“वाकडी तर वाकडी ..मी रसरशीत काकडी”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“वाकडी तर वाकडी ..मी रसरशीत काकडी”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
अहो, वाचक मंडळी.. मी बोलतेय रसरशीत, लुसलुशीत तुमच्या ताटातील हिरवी , पांढरी , काटेरी काकडी. तुम्हाला माहित आहे का इतिहासात माझ्या अस्तित्वाचे पुरावे तीन हजार वर्षाहून प्राचीन आहेत. आणि माझा उगम सुजलाम् सुफलाम् अशा माझ्या प्रिय भारत देशात हिमालयाच्या पट्ट्यातच झाला आहे बरं का! मी “कुकुर्बिटेशी” या वेलवर्गीय वनस्पती प्रकारातील आहे. मी एक प्रमुख फळबाजी असून माझे प्रामुख्याने देशी, पांढरी, हिरवी, काटेरी आणि तवसाची काकडी असे विविध प्रकार पडतात. काटेरी काकडीला बाजारात जास्त मागणी आढळते.
आला उन्हाळा ..आरोग्य सांभाळा
आहारात करा माझा वापर
दूर राहतील उष्णतेच्या झळा..!!
मग काय मंडळी एक दिवस मी तुमच्या ताटात नसले तर तुम्हाला कसे चुकल्यासारखे वाटते ना? तुम्ही मला इतकी आवडीने खाता मग माझे उपयोग सांगते बरं ! मी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते कारण 95% पेक्षा जास्त पाण्याने मी भरलेली आहे. कोणाला वजन कमी करायचे असेल तर माझी मदत घ्या. त्वचा चमकदार हवी असेल, ब्लड प्रेशर, हृदय निरोगी ठेवण्यासाठी, हानिकारक घटक बाहेर टाकण्यासाठी, जळजळ अशा विविध गोष्टींसाठी माझा उपयोग होतो. मी कच्ची तर सर्वांनाच आवडते पण माझ्यापासून खमंग काकडी, थालीपीठ, धोंडस किंवा धोनस, कोशिंबीर, तवसाळे किंवा तवसाची वडी असे अनेक पदार्थ बनवले जातात.
मी आहेच गुणी म्हणून तुम्हाला हवी हवी
पण माझा वापर करताना थोडी काळजी घ्यायला हवी…!!
एक महत्त्वाचे सांगू का? माझा वापर खाण्यात जर चुकीच्या पद्धतीने केला तर काही तोटे देखील होऊ शकतात बरे. अतिप्रमाणम् घातकम्..! अति प्रमाणात सेवन घातकच की ,ते म्हणतात ना “अति तिथे माती.” आणि हो मला शक्यतो रात्रीच्या वेळी खाणे टाळा कारण पोटाशी संबंधित गॅस, अपचन अशा समस्या होऊ शकतात. किडनीचे आजार असणाऱ्यांना माझ्या जास्त वापराने ‘हायपर कॅलेमिया’ होऊन किडनी निकामी होऊ शकते. वारंवार लघवीला होणे ही समस्या निर्माण होऊ शकते. माझी प्रकृती थंड असल्याने सायनस आणि ऍलर्जी या त्रासांमध्ये वाढ होऊन त्वचेवर खास सुटणे किंवा सूज येणे असे प्रकार होऊ शकतात. माझ्या शरीरात विटामिन के(k) मुबलक प्रमाणात असल्याने रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात जर तुम्ही रक्ताला पातळ करणारी औषधे घेत असाल तर आणि हो कधीकधी मी कडू लागते त्यावेळी मात्र मला खाणे टाळाच. कारण त्यावेळी क्यूकरबिटाशीनचे प्रमाण जास्त असते आणि ते विषारी असू शकते. थोडक्यात काय तर तुमची ‘प्रकृती’ कशी आहे ओळखा आणि माझा मनमुराद आनंद घ्या. आणि हो, मला स्वच्छ धुऊन खा पण छिलून खाऊ नका. कारण माझ्या टरफला जवळ पोषक घटक सगळ्यात जास्त असतात. बरं का मंडळी, काळजी घ्या ..आरोग्यदायी राहा.. प्रमाणात खा ..जीवनाचा माझ्यासोबत आनंद घ्या.
आज राहुल दादांनी बालकविता स्पर्धेसाठी ‘वाकडी तर वाकडी’ हा विषय दिला आणि मला समूहातील सर्व बालकवींना बोलण्याची संधी प्राप्त करून दिली म्हणून आज मी तुमच्यासोबत संवाद साधू शकले. त्याबद्दल राहुल दादांचे शतशः ऋण! तुमचीच ‘वाकडी तर वाकडी’ असणारी काकडी.. सर्व बालकवींना माझ्याकडून लेखणीसाठी भरभरून शुभेच्छा.. धन्यवाद..!!!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
सहप्रशासक/ मुख्यपरीक्षक
©मराठीचे शिलेदार समूह



