हरवले अजूनही सेवापूर्तीच्या क्षणात…!!
दिनांक 29 जून 2024 या दिवशी माझे एक जीवन पर्व पूर्ण झाले. मी दिनांक एक डिसेंबर 1997 साली अरण्येश्वर विद्या मंदिर सहकार नगर, जिल्हा पुणे या शाळेत नोकरीला लागले. त्या आधी नऊ वर्ष मी ‘कीर्ती विद्यालय’, निगडी येथे होते. 29 तारखेला या शाळेमध्ये मला सत्तावीस वर्षे होत झाली. माझा नोकरीचा जीवन प्रवास येथे जो सुरू झाला तो 29 तारखेला संपला. या दोन्ही शाळेतील मिळून एकूण पस्तीस वर्षे सेवा माझी झाली. जवळजवळ 1700 ते 1800 मुलं घडवली. सर्वांना आईच्या मायेन शिकवलं. प्रेमान जवळ घेतलं. अध्यापनात नवीन तंत्रांचा वापर केला. शैक्षणिक साहित्य मला बनवायला खूप आवडते. त्यामुळे मी या मुलांना शैक्षणिक साधनाद्वारे भरपूर अध्यापन केलेले आहे. मुलांना संस्कारांच्या गोष्टी सांगून मुलांच्या बालमनावर संस्कार केले. खेळातून शिक्षण दिले. विविध पद्धतीद्वारे अध्यापन पद्धती चालूच राहिली. लहान, लहान मुले ती आपल्या आईला चिकटतात तशी मला ती जवळ होती. कितीही त्रास झाला तरीसुद्धा हातात छडी शक्यतो नसायची. आणि छडी जरी घेतली तरी मुलांच्या समोर एक धाक म्हणून ती असायची. वर्गात खूपच गोंधळ झाला तर त्या छडीचा वापर मात्र होत असे. मुलांना मारण्यासाठी नव्हे तर बेंचवर आपटण्यासाठी.
मुलांना शारीरिक इजा कधीच केली नाही. शिक्षा दिली ती लेखनाची, कधी धावण्याची, चुकून छडी मारली तर परत त्या मुलाला जवळ घेऊन मायेन कुरवाळायचे. वर्गातला अभ्यास जो छान करेल त्याला दररोज चॉकलेट द्यायचं. अक्षर छान आले की त्याला पेन्सिल द्यायची. वाढदिवस असेल तर त्याला वही द्यायची. असे विविध उपक्रम नेहमीच वर्गामध्ये राबवले. त्यामुळे मुलांना छान सवयी लागल्या. आपल्याला काहीतरी बाई गिफ्ट देतात या भावनेतून मुलं अक्षर छान काढू लागली अभ्यास छान करू लागली. आणि त्यामुळे वर्गातील उपस्थिती छान असायची. मुलांना काय कोणतेही गिफ्ट दिले की त्यांना ते आवडतं. कारण ते त्यांच्या बाईने दिलेल असतं मग अगदी चॉकलेट असू दे, रबर असू दे,पेन्सिल असू दे,पेन असू दे किंवा वही असू देत. खूप पूर्वीपासूनच मला असा विद्यार्थ्यांना वस्तू देणं आवडतं. त्यामुळे ते आपल्या खूप जवळ येतात. लहान मुल ती निरागस असतात. त्यांना आपण जसे घडवत असते तशी ती घडतात. पुढे यातूनच मग मी स्टिकर्स द्यायला लागले.
मुलांच्या आवडीची स्टिकर्स घेऊन आले बाजारातून आणि त्यांना ती देत गेले वह्यांवरती. ज्यावेळी मी अमेरिकेला गेले तेव्हा तिथून सुद्धा शैक्षणिक साहित्य आणलं. विविध स्टिकर्स आणले,आणि मुलांच्या वहिला मी ते स्टिकर दिल की मुलांना ते खूप आवडायचं. स्टिकरच्या आवडीने मुल अक्षर छान काढू लागली. मुलांच्या लेखनात प्रगती दिसून आली. त्याचबरोबर त्यांच्या वाचनात देखील प्रगती दिसून आली. मुलं पाढे पाठांतर करू लागली . एकंदरीत काय तर मुलांना मेवा देऊन त्यांच्याकडून अध्ययन करून घेणे चालू झाले आणि मला हे हे खूप आवडतं. मुलांच्या मनात आपलेपणा वाढला की आपोआप मुलं आपल्याला रिस्पेक्ट देतात आणि छान कृती करतात अध्ययन करतात. आपल्याला शक्यतो ती मुलं नाही म्हणत नाहीत. अशाप्रकारे जरा अध्यापनाची माझी वेगळी पद्धत होती. असे 27 वर्षे अध्यापन झाल्यानंतर तो शेवटचा दिवस आला सेवापूर्तीचा.
आठवडाभर आधी सर्व शिक्षक सर्व मुलं,आम्हाला खूप रडू यायचे. शिक्षक सुद्धा गळ्यामध्ये पडून खूप रडले. मुलं तर रडलीच रडली. पालकांचे डोळ्यातही पाणी तरळले. रोज त्यामुळे सतत माझ्या डोळ्यात पाणी असायचे. मैत्रिणी मजेन म्हणायच्या, ” तुला त्यादिवशी बादली आणावी लागेल “. झाला आला तो दिवस. घरात नातेवाईकांची वर्दळ सुरू झाली.माझे पती कायम साथ देतात.माझी मुलगी कोमल आली.माझी आई अजूनही माझ्यासोबत आहे. तिला माझे आणि मला त्याचे खूप कौतुक आहे. माझे माहेर,सासर, व्याही विहीण सर्व आले. घरात गर्दी झाली. माझ्यासाठी माझी ही माणसं आली होती. आम्ही बरोबर अकरा नंतर शाळेमध्ये निघालो. शाळेत पोहोचलो. शाळेमध्ये माझ्या सख्या माझ्या व कुटुंबियांच्या स्वागतासाठी तयारच होत्या.
माझ्याबरोबर माझ्या शाळेतील संस्थापकांच्या मिसेस सौ. वंदना ढुमे यांच्याही सेवापूर्तीचा आज दिवस होता. आमच्या दोघींचे कुटुंबीय आले. ऑफिसमध्ये आम्हाला बोलावले गेले. नंतर आम्ही वरच्या हॉलमध्ये जावून स्थानापन्न झालो. दोन्ही विभागाच्या माननीय मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब ढुमे, माझे सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि आम्हा दोघींचे कुटुंबीय सर्व हॉलमध्ये स्थानापन्न झालो. कार्यक्रमाचे निवेदन राऊत बाई यांनी केले. कार्यक्रमाला आम्हा दोघांना शुभेच्छा देऊन सुरुवात झाली. प्रथम आम्हा दोघींचा संस्थेतर्फे व शिक्षकांतर्फे सत्कार करण्यात आला.
नंतर शिक्षकांच्या मनोगतास सुरुवात झाली. प्रथम मनीषा इरकल तिने आपले मनोगत व्यक्त केले. आमचा 27 वर्षाचा इतिहास तीने सर्वांसमोर मांडला. आम्ही मुलांना घडवताना काय,काय मजा केली काय, काय शिकवले हे थोड तिने सांगितले.आमच्या अध्यपनाचे अनुभव तिने सांगितले. नंतर मनीषा कंक मॅडम यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की ‘ प्रदीर्घ सेवेनंतर आपली सदाफुली होय सदाफुली सेवानिवृत्त होत आहे. सदाफुली यासाठी सांगितले आहे की त्यांना कितीही संकटे आली तरी निराश कधीच आपण त्यांना पाहिलेले नाही. किंवा त्या कधी दुःखी असलेल्या आपण पाहिले नाही. सदाफुली ज्याप्रमाणे बाराही महिने बहरते तशा नाईक बाई आपल्या घरी दारी किती दुःख असले तरीसुद्धा कठीण प्रसंगात त्या कायम हसतमुखच असतात. कोणताही समस्येचा बाऊ करत नाहीत. आनंदाने विद्यार्थ्यांसमोर जातात. त्या एक विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत. उपक्रमशील शिक्षक आहेत.’
पुढे पटेल बाईंनी आपल्या मनोगतात सांगितले की.. ‘ तू लेखिका तू कवयित्री शब्दांनी गुंफते कवितेच्या ओळी,सामाजिक कार्याची ठेवते जाण, सरस्वतीची लेक तू,कलाकार आणि सोशिक तू,बडबड गीते मुलांचा डान्स फळाच्या सजावटीचा छंदच फार तुला.’ अशा प्रकारच्या ओळी पटेल बाईंनी काव्यात गुंफल्या होत्या. वंदना ढुमे आणि मी आमच्यासाठी छान कविता केली होती. आज “कोण दिन बाई आज कोण दिन
तुझा आणि माझा सेमच दिन…. “यानंतर ज्योती पुरकर यांनी आपल्या मनोगत सांगितले की ‘ वसुधा म्हणजे पृथ्वी, पृथ्वी जशी विविध रंगानी सजलेली आहे तशा आमच्या नाईक बाई आहेत. नोकरीला लागलेल्या पहिल्या दिवशी जशाच्या दिसत होत्या तशा त्या आजही सेम टू सेम दिसत आहेत. आमच्या नाईक बाईंमध्ये मध्ये प्रचंड उत्साह, काम करण्याची तळमळ आणि कितीही संकट आले ते डगमगायचे नाही हा त्यांचा स्वभाव आम्हाला खूप आवडतो. एका मागून एक त्यांच्यावर कायम संकट आलेली आम्ही बघितलेले आहेत पण त्या कधीच डगमगल्या नाहीत,खचल्या नाहीत. आमच्यातील एक मोठ्या बहिणीचे व्यक्तिमत्व त्यांनी जपले. एक छोटीशी चारोळी खास त्यांच्यासाठी…
अग अग वसू
नको तू गप्प बसू
क्षणात येतात एका डोळ्यात असू
क्षणात दुसऱ्या डोळ्यात हसू….’
नंतर माननीय मुख्याध्यापिका अनिता गायकवाड यांनी माझ्याबद्दल बोलायला सुरुवात केली. आम्ही गेली सत्तावीस वर्ष एकत्र शाळेमध्ये आहोत आणि सोळा-सतरा वर्षां एकत्र स्कॉलरशिप घेतली होती . या शैक्षणिक आठवणी त्यांनी सांगितल्या. आणि समाजसेवा मी कशी करते हे त्यांनी त्यांच्याच एका उदाहरणातून समजावून दिले. दुपार विभागाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ. जाधव बाईंनी सुद्धा वंदना वहिनी व माझ्याबद्दल आठवणी सांगितल्या.
त्यानंतर श्वेता ढुमे हिने मनोगत व्यक्त केले. ही आमच्या वंदना वहिनींची मुलगी. आणि आमच्या इंग्लिश मिडीयमची मुख्याध्यापिका. हिने आपल्या आई प्रती मनोगत व्यक्त केले. तसेच मला सुद्धा आई असे संबोधले. खूप छान वाटले हिने मला आईच्या जागेवर पाहिले. नंतर माझी मुलगी कोमल नाईक ही व्यक्त झाली. आईने आत्तापर्यंत कसा प्रवास केला याचे वर्णन तिने केले. आपले बाबा आज असून सुद्धा कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत याबद्दल खेद व्यक्त केला. आणि आई वरती एक छानशी कविता माझ्या तीनही मुलांतर्फे तिने म्हटली.
माझी भाची अपूर्वा तिनेही आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतामध्ये तिने सांगितले की आज माझी आजी येऊ शकत नाही माझ्या आत्याच्या कार्यक्रमाला पण तिने जे लिहून दिलेले आहे ते आपल्यासमोर मी वाचते. आणि माझ्या आईने जे चार ओळी लिहून दिल्या होत्या त्या तिने वाचल्या त्यामध्ये माझ्या आईने माझ्याबद्दल कौतुकाचा वर्षाव केलेला होता. माझ्या खडतर प्रवासाबद्दल थोडक्यात सांगितले होते. माझ्या आईला माझे मनापासून वंदन. तसेच माझ्या भावाचे मनोगत देखील माझ्या भाचीने,अपूर्वाने वाचून दाखवले. त्याने देखील माझ्या जीवनाचा प्रवास थोडक्यात इतरांसमोर ठेवला होता.
आता माझ्या भाषणाची वेळ आली. मी माझ्या मनोगतातून मा मुख्याध्यापक यांचा,माझ्या सर्व शिक्षकांचा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा, व माझ्या कुटुंबीयांचा मला कसा आधार मिळाला हे सांगितले. आमच्या शालेय आठवणी आमच्या वर्गांच्या बाबतीत होत्या त्या सांगितल्या. आलेले अनुभव सर्वांना शेअर केले. आणि एक कविता केली ती अशी..
आज मागे वळून पाहताना
आल्या दाटून अमृत आठवणी
हृदयाच्या बंद कुपीत ठेवीन
रमेन त्यात मी परतच स्मरूनी…
भूतकाळात रमनार मी काही दिवस
आता आठवणींना पाझर फुटणार
मैत्रिणींच्या मेळाव्यातील आठवात
वसुधा एकटी चिंब चिंब भिजणार…
मैत्री आहे आपली सुगंधी कस्तुरी
कधीच साथ न सोडणारी
नित्य सदा हवीहवीशी वाटणारी
स्वप्नवत जीवनात पुढे वसू रमणारी…
एवढ्या वर्षांची संगत सोडवत नाही
सुखदुःखाची देवाण-घेवाण होणार नाहीत
फोन आहेच आपल्याकडे पण
शाळेच्या मुलांच्या गप्पा रंगणार नाहीत…
नोकरीला लागले तिथेच रमले
चर्चास्वरूपात मुलांच्या भावनांना खुलवले
संस्कारक्षम कथा मुलांना सांगून
मुलांवर संस्कारही छान घडवले…
मुलांची आई होऊन शिकवले
मैत्रिणींमध्ये सर्वांचेच लाडके झाले
आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळवले
आता पुढे काय? या चिंतनाला लागले…
आता जेवणाचा एक टप्पा पार झाला
दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे निघाले
म्हणतात सेकंड इनिंग याला जीवनाची
जीवनाच्या पुढील नावेत आज बसले….
तसे पाहता सेकंड इनिंग शब्द आहे फसवा
खरंतर खडकर जीवनाची सुरुवात आहे
सर्वांसाठी जीवन जगताना आपले जगायचे राहिले
जीवनाचे संध्याकाळ होईल लवकर भरभरून जगायचे आहे….
जे राहिले जेवण ते मनापासून करायचे
Who care असे म्हणत जीवनात पुढे जायचे
म्हातारपणाची चाहूल लागण्याच्या आधीच
निसर्गा पासून खूप काही शिकायचे
निसर्ग पासून खूप काही शिकायचे..
संस्थेला एक प्रिंटर गिफ्ट केला.
यानंतर सौ कणखर बाईंनी आभाराचे गोड काम केले. व इथे कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमानंतर खूप सारे फोटो घेतले गेले हीच ती आठवण हेच ते स्मरण आता जीवनभर पुरणार आहे. शाळेतील पावलं बाहेर पडत नव्हती पण जड अंतकरणाने सर्वांचा मी निरोप घेतला.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा -पुणे



