चला जाणून घेऊया आपल्या लाडक्या बाप्पाचा इतिहास!
डॉ. अविनाश प . परांजपे वानाडोंगरी, जि. नागपूर

चला जाणून घेऊया आपल्या लाडक्या बाप्पाचा इतिहास!
खरं पाहता आपण सर्व भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचा इतिहास पूर्णपणे जाणून घेणे आवश्यक वाटते. त्यामुळे बाप्पाच्या श्री गणेशोत्सवातील होणारे गैरप्रकार, अंधश्रद्धा, चुकीच्या समजुती यांना आळा बसू शकेल असे वाटते. आपला बाप्पा हा जगातील एकमेव सर्वधर्मी देव आहे. पण हे कसे काय याकरिता आपणास श्री गणेशाचा इतिहास माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
साधारणतः श्रीराम अवताराच्या समाप्तीनंतर प्रभू श्रीरामांनंतर 16 -17 व्या पिढीचा कालखंड असावा असे अनुमान इराण येथील उत्खननात सापडलेल्या श्री गणेश मूर्तीच्या अभ्यासानंतर तज्ञांनी तो काळ सहा हजार वर्षे बीसी असावा असे म्हटले आहे. सापडलेल्या काही धातूच्या गणेशमूर्तींच्या काळ बाराशे बीसी असावा असे तज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून आपल्या श्री गणेश दर्शन, रुद्र पुराण, नारद पुराण, स्कंद पुराण, शिव पुराण, सांख्य दर्शन, शक्ती दर्शन, गणेश पुराण, ब्रह्मपुराण, इत्यादींमधील नोंदी वाचल्यावर आपल्याला श्री गणेशाचा इतिहास कळतो. फक्त त्याची सुसूत्र मांडणी करणे आवश्यक ठरते.
तर असे की प्रभू श्रीराम अवतारानंतर काही शतके उलटल्यावर पुन्हा राक्षसी शक्तींनी तोंड वर काढण्यास सुरुवात केली. त्यांना पराभूत करू शकेल, प्रत्युत्तर देऊ शकेल व नष्ट करू शकेल अशा सामर्थ्याचा राजा त्याकाळी जम्मुद्वीपावर कोणीही अस्तित्वात नव्हता, त्यामुळे राक्षसी शक्ती जोमाने फोफावल्या. त्यांनी जम्मुद्वीपातील ( म्हणजे त्या काळाचे भारत भूमीचे नाव. ज्यात सध्याचा अफगाणिस्तान, अरबस्थांनचा काही भाग, पाकिस्तान, तिबेट, नेपाळ, बांगलादेश, भूतान, ब्रह्मदेश, श्रीलंका, व सध्याचा हिंदुस्तान यांचा समावेश होता ) मानवी वस्त्यांवर हल्ले,आक्रमणे करणे सुरू केले. त्यावेळी त्या त्या भागातील दुष्ट विचारांच्या ज्या गावप्रमुख, जे की शस्त्र शक्तीच्या जोरावर गाव प्रमुख, नगरप्रमुख बनले होते; त्यांनी या राक्षसी शक्तींच्या बरोबर मैत्री करून सर्वत्र अनाचाराचे थैमान सुरू केले होते. त्यांचा नायक विघ्नासूर होता.
या असूरी शक्तींच्या विरोधासाठी पुन्हा एकदा दैवी ईश्वरीशक्तीने जन्म घ्यावा अशी समस्त प्रजेची प्रार्थना सुरू होती. त्या रयतेच्या दुःखाने जगत नियंत्याला पाझर फुटला, आणि त्याने माघ शुक्ल चतुर्थीला श्री गणेशास अवनीतलावर धाडले. तो दिवस आजही श्री गणेश जयंती म्हणून साजरा होतो. परंतु मुख्य बाब अशी, की श्री गणेशाचे माता पिता कोण याची नोंद कोठेही नाही. संदर्भ ग्रंथातील नोंदणी नुसार झाले असे, की श्री शिवशंकर भगवान तपस्येकरिता हिमालयात एकांत ठिकाणी निघून गेले. ते तसे नेहमीच जात, आणि त्यांची तपस्या ( एक तप = बारा वर्षे )! अशी प्रदीर्घ असायची. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत शिवशक्ती माता-पार्वती, कैलास आश्रमाची व्यवस्था सांभाळत असे.
