पुण्यात उपवरांचा परस्परांशी प्रत्यक्ष संवाद
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुण्यात उपवरांचा परस्परांशी प्रत्यक्ष संवाद
वैवाहिक जीवनासाठी “ब्रह्मसखी” चा उपक्रम
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे: दि.४डिसे.(प्रतिनिधी) फक्त सौंदर्य, चांगला पगार, श्रीमंती यापेक्षा नात्यांमध्ये विश्वास, वर्तनात सुसंस्कृतपणा आणि एकत्र कुटुंबातला आनंद या गोष्टी वैवाहिक जीवनासाठी जास्त पूरक ठरतात. परिवारात सर्वांना सांभाळून, मने जुळवून घेतली तर पती-पत्नीचे नाते घट्ट होते, या विश्वासातून “ब्रह्मसखी वधुवर मंडळा”तर्फे खास उपवर मुला मुलींसाठी ‘प्रत्यक्ष संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमास प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “विवाहावेळी मुलामुलींच्या मनात सांसारिक जीवनाच्या कल्पना स्पष्ट असाव्यात. योग्य वयात विवाह, अपत्यजन्म आणि बाल संगोपन होणे अपेक्षित आहे. सध्या घटस्फोटाचे प्रमाण चिंताजनक झाले असून परस्पर संवादाच्या अभावाने हे घडते. सुख-दुःखात आपली माणसेच खरा आधार असतात, म्हणून वेगळे राहण्याचा विचार नव दांपत्याने करू नये.”
वीणा गोखले यांनी आपले विचार मांडताना तरुण वयातील मुलामुलींचे विवाह अवघड होत असल्याचे सांगून त्यादृष्टीने उपवर मुलामुलींना एकत्र आणून भावी जीवनसाथी निवडण्याची संधी देणा-या ब्रह्मसखी आयोजित प्रत्यक्ष संवाद उपक्रमाची प्रशंसा केली. संसाराची सुरूवातच जर अशी सुसंवादाने झाली तर लग्नानंतर दोघांनाही घरातच आपली ‘सपोर्ट सिस्टीम’ उभी करणे सोपे जाईल असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रम संयोजिका नंदिनी ओपळकर या उपक्रमाची माहिती देताना म्हणाल्या, ” उपवर मुलामुलींसाठी ब्रह्मसखीच्या वतीने वैविध्यपूर्ण उपक्रम छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे गेल्या पाच वर्षांपासून राबविले जात आहेत. या कार्यक्रमास लोकांचा भरभरून प्रतिसाद असून ‘प्रत्यक्ष संवाद’ उपक्रमातून मुलामुलींना अनुरूप जोडीदार निवडण्याची एक चांगली संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.”
अस्मिता पांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. “ब्रह्मसखी’च्या तृप्ती कुलकर्णी, ज्योती कानोले, गीता सराफ यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. सनईचे मंगल सूर आणि भावी जोडीदाराच्या निवडीची हुरहूर अशा वातावरणात तरूण, तरूणींचा एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद रंगला आणि यातून काही विवाह जुळले.





