कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पुण्यात रंगले राजयोग कवी संमेलन
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पुण्यात रंगले राजयोग कवी संमेलन
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे : राजयुवा प्रकाशन आणि काव्ययोग काव्य संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त राजयोग कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन, बक्षीस वितरण आणि पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस होते. कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून गझलकार बाळासाहेब गिरी यांनी भूमिका बजावली, तर डॉ. शंकर अदाणी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. बालसाहित्यिका वसुधा नाईक, सायको-सोशल कौन्सेलर सोनाली फडके, बालसाहित्यिका ललिता सबनीस, ज्येष्ठ लेखिका हेमलता गीते आणि पोलीस आयुक्त मोहन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सहा पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कवी भालचंद्र खरळकर लिखित ‘खिंडवाट’ हा कवितासंग्रह, अर्चना पाटील लिखित ‘संसाराचा गाडा’ हा कथासंग्रह, वसुधा नाईक आणि योगेश हरणे संपादित ‘साहित्यप्रभा’ हा दिवाळी अंक, गौरव पुंडे आणि योगेश हरणे संपादित ‘माणुसकीची सावली’ तसेच विकास घोणे लिखित ‘शिंपल्यातले मोती’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
या साहित्यिक सोहळ्यानंतर आयोजित कवी संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे ५० कवींनी सहभाग घेतला. विविध विषयांवरील आणि वेगवेगळ्या आशयांच्या कवितांनी संमेलन रंगतदार झाले. सहभागी सर्व कवींना आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळाही पार पडला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम घडे, करण सोळसे, राजयुवा प्रकाशनाचे प्रकाशक गौरव पुंडे, योगेश हरणे आणि मयुरी लायगुडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे निवेदन गजानन उफाडे यांनी केले. साहित्य, कविता आणि पुस्तकांच्या संगमातून हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



