गारठलेल्या मनाला उभारी देणारी ‘मायेची ऊब’; स्वाती मराडे
'गुरूवारीय चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
गारठलेल्या मनाला उभारी देणारी ‘मायेची ऊब’; स्वाती मराडे
‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘धरतीच्या कुशीत बी पडले अन् मायेचा ओलावा लाभला की ते अंकुरित होते’. पक्षिणी अंड्यांना ऊब देते नि नवा जीव आकाराला येतो. ही किमया कुणाची? तर ती असते ऊब मायेची. तीक्ष्ण दात असणारी मांजर एका ठिकाणाहून दुसरीकडे पिलांना नेताना तिचे दात पिलांना कधीच लागत नाही. कारण, ‘तिच्या मनात तेव्हा असते ऊब मायेची’. कासवाची पिले केवळ तिच्या प्रेमळ नजरेने मोठी होतात. तिच्या नजरेत सामावलेली असते.. ऊब मायेची.
भिती वाटते, भितीनं हृदय धडधडतं.. तेव्हा आईच्या कुशीत बिलगले की मन शांत होते. ना कशाची चिंता.. ना कशाची भिती.. फक्त आणि फक्त असते ती विश्वासाची मिठी. जिच्या हृदयाची धडधड जन्माआधीपासूनच ओळखीची असते ती धडधड कुशीत जाताच पुन्हा ऐकायला मिळते व आपलेपणाची नाळ जोडल्याची पुन्हा पुन्हा अनुभूती येते.
“आई तुझ्या कुशीत, किती निवांत वाटतं,
ऊब मायेची मिळताच, मला स्वर्गसुख भेटतं..!”
ऊब मग ती कोणतीही असो बदल घडवतेच. धान्याला ऊब दिली की अन्न तयार होते. अन्नाची ऊब शरीराला मिळाली की शरीरात ऊर्जा संचारते. शेकोटीची ऊब मिळताच थंडी दूर पळते. समुद्राच्या पाण्याला ऊब मिळाली की वाफ आभाळात जाते अन् ढग भरून येतात, मन भरून यायलाही ऊब हवीच की मायेची. मग गारठलेले मनही उभारी घेते. ही मायेची ऊबच मायेची ओलही धरून ठेवते.. नाही तर मनही कोरडेच..!!
आज ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी आलेले चित्र आईच्या कुशीत ‘मायेची ऊब’ घेत निवांत पहुडलेले बाळ. आईच्या कुशीत निवांतपणा अनुभवणे म्हणजे स्वर्गसुखच. ज्यांची ही कुस हरवलेली असते ते मग ही ऊब शोधतात कधी तिच्या आठवणींच्या रूपात ठेवलेल्या साडीच्या पदरात, तर कधी तिने शिवलेल्या गोधडीत. असेच एक बोलके चित्रही यानिमित्ताने नजरेसमोर आले. ते म्हणजे रस्त्यावर आईचे चित्र रेखाटून त्यावर कुशीत पहुडल्याप्रमाणे निजलेली एक व्यक्ती. आभासरूपी मायेची ऊब मिळवतानाचे हे चित्र पाहून डोळे आपसूक गंगामयी झाले. आणखी एक चित्र आठवले ते वाघाने शिकार केलेले मृत माकड तोंडात पकडले आहे. पण आई जिवंत नाही याची काहीच कल्पना नसलेले तिचे पिलू कुशीत निवांत बिलगले आहे.. किती हृदयद्रावक ना..! आईच्या मायेची ऊब मिळवण्यासाठीची ही धडपड..!
‘काही सुखं केवळ आणि केवळ अनुभवायची असतात’, ती शब्दात बांधणे तसे कठीणच. आईच्या मायेची ऊब सुद्धा तशीच. तरीही आज मराठीचे शिलेदारांनी ती चारोळी रुपात शब्दबद्ध करत मनाचा ठाव घेतला. आई व बाळ दोघांनाही तितकाच आनंद देणारी ही ‘जादू की झप्पी’ काव्यरूपाने आपण सर्वांनी साकारलीत. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
सौ स्वाती मराडे, इंदापूर जि पुणे
मुख्य परीक्षक/ सहप्रशासक/ लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह



