‘धर्माधिष्ठित लोकांची एकजूट व्हायला हवी’; – शंकर अभ्यंकर
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
‘धर्माधिष्ठित लोकांची एकजूट व्हायला हवी’; – शंकर अभ्यंकर
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे.दि.13जाने.(प्रतिनिधी): भारतीय धार्मिक परंपरा आणि संस्कृती ही भारताची ऐतिहासिक आणि सामाजिक ओळख आहे. धर्म हा इथल्या समाजाच्या दैनंदिन आचरणाचा अविभाज्य भाग आहे. परंतु हजारो वर्षांची ही धार्मिक परंपरा विसरून आपल्याकडे निधर्मी संकल्पना स्वीकारणे, हा करंटेपणा आहे,असे प्रतिपादन तत्त्वचिंतक, निरूपणकार विद्यावाचस्पती डॉ.शंकर अभ्यंकर यांनी केले आहे.’भारतीय संस्कृती संगम’ आणि ‘आयडियल सोसायटी’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या सांस्कृतिक व्याख्यानमालेचे दुसऱे पुष्प अभ्यंकरांनी गुंफले.
“संतांची सामाजिक समरसता” हा व्याख्यान विषय होता. या वेळी त्यांनी संतांची जीवनधारणा कशी समाजात समरसता घडवून आणणारी होती, या मुद्द्यांची मांडणी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुरेश गोसावी अध्यक्षस्थानी होते.
‘निधर्मी’ या संकल्पनेबद्दल अधिक विश्लेषण करताना डॉ.अभ्यंकर म्हणाले, ” धार्मिक परंपरेला आधुनिक निकष लावून त्यादृष्टीतून पाहणे, म्हणजे इथल्या प्राचीन थोर परंपराचा अपमान करणे आहे. देशाचा ऐतिहासिक वारसा आणि त्याला जोडलेली जीवनमूल्ये जपली जाणे आवश्यक असून ही परंपरा आपल्यापासून गमावली जात आहे. आधुनिक धर्मनिरपेक्षतेची संकल्पना भारतीय परंपरेच्या खोल अर्थाशी विसंगत आहे. समाजात चांगल्या गोष्टी उद्ध्वस्त केल्या जात असून वाईटाचे उदात्तीकरण होत आहे. त्यामुळे धर्माधिष्ठित लोकांनी एकजूट करून वाईट प्रवृत्तीचा पराभव करायला पाहिजे, असे सांगून डॉ. अभ्यंकर पुढे म्हणाले, ” संतांचं कार्य केवळ आध्यात्मिक उन्नती पुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी समता, न्याय आणि मानवता प्रस्थापित केली. सर्वसमावेशक वृत्ती, सहिष्णुता आणि एकोपा ही संतांची खरी शिकवण आहे. ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, संत तुकाराम ह्या सारख्या विभूतींनी कधीही जाती, धर्म किंवा सामाजिक स्थितीच्या आधारावर भेदभाव केला नाही. आपण ज्या हिंदू संस्कृतीत जन्म घेतला, त्यात “वसुधैव कुटुंबकम्” ही मूळ संकल्पना आहे. हिंदू संस्कृती पृथ्वीवरच्या सा-यांकडे एक कुटुंब म्हणून पाहते. संपूर्ण विश्वाला समरसतेच्या उच्चतम मूल्यांची प्रेरणा भारतीय तत्वज्ञानातून मिळते” अशा शब्दात त्यांनी आपल्या चिंतनाचा समारोप केला.
अध्यक्षीय भाषणात डॉ सुरेश गोसावी यांनी संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शंकर अभ्यंकरांचे विचार हे समाजिक समरसतेसाठी महत्त्वाचे आहेत, असे सांगून भेदाभेद दूर सारून सामाजिक समरसता सध्याच्या काळात अतिशय गरजेची असल्याचे प्रतिपादन केले. ‘भारतीय संस्कृती संगम’ संस्थेचे विश्वस्त गोविंद बेडेकर यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सुधीर पाचपोर यांनी पद्य गायन केले. श्रद्धा लोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. श्री ब्रह्मे यांनी आभार मानले. निनाद केळकरांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



