Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखवर्धाविदर्भसाहित्यगंध

धार्मिक उत्सव, समाज आणि आचारसंहिता

प्रशांत शेळके (एक वाटसरू) ता. हिंगणघाट, जि. वर्धा

0 4 0 9 0 3

धार्मिक उत्सव, समाज आणि आचारसंहिता

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. अनेक जाती, धर्म, प्रांत, भाषा, परंपरा आणि संस्कृतींच्या संगमातून भारतीय समाज उभा राहिला आहे. प्रत्येक धर्माला आपापले सण-उत्सव आहेत. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची परंपरा आहे. या परंपरांना शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. गणेशोत्सव, दिवाळी, होळी, ईद, ख्रिसमस, महाशिवरात्री अशा असंख्य धार्मिक आणि सामाजिक सोहळ्यांमुळे भारताला “उत्सवप्रिय देश” म्हणून ओळखले जाते. या उत्सवांचे मूळ धार्मिक असले तरी त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजाभिमुखता आणि लोककल्याण दडलेले आहे.

परंतु आजच्या आधुनिक काळात या उत्सवांचे स्वरूप बऱ्याच ठिकाणी बदलले आहे. समाज एकत्र यावा, माणूस माणसाशी जोडला जावा, श्रद्धेला बळ द्यावे, हे या सोहळ्यांचे प्रमुख उद्दिष्ट असायला हवे होते. परंतु काही ठिकाणी या सोहळ्यांना राजकीय, व्यावसायिक आणि वर्चस्वाचे रंग चढले आहेत. ही चिंतेची बाब आहे.

बदलते स्वरूप आणि त्याचे दुष्परिणाम

सण-उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत गेल्या काही दशकांत मोठा बदल झाला आहे. पूर्वी भक्तीभावाने, साधेपणाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे होत. आज मात्र त्यात भपकेबाजी, स्पर्धा आणि दिखाऊपणा अधिक दिसतो. धार्मिक सोहळ्यांच्या नावाखाली काही ठिकाणी डीजेचे कर्णकर्कश आवाज, मिरवणुकीत होणारे अश्लील नृत्य, दारूचे सेवन, धिंगाणा आणि भांडणे असे अपप्रकार घडतात. त्यामुळे उत्सवाचा पवित्र हेतू हरवतो आणि त्याऐवजी सामाजिक प्रदूषण वाढते.

गणेशोत्सवाच्या किंवा दुर्गापूजेच्या वेळी मुर्ती विसर्जनाची वेळ येते. नदी, तलाव किंवा समुद्रात लाखो मुर्त्या विसर्जित होतात. त्यानंतरची विटंबना मन विषण्ण करणारी असते. तुटलेल्या मूर्ती, विखुरलेली फुले, प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग आणि रासायनिक पदार्थामुळे जलप्रदूषण होते. श्रद्धेचा अपमान होतो तो वेगळाच.

वर्तमानपत्रांतही हाच अतिरेक दिसतो. जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस किंवा धार्मिक दिन विशेष या निमित्ताने संपूर्ण पाने जाहिरातींनी भरून जातात. देव-देवतांचे, थोर पुरुषांचे मोठमोठे फोटो छापले जातात. एका दिवसापुरते ते लोकांच्या नजरेत येते आणि दुसऱ्या दिवशी ते सारे रद्दीत जाते. त्यामुळे पैशांचा अपव्यय तर होतोच, पण या स्मरणदिनामागचा खरा हेतूही मागे पडतो.

आवश्यकतेचा विचार

या पार्श्वभूमीवर काही कठोर पण समाजहिताच्या उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. भक्ती असावी पण दिखाऊपणा नको. सण असावा पण सामाजिक शिस्त मोडून नव्हे तर बांधून ठेवणारा असावा. यासाठी आचारसंहिता असणे अत्यावश्यक आहे.

