पावती
अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर, जि.अहमदनगर
पावती
शीर्षक वाचून अचंबित झालात ना? पावती हा तसा लेखनाचा विषय नाही. खरं तर आपल्या लेखी ‘पावती’ या शब्दाची विशेष महती नाही. पावती म्हणजे आपल्या दृष्टीने निव्वळ एखादी वस्तू विकत घेतली की तिची पोहोच मिळणे आणि त्या पोहोच पावतीचे तसे फार महत्त्व वाटत नाही म्हणून कित्येक वेळा आपण पावती घेण्याचा आग्रह करीत नाही. आपल्या दृष्टीने तिला महत्त्वही नसते, आपल्यालाही तेवढा वेळ नसतो. पण, काही माणसं पावतीसाठी आडूनच बसतात.अर्थात माणूस हा प्राणीचं असा आहे त्याला नको त्या गोष्टीबद्दल महत्त्व वाटतं. तर कधी त्या गोष्टीला बद्दल त्याला काहीच वाटत नाही . मी देखील कधीच कुठल्याही दुकानात गेल्यावर पावतीचा मोह कधी केला नव्हता, या उलट माझे मिस्टर अगदी क्षुल्लक वस्तू खरेदी केली तरी पावती घेण्यासाठी आडून बसतात.
एक दिवस जुनं ते सोनं असतं तरी, ते देऊन नवीन करून घेण्यासाठी दुकानात गेले, जुने दागिने मोडून नवीन डिझाईन करायची होती, अगदी सोनारां पासून सर्वजण मला ते दागिने मोडण्यापासून परावर्तन करत होते,पण नव त्यात काय उणं,आणि तेच मला हवं असं माझं म्हणणं होतं शेवटी दागिना मोडण्यासाठी दिला तेव्हा सोनाराने मला लगेच विचारलं की, याची पावती कुठे आहे? माझ्याकडे तर याची पावती नव्हतीच. मी म्हणाले पावती तर नाही!पावती नसेल मोडून, तापवून त्यात घट धरणार. पावती असेल तर जुन्या सोन्याला नवीन सोनं..! अन, तेव्हा मला कळलं पावतीचे महत्त्व…!!
तेव्हापासून मी देखील पावती घेण्याच्या मागेच लागले, काही दुकानदार खुशीने पावती देतात तर काही का कोण जाणे आढेवेढे घेतात,त्यांना त्याचा फायदा तोटा काय याचं याच्या फंदात मी कधीच पडले नाही आजही पडत नाही, ही झाली आपली ही झाली पावतीची आपल्या व्यवहारीक जीवनातील पावती म्हणजे ‘पोहच.’..ची वस्तुस्थिती. अन् ती मिळाली तर आपण खुष होतो. आज मला माझ्या कर्मभूमी मधील ज्ञान मंदिरात ज्ञानदानाचे कार्य करताना अशीच एक पावती मिळाली..मला खूप समाधान वाटलं अन ते तुमच्याशी share करावंसं वाटलं.
आज दुपारी थोड पावसाच वातावरण झाल होत म्हणून माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना घेऊन मी शाळेजवळच्या मंदिराच्या ओसरीत बसले होते…मंदिरात तशी शांतताच होती..मंदिराजवळच राहणारे एक वृध्द गृहस्थ मंदिराच्या गाभार्यात निवांत बसले होते.मी मुलांशी गप्पा मारण्यात दंग होते..मुलांना बोलतं करीत होते. ते ही भरभरून बोलत होते. मी त्यांना एक गोष्ट सांगत असताना त्यातूनच संस्कार, शिस्त, कर्तव्य, परिस्थिती याआणि अशा अनेक विषयावर बोलत गेले..,मुलही शांतपणे ऐकत होती…त्यांच्या चेहर्यावरचे भाव त्यांना माझ बोलणं पटतय हे सांगत होते. ते मन लावून तल्लीन होऊन ऐकत होते …या दरम्यान तास संपल्याची घंटा झाली अन मी मुलांना घेऊन वर्गाकडे निघाले..तेवढ्यात ते गृहस्थ पुढे आले …अन् मला म्हणाले, मॅडम, किती छान सांगितल हो तुम्ही मुलांना.!असेच मुलांना नेहमीच सांगत गेलात तर नक्कीच ही मुल संस्कारीत होतील…अन बरच काही बोलले….हे ऐकून मी धन्य झाले…यालाच मी “पावती” अस म्हटलं. आणि अशा अनेक पावत्या कागदोपत्री नाहीत पण मनाच्या तिजोरीत मात्र मी जपून ठेवल्या आहेत.
आतापर्यंत पावती म्हणजे वस्तू विकत घेतल्याची पोहच..!..एवढं अभिप्रेत होत…आज ही आगळी वेगळी पावती आयुष्याच्या जमाखर्चाच्या डायरीत लिहून ठेवावी वाटली. अर्थात अशा अनेक पावत्या मी माझ्या कामात मिळवल्या आहेतच. आणि प्रत्येकाला त्याच्या आयुष्यानुसार त्याच्या कर्मात केलेल्या चांगल्या कार्याच्या पावत्या आयुष्यात मिळत असतात आणि त्यांनी त्या समाधानाच्या डायरीत लिहून ठेवायला हव्यात असं मला वाटतं आपल्याला नक्कीच आवडेल!
“कर्माच्या पावतीला नको असतं फिक्स डिपॉझिट
ती साठवून ठेवावी आठवणींच्या कुपीत..”
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर, जि.अहमदनगर
==========



