
0
4
0
9
0
3
बाबा, फक्त तुम्ही हवे…
फुटलेले ढग आणि फाटले आभाळ
कशी सोसवेन चिमुकल्यांची आबाळ
दोर दिसे लटकलेला मनी काही बाही विचार
संपलो एकदा तर होणार नाही नजर बेजार
संपलेली आशा अन् संपलेला काळ
क्षणाचाही विलंब नको बदले ना वेळ
घात केला दैवाने दिसे समोर अंधार
चोच दिली चारा देईल म्हण ही बेकार
जाता मी पुढे भरेल मागच्याचे पोट
शेतकरी आत्महत्या देई मागच्यांना वाट
जीव माझा गुंतला परि या जीवाचाच गुंता
भरेल पोट मागच्याचे अकाली मी जाता
बाबा ,बाबा कानी कुठून आली ही हाक
नका जाऊ बळी, का जीव देता हकनाक
नवी सकाळ नवे किरण काम आम्ही करू
नको तुमचा बळी जरी उपासी आम्ही मरू
खाऊ एक घास नाही करणार आम्ही हट्ट
तुम्ही हवे फक्त आम्हा नको अनाथाची वाट
नको नविन कपडे नको दप्तरही नवे
भूक लागणार नाही बाबा, फक्त तुम्ही आम्हा हवे
शर्मिला देशमुख -घुमरे
ता.केज जि.बीड
=========
0
4
0
9
0
3





