ओसरलेल्या बहरात, फुकटात विकलेली माणुसकी’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘ओसरलेल्या बहरात, फुकटात विकलेली माणुसकी’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण
कालची मकरसंक्रांती, नेहमीच्या व्यस्त वेळापत्रकातला जरा मोकळा दिवस. व्रत,वैकल्य,पूजाअर्चा, सण सारं काही साजरा करून दुपारी जरा वेळ मिळाला. मी थोडं भूतकाळात शिरले…! लहानपण आठवलं, सहजच तुलना केली. केवढा उत्साह असायचा लहानपणी… खास करून दसरा आणि मकर संक्रांतीला दोन-तीन वाजेपासून लगबग असायची. सर्वत्र जाण्याचा उत्साह असायचा. डब्यात आई लाडू भरून देत असे. अर्धगाव तरी पायाखाली घालणारच.. थोरामोठ्यांचा आशीर्वाद मिळायचा,त्यांच्याकडून विचारपूस केली जायची. कुणी मार्गदर्शन करायचं तर कोणी शाबासकी द्यायचं. कधी कधी ज्येष्ठ विचारायचे कुणाची नात आहे? त्यानिमित्ताने आजी-आजोबांच्या काही आठवणीही ऐकायला मिळायच्या.
कुठं हरवलं हे सारं? खरंच हरवलंय…. नवीन पिढीत सण, उत्सव याबाबत आपुलकी कमी झालीय का ??? सहज माझ्याच मनाला प्रश्न विचारला. मन म्हटलं “बहर” ओसरला ग.. नात्यांमधील ओलाव्याचा…. माणसातील माणुसकीचा… मुलांमधील सौजन्याचा… समाजातील संस्काराचा… रक्तामधील आपुलकीचा.. प्रेमामधील भावनांचा…. खरंच ओसरला…बहर. कोण जाते हो हल्ली सणाच्या निमित्ताने एक दुसऱ्याकडे? पैशाने भौतिक सुख विकत घेतलीत आपण. त्या बदल्यात अगदी स्वस्तात, किंबहुना फुकटात माणुसकी विकली.
हे सर्व पाहून निसर्ग तरी कसा बर मागे राहील?त्यानेही मग हळूहळू सारं कमी केलं पर्जन्याचा बहर कमी झाला. कमी झाला रंगीबेरंगी फुलांचा..अन् रानमेव्याचाही कमी झाला… कमी झाला पशुधनाचा. या बदल्यात काय वाढलं ? वाढले ना फास्ट फूडचा बहर. कुणाला चिंता आहे? स्वआरोग्याची. परिणाम पहा.. तीन वर्षाच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दगावली नुकतीच. रूढी, परंपरा सारं काही ओसरलं….लग्नासारख्या पवित्र विधीतलं पावित्र्य कमी झालं..अन् त्याची जागा घेतली उन्नत, उत्थान घटनांनी…प्री वेडिंग असो की..नवरदेवाला माळ टाकण्यापूर्वी उचलून घेणे असो. कसं थांबेल हो सर्व .. मराठी सारस्वत रसिकांनो…..ही विचार करायची वेळ आहे “बहर” इतकाही नको ओसरायला की, त्याला इतिहासात शोधावं लागेल.
आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी “बहर” हा विषय दिला आणि तमाम सारस्वतांच्या लेखणीला जणू उधाणच आलं. सर्वांनी आपापल्या परीने विषयाला “बहर” आणला. सर्व कवीकवयित्रींचे मनापासून अभिनंदन व शुभेच्छाही. परीक्षणार्थ रचना वाचताना वैशालीताईंच्या या रचनेनं तर माझ्या अंतकरणाचा ठाव घेतला..!
ऋतूही चेष्टेखोर झाला
पानगळी नंतर कधीही…..
बहर आयुष्यात न आला
हिरमुसून बसली ती सखी
पण कळली ना वेदना कुणा
घाव बसले किती मनावरी…
मोजल्या नाही कुणी खुणा
एकटीच चालतेय वाट ती…
मार्ग जरी खडतर वेडावाकडा
बहर येण्या पुन्हा नवा….पुन्हा नवा
‘खडतर वाटेवर चालणारी स्री सुद्धा बहर येईल पुन्हा नवा या आशेवर काटेरी वेदना सहन करीत जीवनपथ काटतेय’; तेव्हा आपण सर्वांनीही आशावादी राहून वाटचाल करूया..तूर्तास एवढेच…!
सौ.सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह



