भारतीय खव्वय्येगिरी
डॉ. अविनाश प. परांजपे वानाडोंगरी, जि. नागपूर

भारतीय खव्वय्येगिरी
खव्वय्येगिरी आणि खादाडपणा ह्यात जुने भारतीय सिनेसंगीत आणि आजकालचे ‘रॉक फॉक’ टाइपचे दडाम धडाम म्युझिक असा फरक आहे. खव्वयेगिरी मध्ये नुसते खाणे हीच कृती नसून, त्यात प्रत्येक घासासोबत त्या त्या घासाच्या किंचित किंचित बदलत्या चवीचा आणि स्वादाचा आस्वाद घेणे, त्या विलक्षण अनुभूतीसाठी डोळे, नाक, हात, दात, रसना म्हणजे जीभ आणि अंतिमत: उदर या समस्त अवयव संच्याच्या द्वारे तृप्ती नावाच्या स्वर्गीय आनंदाचा प्रत्त्यय घेणे, एवढी आनंदमय प्रक्रिया साखळी असते.
सुरुवातीला पदार्थाला डोळे भरून बघावे, डोळे तृप्त करत करत नाकाने त्याचा येणारा दरवळ दीर्घ श्वसन करत नाकाची तृप्ती मिळवावी. मग हाताने स्पर्श करून, केव्हा केव्हा गोंजारून, हवा हवासा वाटणारा त्या पदार्थाचा स्पर्शाने हस्त तृप्ती, मग हळूच तो घास मुखात घेताना त्याला झालेल्या दात आणि रसनेच्या स्पर्शामुळे ज्ञात होणारी अप्रतिम चव याने मुख तृप्ती, तदनंतर जवळ जवळ रवंथ केल्याप्रमाणे स्वाद घेत घेत पदार्थ घासा, घासाने संपवून आलेली उदरभरणाची जाणीव आणि तृप्ती, आहा:ह:! अश्या प्रकारे पंच अंगांनी तृप्त होणे, याला म्हणतात अस्सल भारतीय खव्वयेगिरी !
‘खादडपणा’ म्हणजे खाद्यपदार्थांशी धस्मुसळेपणाने वागणे. नुसते ओरबाडल्यासारखे पदार्थास घेऊन बकाबका तोंडात कोंबून गिळण्याची राक्षसी कृती. अस्सल भारतीय खव्वयेगिरीमध्ये असलेल्या आनंदमयी प्रक्रिया साखळीमुळे आपल्याला गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट ह्या षड्रसभरीत अन्न पदार्थांचा असा आस्वाद घेता येतो, की नुसते पोटच नाही; तर मन आणि आत्मा देखील आनंदविहार करीत आहे असे आपल्याला जाणवते. या प्रक्रियेदवारा अन्नप्राशन केल्याने अन्नाचे पचन देखील चांगले होते. परंतु जर आपण भोजनक्रिया आधाशीपणे खादाडखाऊ प्रकारे पार पडली, तर पचनशक्ती बिघडते. आम्लपित्त म्हणजेच अॅसिडिटी , अपचन , उदरवायू म्हणजेच गॅसेस, कफ सारख्या आजारांना आमंत्रण देणे होते.
अस्सल भारतीय खव्वयेगिरी करिता भारतीय भोजनाची व्यंजने हीच सर्वोत्तम मानली गेली आहेत. कारण आपल्या भारतासारख्या खंडप्राय देशात, हिमालयापासून रामेश्वरमच्या हिंदीमहासागर पर्यंत अफाट भूमीत अगदी बर्फाच्छादित प्रदेशापासून, वाळवंटी अतिउष्ण परिसर, हिरवळींनी युक्त सपाट गवताळ सुपीक, गहू, तांदूळ, मका, ज्वारी पिकविणार्या प्रदेशापासून पाणथळ दलदलीचा प्रदेश, समुद्रकिनारपट्टीच्या नारळ, काजू, सुपारी, फणस सारख्या पासून उष्ण प्रदेशातील खजूर, खारीक, अक्रोड सारख्या पिकांच्या समृद्धतेने नटलेल्या आमच्या भारतवर्ष भूमीत, तितक्याच विविध प्रकारच्या जनसमुहांची पण रुजवात झाली.