नित्यनेमाप्रमाणे जगन माता पार्वती स्नानाकरिता गंगागिरी गेली. त्यावेळी माघ शुद्ध चतुर्थी होती. तेव्हा जगन्मातेस एका नवजात बालकाचे रडणे ऐकू आले. मातेने शोध घेतला असता तिला, एक काळपट वर्णाचे, कुरूप, वाजवीपेक्षा मोठ्या नाकाचे बालक हिरवळीवर रडून रडून आकांत करितांना आढळले. मातेने त्यास उचलून हृदयाशी धरले. ह्या बालकाचे रुदन क्षणात थांबले. व ते मातेस बिलगले. मातेनेही त्यास स्वपुत्र मानून त्याचा स्वीकार केला. दिसामासाने बालक वाढू लागले. प्रत्यक्ष पर्वती मातेने पुत्र मानलेल्या या बालकास आश्रमवासी धूम्र वर्ण म्हणजे धुरकटल्या रंगाचा, ( कारण शिवपार्वती दोघेही गौरवर्णी होते ) वक्रतुंड, म्हणजे वाकड्या तोंडाचा, वगैरे नावांनी संबोधू लागले. शिवशक्ती माता पार्वतीने सर्व आश्रमवासीयास हा माझा पुत्र आहे असे सांगितल्याने त्यास ‘पार्वतीनंदन’ या नावाने मान्यता देऊन ओळखू लागले. मात्र असे करताना त्या काळाच्या भोळ्या भाबड्या कैलास आश्रमवासियांनी असे तर्क मांडले, की जर हा पार्वती मातेचा पुत्र असेल तर असे कसे? कारण शिवशंकर तर कैलासावर नाहीत आणि ते तपस्येला जाण्यापूर्वी माता पर्वती गर्भधारिका असल्याचेही दिसले नाही. मग नक्कीच या पुत्रास मातेने मातीची मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले असणार.
आणि ही माती पार्वती माता ज्याने स्नान करीत असते त्या लेपणासाठी वापरली जाणारी मृत्तिकाच असणार. ह्या तर्कदृष्टीने सर्वत्र असा समज पसरला की हा बालक पार्वती मातेच्या अंगावरील मळापासून जन्मला. तो समज आजतागायत सत्याच्या मुळाशी न जाता कोणीतरी सांगितले किंवा कोठेतरी कोणत्यातरी हेच अज्ञान बाळगणाऱ्या माणसाने लिहून ठेवले, म्हणून तेच खरे हे मानणारा आजकालचा भोळा भाबडा जनसमुदाय, हेच सत्य म्हणून मान्य करतो. स्वतःला शस्त्रास्त्रांचे संपूर्ण ज्ञान असलेल्या पार्वती मातेने या बालकाचे पालन पोषण अगदी मन लावून केले. त्यास सर्व शस्त्रास्त्र विद्या शिकविल्या. हे शिक्षण घेत असता पार्वती मातेने त्या बालकाची विलक्षण आणि विचक्षण बुद्धिमत्ता लक्षात घेऊन त्यास जम्बुद्वीपाच्या रक्षणार्थ तयार करावे असे योजले.
कारण दैनंदिन मातेच्या कानावर राक्षसराज विघ्नासुराच्या मन हेलावणाऱ्या अत्याचारांच्या कथा व दुष्कृत्य त्याचे पाढे येत असत. वाढता वाढता पार्वती नंदन 10 11 वर्षांचे झाले शस्त्रास्त्र प्रवीण झाले अन् एके दिवशी स्वयं भगवान शिव शंकर महादेव कैलास आश्रमात परतले त्यावेळी अनोळखी व्यक्तीस कैलास आश्रमात प्रवेश देणे अनुचित आहे असे मानून वक्रतुंड पार्वती नंदनाने त्यास आश्रम प्रवेशापासून रोखले.( या पुढील समाज मनात रूढ झालेली बाब म्हणजे शिव गणेश युद्ध झाले. शिवाने गणेशाचे शिरच्छेदन करून त्यास पुन्हा हत्तीचे शिर बसवणे वगैरे अनैसर्गिक गोष्टी प्राचीन काळाच्या कथेकरी कीर्तनकार पौराणिक बुवांच्या मनघडंत पारंपारिक समजूतीच्या आहेत) उर्वरित पुढील भागात….!!
डॉ. अविनाश प . परांजपे
वानाडोंगरी, जि. नागपूर
========



