शत्रूवर विजय मिळवण्यासाठी दृढनिश्चय करण्याचा सण म्हणजे दसरा’ अर्थात विजयादशमी; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

‘शत्रूवर विजय मिळवण्यासाठी दृढनिश्चय करण्याचा सण म्हणजे दसरा’ अर्थात विजयादशमी; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
प.पु.पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात “वाढता मानव प्रयत्न आणि अवतरत्या ईशकृपेचे जेथे मिलन होते तेथे विजयाचा घंटानाद संभवतो”.अशा विजयाचे प्रतीक म्हणून साजरा होणारा उत्सव दसरा अर्थात विजयादशमी. भक्ती व शक्ती यांचा समन्वय समजणारा हा उत्सव. भारतीय संस्कृतीमध्ये वीरता, शौर्य याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रभू रामचंद्रांचा रावणावर विजय असो, की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जेरीस आणण्यासाठी छेडलेले युद्ध असो, या सर्वांना विजयादशमीची किनार आहे. या दिवसाला धर्माच्या विजयाचे आणि धार्मिकतेच्या शक्तीचे प्रतीक असल्याचे अधिष्ठान ही लाभलेलं आहे.
विजयादशमीच्या अगोदर नऊ दिवस देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करून तिच्या विजयाचे स्मरण केलेले असते. तिथून सज्जता आणि एकात्मतेचा संकल्प सिद्ध होण्याचा हा दिवस आहे. ‘रावण दहन’ हे या दिवसाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अहंकार व वाईट प्रवृत्तीच्या पराभवाचे हे प्रतीक आहे. समाजातील दीन, हीन, लाचार तसेच भोगवृत्तीचा संहार करण्यासाठी कटिबद्ध होण्याचा प्रत्येकाने संकल्प करावयास हवा. ‘बाह्य शत्रूबरोबर आत असलेल्या षडरिपूंवर विजय मिळवण्यासाठी दृढनिश्चय करण्याचा सण म्हणजे दसरा’. विजयादशमी म्हणजे वीरतेचे वैभव,शौर्याचा शृंगार व पराक्रमाची खरी पूजा होय.पारंपरिक रावण दहन तर आपण करतोच, पण आज समाजात एक तोंडी अनेक रावण जे आपल्या वासनांध नजरेने व कृतीने अनेकांचे जीवन नेस्तनाबूत करतात, अशा वृत्तीला जमिनीत गाडण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. विजयादशमी खऱ्या अर्थाने भक्ती व शक्ती यांचे पवित्र मिलन आहे.
आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी विजयादशमी हा विषय दिला. सण उत्साहाच्या पावन पर्वाच्या पार्श्वभूमीवर सर्व कवी कवयित्रींचा आनंद द्विगुणीत झाला, सर्वांनी आपापल्या परीने समूहात विजयादशमीचे महत्व अधोरेखित केलं. शब्दांची निवड मोहक असून, अर्थगर्भतेने समृद्धही दिसून आली..प्रत्येक ओळीमधून एक सौंदर्यपूर्ण संवेदना प्रकटतांना दिसली. अभिव्यक्तीमध्ये सुस्पष्टता कवितेचा प्रवाह सहजसुंदरच..भावनांची उधळण सुरेल तालात गुंफलेली असल्याने तुम्हा सर्व शब्दप्रभूंचे मनापासून खूप खूप अभिनंदन व पुढील लिखाणासाठी अनंत कोटी शुभेच्छा…!
‘सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा’..!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह





