नव्या नवलाईच्या सुखात मी….?
रजनी भागवत ऐरोली, ठाणे
नव्या नवलाईच्या सुखात मी….?
“सुख” हा दोन अक्षरी शब्द. परंतु, त्याची व्याप्ती किती मोठी आहे. या दोन अक्षरी शब्दाच्या शोधार्थ माणूस पूर्ण आयुष्य वेचतो. परंतु ते मिळेल याची शाश्वती नसते. ही दोन अक्षर मिळवताना माणूस जन्म मरणाच्या फेऱ्यात वारंवार अडकतो आणि स्वतःची फसगत करून घेतो. लहानपणी मुलांना फुलपाखराचं खूप आकर्षण असतं आणि ते पकडण्यासाठी ते त्याच्या मागे सैरावैरा धावतात, परंतु ते काही त्यांच्या हाती लागत नाही आणि जेव्हा ते थकून एका ठिकाणी बसतात. तेव्हा कधी कधी अलगदपणे तेच फुलपाखरू येऊन त्यांच्या खांद्यावर विसावते. तद्वतच सुखाचे आहे आपण किती सुखाच्या मागे लागलो तर ते आपल्याला मिळत नाही. पण एखाद्या वेळी थकून स्वस्थ चित्ताने बसलो, की अलगद ते गवसते आपल्याच ठाई.
माझ्या मते आपल्या ज्या इतर भावना आहेत. जसे भूक लागणे , तहान लागणे त्याप्रमाणेच सुख मिळविणे ही देखील एक भावना आहे. अन्न व पाणी मिळाले की ह्या भावना शमतात. परतु सुख मिळविणे ही भावना प्रत्येकाची वेगळी असते. कुणाला कशात सुख मिळेल हे काही सांगता येणार नाही. सुखाच्या कल्पना आणि त्याची प्राप्ती ही ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अगदी सहज आपण बोलतो की, देव दिसत नाही, परंतु आपण मनापासून स्वीकारले, तर दगडात देव दिसतो आणि नाही मानले तर तो दगडचं दिसतो. त्याचप्रमाणे सुख हे मानण्यावर असते. आपण मानले तर सुख नाहीतर सर्व काही असूनही माणूस दुःखी असतो. बहुतांशी माणसाच्या सुखाच्या कल्पना ह्या भौतिक गोष्टींशी निगडीत असतात. त्यामुळे असे औट घटकेचे सुख मिळवून माणूस शेवटी कोरडाच उरतो.
आजच्या या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि भौतिकीकरणामुळे माणूस यंत्रवत झाला आहे. एक इच्छा पूर्ण झाली की, ‘मी सुखी बस्स आणखी काही नको’, असे विचार एकीकडे चालू असतानाच त्यांना दुसऱ्या गोष्टी खुणावत असतात. मग सुरु होतो खेळ , सुख मिळविण्याच्या या शर्यतीत उरी फुटेस्तो धावून अखेर ते माणसाला मिळेल याची शाश्वती नाही. तरीही हा खेळ वर्षानुवर्ष माणूस खेळतो. माझ्याही आयुष्यात हा सुख दुःखाचा खेळ खऱ्या अर्थाने महाविद्यालयीन कालावधीनंतर सुरू झाला. मैत्रिणीची सजवलेली बंगलीवजा घरे बघताना कुठेतरी स्वतःच्या साध्या घराची तुलना होऊ लागली. आपल्या घरात एक बेडरुम असते तर किती छान झाले असते, आपण किती सुखी झालो असतो असे उगाचच वाटून जायचे.
आता लिहीताना स्वतःचे स्वतःला हसू येतेय. परंतु तेव्हा किती मनाला लावून घेतले होते ते सर्व. असेच मग प्रत्येक टप्यावर नवीन इच्छा नवीन सुख खुणावायची आणि मन ही तिकडे धाव घ्यायचं. मनाचं दुःखी होणं परत स्वतःला समजावणं हा खेळ आता या लेखानिमिताने त्रयस्थपणे बघताना वेगळचं वाटत आहे.. वामनराव पै यांनी केलेली वैश्विक सुखाची प्रार्थना किती छान आहे.” हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भल करं, कल्याण करं , रक्षण करं आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. माझ्या सुखाच्या कल्पनेत, माझी आध्यात्मिक प्रगती व्हावी आणि त्या योगे मी एक उत्तम माणूस बनावे ही गोष्ट प्रथम असणार आहे. अत्यंत प्रामाणिकपणे व प्रयत्नपूर्वक हे सुख मी मिळवावे हीच ईश्वराचरणी प्रार्थना. जाता जाता एवढचे सांगेन… ‘सर्वे सुखिनः सन्तु,सर्वे सन्तु निरामय’.
रजनी भागवत
ऐरोली, ठाणे



