एखाद्या विद्यार्थ्याचे जग बदलणारा गुरू दीपस्तंभासारखा असतो; प्रशांत ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

एखाद्या विद्यार्थ्याचे जग बदलणारा गुरू दीपस्तंभासारखा असतो; प्रशांत ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“गुरू म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, गुरू म्हणजे संस्कारांची शिदोरी
गुरू म्हणजे संघर्षातली प्रेरणा, आणि गुरू म्हणजे अंधारातली दिशा!”
शतशः नमन त्या प्रत्येक दीपस्तंभाला जो स्वतः जळतो, पण असंख्य आयुष्यांना उजेड देतो! आज पाच सप्टेंबर…. शिक्षकदीन…!! शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांविषयी अनेक सुंदर संदेश लिहिले जात आहेत. पण मनात एक प्रश्न येतो. गुरू म्हणजे खरंच केवळ पुस्तकातील धडे शिकवणारा शिक्षक आहे का? नाही! गुरु तो … जो लघू नाही पण लघूलाही गुरु बनवतो. “गुरू म्हणजे फळ्यावर अक्षरे लिहिणारा शिक्षक नव्हे तर तो विद्यार्थ्याच्या मनावर संस्कारांची अक्षरे कोरणारा शिल्पकार असतो.” आयुष्यात कधी अपयश येते, स्वप्न तुटते, आत्मविश्वास ढासळतो… तेव्हा गुरूचा एकच शब्द…! “तू हे नक्की करू शकतोस!” कदाचित त्या एका वाक्याने जग बदलत नाही; पण एखाद्या विद्यार्थ्याचे जग मात्र नक्की बदलते. म्हणूनच गुरू दीपस्तंभासारखा असतो.
समुद्रात भरकटलेल्या जहाजाला दीपस्तंभ हात धरून किनाऱ्यावर नेत नाही तर तो फक्त प्रकाश देतो आणि दिशा दाखवतो. गुरूही विद्यार्थ्याचा प्रवास स्वतः करत नाही, पण कुठे वळायचे, कुठे थांबायचे आणि संघर्षातही स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा, हे शिकवतो. कधी गुरूचा कठोर शब्द मनाला लागतो. पण वर्षे उलटतात आणि जाणवते. “त्या दिवशी सरांनी मला ओरडले नसते, तर माझी चूक मला कधीच समजली नसती…” तेव्हा कळते. गुरूची कठोरता रागाची नसते तर ती आपल्या भविष्यासाठीची काळजी असते. आई-वडील आपल्याला जीवन देतात; गुरू त्या जीवनाला दिशा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिले, तर जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार आणि समर्थांचे मार्गदर्शन आपल्याला सांगते.
एक व्यक्ती घडवणे म्हणजे फक्त एक व्यक्ती घडवणे नसते त्या व्यक्तीच्या माध्यमातून एक युग घडू शकते. बदलत्या काळात कुठेतरी गुरू बदलत असल्याचा आभास निर्माण केला जातो. अशा वेळी गरज आहे प्रत्येकाला आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याची.आज प्रत्येक शिक्षकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा. “मी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठी तयार करतोय, की आयुष्यासाठी?” आणि प्रत्येक विद्यार्थ्यानेही आपल्या गुरूचे ऋण लक्षात ठेवावे.
कारण गुरूचे ऋण फुलांचा गुच्छ देऊन फेडता येत नाही. ते फेडता येते… गुरूने शिकवलेल्या मूल्यांनुसार जगून,
माणुसकी जपून, आणि आपल्या वाटेवर भेटणाऱ्या एखाद्या जीवासाठी पुन्हा एकदा दीपस्तंभ बनून.
कधीतरी एखादा विद्यार्थी आपल्या जुन्या गुरूला भेटेल… डोळ्यांत पाणी असेल… आणि म्हणेल, “सर… तुम्ही त्या दिवशी माझ्यावर विश्वास ठेवला होता… म्हणून आज मी इथे उभा आहे!” त्या क्षणी गुरूच्या डोळ्यांत येणारा आनंद… तोच त्याचा खरा सत्कार! तीच त्याची खरी गुरुदक्षिणा! काळ बदलतो, पिढ्या बदलतात, तंत्रज्ञान बदलते… पण गुरूने मनात पेटवलेला विश्वासाचा दिवा कधीच विझत नाही. कुठेतरी, कधीतरी, एखाद्या विद्यार्थ्याच्या यशाच्या प्रकाशात अजूनही त्याच्या गुरूच्या खडूने लिहिलेली अक्षरे चमकत असतात…!!
आज शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘गुरु दीपस्तंभ’ हा विषय देऊन एका अर्थाने समाजातला एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असलेल्या शिक्षकाप्रती कवी, कवित्रींच्या हातात लेखणी देण्याचा आज ‘शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेत’ मा. सविता ठाकरे, मुख्य परीक्षक, प्रशासक यांचा हा प्रयत्न निश्चितच वाखाण्याजोगा आहे. अर्थात काव्यरूपी शुभेच्छांनी सर्वच समूहात गुरुरुपी दीपस्तंभाला खरी मानवंदना दिली तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद
प्रशांत ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक/ लेखक/ समीक्षक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



