30 मार्चपासून राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट

30 मार्चपासून राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: ( दि २९) राज्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसाने आधीच थैमान घातले असताना, आता महिनाअखेरीस पुन्हा एकदा पावसाचे सत्र सुरू होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाचं सावट वर्तवण्यात आलं आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरात सध्या उकाडा वाढला असून रविवारी हवामान स्थिर राहण्याचा अंदाज आहे. मात्र, सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा (Hailstorm) इशारा देण्यात आला आहे. विशेषतः विदर्भातील हवामानात मोठे बदल होणार असून पावसाच्या हजेरीमुळे शेतीकामांना अडथळा निर्माण होऊ शकतो. मंगळवारी, ३१ मार्च रोजी पावसाचा जोर काहीसा कमी झाला तरी ढगाळ हवामान आणि मेघगर्जना कायम राहणार आहे.
शनिवारी सोलापूर (Solapur) जिल्ह्यात सर्वाधिक ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर जळगाव (Jalgaon) आणि परभणी (Parbhani) मध्ये ३९.५ अंश सेल्सिअस पारा पोहोचला होता. मात्र, सोमवारपासून या तापमानात घट होऊन पावसाळी वातावरण तयार होणार आहे.



