“रंगात रंगतांना मनाने सकारात्मक विचारात रंगावे”; वृंदा करमरकर
सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“रंगात रंगतांना मनाने सकारात्मक विचारात रंगावे”; वृंदा करमरकर
सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या विविधतेत सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे रंगांची उधळण. “रंगात रंगतो” हा विषय मांडताना सर्वप्रथम आठवतो तो निसर्गाचा रंगोत्सव. वसंत ऋतू आला की झाडांना पालवी फुटते. हिरव्या रंगाच्या किती त्या छटा! पिवळी, गुलाबी, जांभळी, लाल फुले झाडा – वेलींवर उमलतात. शेतात मोहरीची पिवळी फुले, आकाशाचा निळा विस्तार, सूर्योदय, सूर्यास्ताची केशरी छटा निसर्ग स्वतःच जणू रंगांच्या उत्सवात रंगून जातो. होळी पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा सुद्धा म्हणतात. वाईटावर चांगल्याचा विजय. होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी येते. होळीत वाईट गोष्टी जाळून टाकल्यानंतर रंगपंचमीला आनंद साजरा केला जातो.
रंग एकमेकांवर उधळताना भेदभाव, राग, मत्सर विसरून सगळे एकत्र येतात. समाजात प्रेम, बंधुभाव आणि समता वाढवणे हा यामागचा सामाजिक हेतू आहे. वसंत ऋतूच्या आगमनानंतर निसर्गात जसे रंग फुलतात, तसेच जीवनात उत्साह आणि नवचैतन्य यावे, ही भावना रंगपंचमीमागे आहे. ज्या वातावरणात आपण राहतो, ज्या संगतीत वावरतो, त्या रंगाचा प्रभाव आपल्यावर पडतो. घरात प्रेम, स्नेह आणि संस्कारांचे वातावरण असेल, तर आपणही त्या चांगुलपणाच्या रंगात रंगतो. उलट नकारात्मक, मत्सरयुक्त वातावरणात राहिलो तर मनावर त्याचाच रंग चढतो. म्हणूनच “संगतीचा परिणाम” ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. योग्य विचार, सकारात्मक सहवास आणि सुसंस्कृत वातावरण माणसाचे व्यक्तिमत्त्व उजळवते.
या निसर्गरंगांनंतर मनाला साद घालतो तो होळीचा सण. “होळी म्हणजे वाईटावर चांगल्या चा विजय आणि त्यानंतर येणारी रंगांची उधळण म्हणजे रंगपंचमी”. देशाच्या विविध भागांत या सणाला वेगवेगळी नावे आणि परंपरा आहेत. राधा आणि कृष्ण यांच्या कथेशी रंगपंचमीचे नाते जोडलेले आहे. कृष्णाने राधेवर रंग उधळला, त्या रंगात राधा रंगली. गोप गोपिकांसह सारे या रंगात न्हाऊन निघाले. अशी गोड आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे ब्रजमधील रंगपंचमी ही केवळ सण नसून भक्ती, प्रेम आणि आनंदाचा रंगोत्सव ठरतो. त्या क्षणी सर्वजण एकाच रंगात रंगतात भेदभाव, मतभेद विसरून.
निसर्गाचे रंग असोत, सणांचे रंग असोत किंवा वातावरणाचे रंग असोत माणूस त्यात रंगतच जातो. जीवन हा एक कॅनव्हास आहे. त्यावर कोणता रंग चढवायचा हे आपल्या हातात आहे. प्रेम, मैत्री, सौहार्द आणि सकारात्मकतेचा रंग स्वीकारला तर आपले जीवन इंद्रधनुष्यासारखे सुंदर होईल. “रंगात रंगतो” म्हणजे फक्त बाहेरून रंग लावणे नव्हे, तर मनानेही चांगल्या विचारांच्या रंगात रंगणे होय. राधा – कृष्णांच्या रंगपंचमी च्या प्रेमभावनेत आपणही रंगून गेलो, तर जीवन अधिक सुंदर होईल, उजळून निघेल. आज ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी ‘रंगात रंगतो’ हा काव्यात्म विषय दिला. शिलेदारांनी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मला या त्रिवेणी काव्य स्पर्धेचे परीक्षण लिखाणाची संधी दिल्याबद्दल आदरणीय सरांचे मी मनापासून आभार मानते.
वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



