठराविक कालखंडात अशा संस्कृतीचा प्रभाव अनेक काळ त्या राष्ट्रावर झालेला असतो. किंबहुना एक विशिष्ट आचार, विचार पद्धती हीच त्या राष्ट्राची ओळख बनते. कालौघात तशा व्यक्ती, समाज, आणि पद्धती जरी नष्ट झाल्या तरीही इतिहासात त्यांचे अस्तित्व कायमचे कोरले गेलेले असते. जपान हे एक जगाच्या पाठीवरचे असेच एक छोटेसे राष्ट्र जे प्रचंड देशाभिमानासाठी सुप्रसिद्ध आहे. याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास, दुसर्या महायुद्धात अमेरिकेने ऑगस्ट १९४५ मध्ये हिरोशिमा नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकून त्यांचे कंबरडेच मोडले. प्रचंड जिवित, वित्तहानी होऊनही हा भयानक हल्ला पचवून हे राष्ट्र केवळ देशाभिमानाच्या जोरावर आज जगात ताठ मानेने उभे आहे.
याच देशात बाराव्या शतकात सामुराई योद्ध्यांचा उदय झाला होता. जे रक्षक किंवा सेवा करणारा योद्धा म्हणून जगभर प्रसिद्ध तर झालेच पण जपानच्या राजकारण समाजमनावर पुढे शेकडो वर्षे यांचे वर्चस्व आणि प्रभाव होता. अत्यंत कडक व शिस्तबद्धतेसाठी प्रसिद्ध असलेले सामुराई प्रामाणिकता, धैर्य, आत्मसंयम, कर्तव्यनिष्ठा, नम्रता, आणि पराक्रम धाडस या गुणांना जपणारे आणि सर्वोच्च प्राधान्य देणारे होते. यांच्यात प्रचंड नैतिकता होती. जर एखाद्या सामुराईकडून कर्तव्यपालनात कसूर झाली तर ते स्वतःच आपले पोट चिरून आत्महत्या करीत असत.
देशप्रेम, देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा याहून वेगळी काय असू शकते? ही गाथा जो वाचेल त्या देशात कडवे देशभक्त निर्माण होणारच. याची प्रचिती आजही आपण जपानमध्ये पहातच आहोत. पुढे एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस जपानचे अत्याधुनिककरण आणि आधुनिक शैलीचे सैन्यदल स्थापित केल्यानंतर सामुराई योद्ध्यांचे विशेष हक्क अधिकार संपुष्टात आणण्यात आले. पण त्यांच्यातील कडवेपणाचा गुण मात्र वारसारूपाने देशाला लाभला यातही त्यांना नक्कीच समाधान वाटत असेल.
आज ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी दिलेले चित्र अशाच एका सामुराई योद्ध्यांचे आहे. कवच आणि शिरस्त्राण परिधान केलेला एक सामुराई योद्धा काळ्या घोड्यावर स्वार झालेला दिसतोय. मागील पार्श्वभूमी किंचित धुक्याची अर्थात हिवाळी हवामानाची दिसते. थोडक्यात हे चित्र जपानी सामुराई योद्ध्यांची संस्कृती व इतिहासाचे दर्शन घडवणारे आहे.
अशा चित्रावर हायकू काव्य लेखन करणे एक आव्हान आहे. मुळात हायकू काव्य प्रकाराचा उगम सुद्धा जपानमध्येच झाला आहे हे विशेष. त्यामुळे आपल्या रचनेत जपानी सामुराईच्या जीवनशैलीचे प्रतिबिंब दिसणे अपेक्षित आहे. चित्र विषयाचा बारकाईने अभ्यास केल्यास या गोष्टी लक्षात येतात. एकदा परिपूर्ण माहिती उपलब्ध झाली की, हायकू लिहिणे सोपे जाते. अनेकांनी स्तुत्य प्रयत्न केला आहे. आणि अनेकांना सुधारणेचा वाव आहे. सर्वांच्या लेखणीला शुभेच्छा. मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे आभार.
विष्णू संकपाळ, बजाजनगर
जि.छ. संभाजीनगर
©सहप्रशासक परीक्षक मराठीचे शिलेदार समूह