आचारसंहितेतील काही आवश्यक मुद्दे

1. वर्तमानपत्रातील जाहिरातींवर नियंत्रण

थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी किंवा धार्मिक उत्सवांच्या जाहिराती मोठ्या आकारात देण्यापेक्षा माहितीपूर्ण लेख, प्रेरणादायी आठवणी किंवा जनजागृतीचे संदेश देणे अधिक योग्य ठरेल.
संपूर्ण पाने जाहिरातींनी व्यापणे टाळावे.

2. प्लास्टिक बॅनर आणि फ्लेक्सवर बंदी

प्रत्येक सण-उत्सवाच्या काळात रस्त्यांवर असंख्य बॅनर आणि फ्लेक्स लावले जातात. यातून दृश्य प्रदूषण तर होतेच, पण त्यांचा कचरा पर्यावरणालाही घातक ठरतो. त्यामुळे यावर पूर्णपणे बंदी असावी.

3. मुर्तींच्या उंचीवर मर्यादा

स्पर्धेच्या पलीकडे जाऊन काही मंडळे अत्यंत उंच मुर्ती बसवतात. यामुळे केवळ वाहतूक, सुरक्षेची समस्या निर्माण होत नाही, तर विसर्जनाच्यावेळीही मोठा त्रास होतो. मुर्तीच्या उंचीवर शासनाने निश्चित मर्यादा घालावी.

4. मंडळांची नोंदणी व जबाबदारी

प्रत्येक उत्सव मंडळाची अधिकृत नोंदणी असावी. उत्सवानंतर जमाखर्च संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक असावे. यामुळे पारदर्शकता येईल आणि अपव्यय कमी होईल.

5. पदाधिकारी व सदस्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र

शिक्षक, पोलीस किंवा सरकारी सेवेत नियुक्तीसाठी जसे चारित्र्य प्रमाणपत्र लागते, तसेच उत्सव मंडळातील पदाधिकारी आणि प्रमुख सदस्यांसाठीही ते आवश्यक असावे. यातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक धार्मिक सोहळ्यांत शिरकाव करणार नाहीत.

6. डीजे आणि ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण

डीजेचे कर्णकर्कश आवाज विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण करतात. जेष्ठ नागरिक, रुग्णालयातील रुग्ण यांना त्रास होतो. म्हणून ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियम केले जावेत.

7. पर्यावरणपूरक सण

मुर्त्या शाडूच्या मातीच्या असाव्यात. रंग, फटाके, प्लास्टिक टाळावे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, सामाजिक उपक्रम अशा सकारात्मक कृतींनी उत्सव साजरा करावा.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

आपला समाज श्रद्धाळू आहे. श्रद्धेमुळे माणसाला मानसिक बळ मिळते. पण अंधश्रद्धेमुळे समाज मागे जातो. देव-देवतांचा अपमान करून, निसर्गाची नासधूस करून किंवा दुसऱ्यांना त्रास देऊन केलेली पूजा ही खरी पूजा ठरू शकत नाही. उत्सवांचा हेतू माणसाला माणसाशी जोडणे हा आहे. परंतु सध्या काही ठिकाणी उत्सव हे दुरावा, प्रदूषण आणि हिंसाचाराचे निमित्त बनत आहेत. हे थांबवण्यासाठी समाजाची जाणीव आणि शासनाची आचारसंहिता, दोन्ही आवश्यक आहेत. सण हे जीवनात आनंद निर्माण करणारे, समाजाला एकत्र आणणारे, संस्कार घडवणारे असावेत. “माझी श्रद्धा आहे, परंतु अंधश्रद्धा नाही” ही भूमिका प्रत्येकाने घेतली, तर सण-उत्सव अधिक सुंदर, अधिक पवित्र आणि खऱ्या अर्थाने समाजकल्याणकारी ठरतील.

प्रशांत शेळके (एक वाटसरू)
ता. हिंगणघाट, जि. वर्धा
======

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे