स्व-विकास
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा- पुणे
स्व-विकास
जिथे आपल्या असण्याला किंमत आहे, तिथेच आपल्या अस्तित्वाची हजेरी निश्चित लावावी. स्व -विकास होतो. सूर्य रोजचा तोच आहे आजही तोच आहे, कालही तोच होता, आणि भविष्यातही तोच असणार आहे. त्याचं येणं जरी रोजच आहे, तरीसुद्धा तीव्र उन्हामध्ये आपल्याला त्याचा तिटकारा येतो. उन्हामुळे त्रास होतो. आणि याच सूर्यामुळे कडाक्याच्या थंडीत मात्र सूर्याचे तापमान हवे हवेसे वाटते. स्वतःची एक किंमत तयार करा आपण जेव्हा प्रत्येकासाठी पाहिजे त्या कारणासाठी, पाहिजे त्यावेळी कोणत्याही सबबी शिवाय उपलब्ध राहतो, अशावेळी समोरची व्यक्ती आपल्याला गृहीत धरत असते.
याची दुसरी बाजू नकारात्मक आहे ते म्हणजे आपल्या वेळेची किंमत कोणालाही नसते. आपण त्यांच्यासाठी वेळ दिला म्हणजे आपणच आपल्या वेळेचा किती अपमान करतो हे आपण ठरवावे. स्वतःच्या वेळेची किंमत व इतरांच्या वेळेचा अपमान करणारी अशा बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनात असतात. मराठीत एक सुंदर म्हण म्हणण्यापेक्षा एक विचार आहे, ‘स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले केव्हाही चांगलं.’ जगाच्या नजरेत आपल्याला चांगलं ठरवण्यासाठी, समाजाला आपल्याला खाल्ल्यावर घेऊन मिरवा व अशा शुल्लक अपेक्षा साठी काही लोक स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवायला तयार असतात. अशा लोकांपासून सावध राहावे. काही लोक असे असतात की स्वतःच्या विचारांमध्ये गर्क असतात त्यांना गर्दी नको असते स्वतःच्या छोट्या विश्वात रममाण असतात आणि त्यातच स्वर्ग सुखाची अनुभूती घेणारे असतात.
स्वतःच जगणं संपन्न करण्यासाठी आणि अधिक समृद्ध करण्यासाठी आपल्यासाठी हवी असणारी योग्य तत्व निवडण्यासाठी योग्य लोकांचा योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन घेऊनच ठरवली पाहिजेत आपल्या तत्वांशी आपण ठाम राहिलं पाहिजे आणि अशा निर्मळ व्यक्तीचं अनुकरण केलं पाहिजे. थोडक्यात काय तर कोणतंही कृत्य, काम पूर्ण बरोबर किंवा पूर्ण चुकीचं असतं असं नाही. त्याकडे आपण कसं पाहतो, त्याचं अनुकरण आपण कसं करतो त्यावर बऱ्याश्या गोष्टी अवलंबून असतात. आपली तत्व आपले विचार कसे योग्य आहेत हे आपण समोरच्याला त्यावेळी खात्रीने पटवून देता आलं पाहिजे.
आपल्या अंतर्मनाला या तत्त्वाचे महत्त्व कळलं पाहिजे आणि प्रत्येकाला खुश ठेवणं प्रत्येकाचं मन राखणं यासारख्या निरर्थक गोष्टींना आपण अवाजवी महत्त्व देत बसतो हे खरं आहे. पण आपल्या अस्तित्वाच आपणच विसर्जन करू नये. लोकांना खुश ठेवणं हे चुकीचं नाही, पण समोरच्याच्या सुखासाठी आपण आपलं सुख, समाधान पणाला लावणे, चुकीच्या गोष्टी आत्मसात करणे हे नक्कीच चुकीचे आहे. त्यासाठी सर्वांसाठी सर्व करा पण ते सर्व करताना आपलं सर्वस्व बाजूला ठेवण्याची वेळ येणार नाही याची न विसरता काळजी घ्यावी आणि हाच आपल्या माणूसपणातला आपण दिलेला सर्वांगीण न्याय आहे असे मला तरी वाटते.
“स्वतः आहे असेच राहा. इतरांना सुख वाटण्याचा प्रयत्न करा. आनंद वाटण्याचा प्रयत्न करा. कोणालाही आपल्यामुळे डोकं होणार नाही याची काळजी घ्या. माणूस म्हणून जन्माला आला तर माणसासारखेच माणसाशी वागा.”
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा- पुणे
========