आपआपल्या प्रदेशातील हवामानानुसार, पचनास सुलभ असे शाकाहारी तथा मांसाहारी अतिविविध प्रकारचे, आयुर्वेदाच्या आधारित पौष्टिक, चविष्ट पदार्थ याच जनसमुहांचीच देणगी आहे. हे पदार्थ बनविण्याच्या पाकक्रिया ह्या देखील अतिविविध आहेत. त्या नुसारच असलेले पदार्थ हे त्या त्या प्रदेशांच्या नावाने जगप्रसिद्ध झाले आहेत. जसे लोकप्रिय पंजाबी पदार्थ सरसोका साग, मक्काई की रोटी , छोले भटूरे, पनीर मसाला, राजमा मसाला, बटर चिकन, चिकन तंदुरी,अमृतसरी कुलचा, नान , लच्छा पराठा. राजस्थानी पदार्थ , जसे दाल बाटी चुरमा,गट्टे की सब्जी, लाल मांस , पापड की सब्जी, बाजारे की रोटी, मिस्सी रोटी, घीवर, मालपुवा , बादाम का हलवा, गुजराती पदार्थ, ढोकळा, खाकरा, ठेपला, खामण, गाठीया , मराठी पदार्थ, साबुदाणा खिचडी, थालीपीठ , पुरणपोळी ,कोथिंबीर वडी, बटाटेवडा, आळूवडी, भाकरी, वरण भात, सोलकढी, उसळी, वडे, कोल्हापुरी मटन , सावजी मटन, मालवणी फिश करी, बासुंदी, दक्षिण भारतीय पदार्थ, इडली, डोसा, अप्पे, उतप्पम, सांभार, रस्सम, वेगवेगळे भात, तामिळ किंवा केरळा फिश करी. आता हा काही उपहारगृहाचा मेनू नव्हे. तर त्या त्या प्रदेशांगिक पदार्थांची यादी, त्या त्या परदेशात उत्पन्न होणार्या वस्तूंनाच्या उपयोगाने कसकसे उत्तम पदार्थ बनविता येतात आणि ते त्या त्या प्रदेशच्या वातावरणाला सूट करणारे असतात.
आपल्याला असेही जाणविते की पंजाबी डिशेष ह्या सरदारजी किंवा पंजाबी व्यक्तींनीच बनविल्या तरच, राजस्थानी पदार्थ राजस्थानी लोकांनी, मराठी पदार्थ मराठी लोकांनी व दक्षिणात्य पदार्थ त्या, त्या लोकांनी बनविले तरच आपल्याला त्या प्रकारे खरे रुचकर लागतात. म्हणूनच घरी डोसा बनविण्यास आणलेल्या आयत्या डोसा बॅटरचे घरी केलेले डोसे साऊथ इंडियन रेस्टोरेंट एवढे चांगले कधीच लागत नसतात. इतक्या समृद्ध खाद्यसंस्कृती असलेल्या देशातील लोक आज केवळ आपले स्टेटस दाखविण्यासाठी किंवा फॅशन म्हणून ते पाश्चिमात्य पिझ्झा, बर्गर, सँडविच , वगैरे केवळ मैद्याचे पदार्थ खातात , किंवा चायनीज नावाने व्हीनेगार सॉस टाकलेले केमिकल युक्त पदार्थ का खातात याचे इतर देशातील विचारवंत लोक आश्चर्य व्यक्त करतात. कारण आज भारतातील आजारांचे मूळ कारण हे असले परदेशी मैदा व केमिकल पदार्थच आहेत.
आज आपल्या देशास राजकीय स्वातंत्र्य मिळून पाऊणशेच्या पेक्षा जास्त वर्षे उलटूनही आमच्या लोकांची मानसिकता मात्र गुलामीचीच असलेली का बरे आढळावी ? आमचे स्वदेशी ते टाकाऊ, जुनाट, गुणवत्ता नसलेले असेच असून परदेशी ते गुणवत्तापूर्ण, उत्कृष्ट , नाविन्यपूर्ण असतेच, असली भावना म्हणजे माझ्या दृष्टीने देशद्रोही भावनाच आहे. असल्या भावना असलेले लोक आपल्या उद्याच्या पिढ्यांचे नुकसान करीत आहेत. याचे दृश्य रूप म्हणजे इंग्लिश मिडियमचा अतिरेक. आजकालच्या बालकांना इंग्लिश समजत नाही, आणि मातृभाषा येत नाही. फक्त पाठांतराच्या जोरावर मार्क्स मिळालेले दिसून येतात, पण समजलेले नसते. त्यांना मातृभाषेत निदान सातवी पर्यंत शिकवावे, आठवी ते दहावी सेमी इंग्लिश मिडियम आणि त्यानंतर इंग्लिश मिडियम असा क्रम ठेवल्यास अति उत्तम असते. शेवटी दुस-याची नक्कल किंवा कॉपी करणे हे काही माणसाला मोठे बनवीत नाही. भारतीय खावे, भारतीय शिकावे, भारताला मोठे बनवावे हेच ध्येय असणे केव्हाही वंदनीय असतेच ना !
डॉ. अविनाश प. परांजपे
वानाडोंगरी, जि. नागपूर
=======]]



