“आमची अभिजात मराठी आता नव्या वळणावर”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे परीक्षण
“आमची अभिजात मराठी आता नव्या वळणावर”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे परीक्षण
“माझा मऱ्हाटाची बोलु कवतिके
परि अमृतातेही पैजांसि जिंके..’
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन..”
यंदाचा ऑक्टोबर २०२४ तमाम मराठी मनांना हर्ष देणारा महिना. मराठी भाषेप्रती संत ज्ञानेश्वरांनी वर्तवलेले भाकित खरं ठरवणारा क्षण याच महिन्यात आपण अनुभवला. मराठी भाषेचा इतिहास १५०० ते २००० वर्ष जुना असल्यावर शिक्कामोर्तब झाले. ११ कोटी लोकांची बोलीभाषा सन्मानाने कृतकृत्य पावली, सोबतच देशाच्या इतिहासात मराठी भाषेच्या समृद्ध, सांस्कृतिक इतिहासाचे महत्वही अधोरेखित झाले. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथांची परंपरा फळाला आली. मी या निमित्ताने जरा इतिहासाची पाने चाळलीत.
‘मराठी….मूळ आर्यांची भाषा, उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगांपासून ते कावेरीच्या पश्चिम प्रांतापर्यंत, उत्तरेस दमन पासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठी भाषा विकसित झाली.’ सोबत विकसित झाला तो राकट, कणखर, कष्टाळू आणि प्रामाणिक मराठी माणूस सुद्धा. महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींनी मराठीची गतिमानता, सहजसौंदर्य, नादमाधुर्य आणि गोडवा वर्णिला, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळात राजकीय पत्र व्यवहार, बखरी लिहिण्यासाठी मराठीचा वापर केला. पेशव्यांनी संस्कृत काव्याचे अनुकरण करणारे पंडिती काव्य मराठीत लिहिले, तर केशवसुतांनी आधुनिक कवितांमध्ये कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा,त्याच्या भावनांचा अविष्कार जपत, ‘मराठी भाषेला नवीन वळण लावले’.
अलीकडच्या काळात वि.वा.शिरवाडकर, प्र.के. अत्रे, चिं.वी. जोशी, कुसुमाग्रज, ग.दि.माडगूळकर, वि.स.खांडेकर, ना.सी. फडके या सर्वांनी साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषा मनामनात जागृत केली. यांसह तमाम मराठी मनांची स्वप्नपूर्ती झाली आणि माय मराठी स्वयंसिद्ध झाली. माय मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा प्राप्त झाला. प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता म्हणजे अभिजात. ज्यात मायमराठी चपलखपणे बसली आणि तमाम मराठी रसिकांची मान अभिमानाने उंचावली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, त्यामुळे तिला काय मिळणार हा बहुतांशी मनांना प्रश्न पडला.अभ्यासात प्रोत्साहन, संशोधन साहित्याला चालना, भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकविण्याची सुविधा, प्राचीन ग्रंथांना अनुवादित करणे, १२००० ग्रंथालयांचे सशक्तीकरण असे अनेक फायदे यातून मिळणार आहेत.
या सर्व गदारोळात मला रामसेतू उभारतांना मदत करणारी ती खारुताई आठवली. सेतू उभारण्यात आपले योगदान तीही देत होती. पण त्याचा इथे काय संबंध? माय मराठीच्या अभिजात प्रवासात अनेक हात राबलेत, राबत आहेत. त्यातील एक खारुताईरूपी वाटा उचलणाऱ्या ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांप्रती सर्वप्रथम मी कृतज्ञता व्यक्त करते आणि मराठीचे साहित्य समृद्ध करणाऱ्या सर्व शिलेदारांना मनापासून धन्यवाद देते. आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय राहुल सरांनी ‘अभिजात मराठी आम्ही’ हा विषय दिला अन् सर्वांच्या लेखणीने पुन्हा एकदा सरसावत माय मराठीचं मनापासून गुणगान गायले. तेव्हा तुम्हा सर्वांचे पुनश्च अभिनंदन. आपली वैश्विक मराठी अधिकृतरित्या अभिजात झाली आणि माझ्या तोंडातून सहज शब्द निघाले. “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.” तूर्तास एवढेच. मनस्वी धन्यवाद….!
सौ.सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह