मराठी साहित्यातील ‘विद्रोह आणि समाज’
संजय गरबड मराठे उल्हासनगर, जि.ठाणे

मराठी साहित्यातील ‘विद्रोह आणि समाज’
मराठी साहित्यविश्वाचा इतिहास हा केवळ शब्दांच्या अलंकारांचा किंवा प्रतिभेच्या विलासाचा इतिहास नसून, तो प्रस्थापित व्यवस्थेच्या भिंतींना धडका देणाऱ्या विद्रोहाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. ‘विद्रोह’ म्हणजे केवळ नकार नाही, तर प्रस्थापित अमानवीय मूल्यांच्या जागी निकोप मानवी मूल्यांची स्थापना करण्यासाठी दिलेला एक जाणीवपूर्वक लढा आहे. मराठी साहित्याने संतांच्या काळापासून ते आजच्या डिजिटल युगापर्यंत प्रत्येक वळणावर विषमतेविरुद्ध दंड थोपटले आहेत. साहित्य हे समाजाचा आरसा असते असे म्हटले जाते, परंतु मराठीतील ‘विद्रोही साहित्याने’ हा आरसा केवळ दाखवला नाही, तर प्रस्थापित विषमतेचा तो आरसा फोडून त्यातून समतेचा नवा मार्ग तयार केला आहे.
या विद्रोहाची पहिली बीजे १३ व्या शतकातच पेरली गेली. जेव्हा संस्कृतच्या वर्चस्वाखाली प्राकृत लोकभाषा चिरडली जात होती, तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी “माझा मराठाचि बोलु कौतुकें” म्हणत भाषिक स्वाभिमानाचा पाया रचला. हा केवळ भाषेचा अभिमान नव्हता, तर ज्ञानाची मक्तेदारी मोडीत काढणारा तो पहिला वैचारिक उठाव होता. सामाजिक विद्रोहाचा खरा स्वर संत चोखामेळा यांच्या अभंगांतून उमटला. “ऊंस डोंगा परी रस नोहे डोंगा” असे म्हणत त्यांनी वर्णवर्चस्वाला थेट आव्हान दिले. या विद्रोही परंपरेचा खरा महामेरू म्हणजे, ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज’. तुकोबांनी तत्कालीन कर्मठ समाजातील दांभिकतेवर आपल्या शब्दांचे प्रहार केले. “भेदाभेद भ्रम अमंगळ” ही गर्जना करत त्यांनी विषमतेच्या मुळावरच घाव घातला. त्यांच्या विद्रोहाची धार इतकी प्रखर होती की, प्रस्थापितांनी त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले, पण विचारांचा प्रवाह कधीच रोखता येत नाही हे तुकोबांनी सिद्ध केले. त्यांच्या या बंडखोर विचारांनीच पुढील पिढ्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली.
विद्रोहाचा हा प्रवाह केवळ पुरुषांपुरता मर्यादित नव्हता, तर मराठी साहित्यात ‘विद्रोही स्त्री साहित्याने’ पितृसत्तेच्या गुलामीविरुद्ध अत्यंत टोकदार भूमिका घेतली आहे. या विद्रोहाची पहिली गर्जना १९ व्या शतकात ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ या ग्रंथातून केली. अत्यंत जहाल भाषेत त्यांनी पुरुषी मानसिकतेचे वाभाडे काढले. सावित्रीबाई फुलेंनी आपल्या काव्यातून अज्ञानाविरुद्ध युद्ध पुकारले. आधुनिक काळात या परंपरेला अधिक प्रगल्भ करण्याचे काम लेखिकांनी केले. साहित्याने स्त्रीला केवळ ‘त्यागाची मूर्ती’ किंवा ‘घरंदाज स्त्री’ या चौकटीतून बाहेर काढून तिला एक ‘स्वतंत्र मानवी अस्तित्व’ आणि ‘शरीर’ मिळवून दिले. आपल्या इच्छा, आकांक्षा, लैंगिकता आणि घरातील छुप्या शोषणाबद्दल स्त्रियांनी जे सकस आणि विद्रोही लेखन केले, त्यातूनच खऱ्या अर्थाने स्त्रीवादाची सामाजिक मांडणी झाली. बेबीडाली कांबळे यांचे ‘जिणं आमचं’ किंवा ऊर्मिला पवार यांच्या ‘आयदान’ मधून केवळ स्त्रीचा नव्हे, तर ‘दलित स्त्रीचा’ दुहेरी विद्रोह जगासमोर आला, ज्याने साहित्यातील साचेबद्ध स्त्री प्रतिमा मोडीत काढल्या.
१९ व्या शतकात महात्मा जोतिराव फुले यांनी साहित्याला ‘क्रांतीचे शस्त्र’ बनवले. ‘शेतकऱ्याचा असूड’ आणि ‘गुलामगिरी’ यांतून त्यांनी शोषितांच्या मनात विद्रोहाची ठिणगी टाकली, जिला पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक अधिष्ठान देऊन अधिक प्रखर केले. विद्रोही साहित्याचा सर्वात मोठा सामाजिक परिणाम म्हणजे शोषितांमध्ये निर्माण झालेले ‘आत्मभान’. जो समाज हजारो वर्षे स्वतःला ‘हीन’ मानत होता, त्याला साहित्याने स्वतंत्र ओळख दिली. बाबूराव बागुल, नामदेव ढसाळ, दया पवार आणि लक्ष्मण माने यांसारख्या लेखकांनी आपल्या अनुभवांच्या रक्ताने साहित्याची पाने लिहिली. यामुळे केवळ माणसे बदलली नाहीत, तर भाषेचेही खऱ्या अर्थाने ‘लोकशाहीकरण’ झाले. एकेकाळी केवळ उच्चभ्रूंची मक्तेदारी असलेली भाषा मोडीत काढून गलिच्छ वस्त्यांमधील बोली आणि शेताशिवारातील रांगडा शब्द जेव्हा साहित्यात मानाने बसला, तेव्हा समाजातील उच्च-नीचतेची दरी कमी होण्यास सुरुवात झाली.
‘मराठी साहित्यातील ही विद्रोही परंपरा म्हणजे मराठी संस्कृतीची सर्वात मोठी ओळख आहे’. हा विद्रोह कुणाचा द्वेष करण्यासाठी नसून, माणसाला ‘माणूस’ म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आहे. ही एक अशी ‘सांस्कृतिक शस्त्रक्रिया’ होती, जिने समाजातील विषमता नावाचा कर्करोग मुळापासून उपटून काढण्याचा प्रयत्न केला. आजचा समाज जो काही प्रमाणात समतावादी आणि न्यायप्रिय दिसत आहे, त्यामागे साहित्याचा हा ‘विद्रोही हुंकार’ एका महायुद्धासारखा उभा राहिला आहे. जोपर्यंत समाजात शेवटच्या रांगेतील माणूस उपेक्षित आहे आणि जिथे जिथे अन्याय जिवंत आहे, तोपर्यंत मराठी साहित्यातील ही विद्रोहाची लेखणी तळपतच राहील आणि येणाऱ्या पिढ्यांना समतेची दिशा दाखवत राहील.
संजय गरबड मराठे
उल्हासनगर, जि.ठाणे
=========



