Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरछत्रपती संभाजी नगरपरीक्षण लेखमराठवाडाविदर्भसाहित्यगंध

माझे आधारवड

वर्षा मोटे पंडित छत्रपती संभाजी नगर

0 4 8 2 9 7

माझे आधारवड

माणसाच्या आयुष्यात आई-वडील हे दोन खांब असतात. पण वडील हा खंबीर आधारवड असतो, जो दिसत नाही. पण नेहमी सावलीसारखा साथ देतो. आई जशी ममतेचं दव असते, तसा वडील हा जबाबदारीचं आभाळ असतो. अढळ, व्यापक आणि न सांगताही सर्व काही समजून घेणारा. झाडाची उंची मोजता येते पण, त्यांच्या मुळांची खोली मोजता येत नाही, अगदी तशीच कथा माझ्या वडिलांची आहे. माझे वडील युवराज साहेबराव पंडित (व्यवसाय_शिक्षक) ते माझ्या आयुष्याचे आधारवड आहे.

गडगडणाऱ्या वादळात ही स्थिर उभा असलेला न कधी कुरकुरणारा न कधी सावली मागणारा. आज मी मोठी झाली अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्यात. त्या पार पाडत असताना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत चालते; तेव्हा जाणवतं.,!! ‘आई काळजात असते वडील कणखर मणक्यात असतो’, जर माझा मणका अजूनही सरळ आहे तर तो त्यांच्या सरळपणामुळे त्यांच्या न झुकणाऱ्या मूल्यांनमुळे आणि बोलणं कमी जगणं जास्त या त्यांच्या जीवनशैलीमुळे. ते माझ्यासाठी शब्दापेक्षा मोठा अर्थ आहे. खरंच आयुष्यात वडील म्हणजे कधी आधारवड, कधी सावली, कधी उंबरठा आणि कधी कवडसा. वडील हे प्रत्येकाच्या आयुष्यात एक भक्कम आधार तर असतात. तुमचे आशीर्वाद आणि प्रेरणा मला सतत बळ देत राहतात…!!

माझ्या आयुष्यात माझे वडील म्हणजे आधारवड… एक असा वृक्ष, ज्याच्या सावलीत माझं संपूर्ण बालपण विसावलं, आणि ज्याच्या बळावर माझ्या स्वप्नांनी उंच भरारी घेतली. त्यांच्या ओठांवर कधीच कौतुकाचे शब्द नव्हते, पण त्यांच्या डोळ्यांत मात्र माझ्यासाठी हजार शब्दांची मूक प्रेमकथा दडलेली असायची. लहानपणी रात्री मी घाबरून उठले की, आई धावत यायची. पण ती येण्याआधी दाराजवळ वडिलांचा सावकाश उभा असलेला देह मला अधिक सुरक्षित वाटायचा. कधी रात्रभर तापाने फणफणले, तरी त्यांनी सारा दिवस ड्युटी करून रात्री माझ्या पायांना पाणी लावायचं काम तेच करत. त्या काळी वाटायचं, ‘वडील म्हणजे कधी न थकणारा माणूस.’

त्यांच्या जगण्यात ‘स्वतःसाठी’ हा शब्दच नव्हता. त्यांच्या पगाराच्या प्रत्येक रुपायामागे आमचं सुख लपलेलं होतं. त्यांनी कधी स्वतःसाठी नवी वस्त्रं घेतली नाहीत, पण आम्हाला दिवाळीच्या वेळी आनंद वाटावा यासाठी ते स्वतःचे काही शौक गहाण ठेवायचे. वडिलांच्या प्रेमाला न शोभणारी एक विशिष्ट शांतता असते. ती प्रेमाची भाषा असते जी आवाजात नाही, पण कृतीतून व्यक्त होते. शाळेतल्या पहिल्या निबंध स्पर्धेपासून ते आजच्या माझ्या प्रत्येक टप्प्यावर, त्यांच्या डोळ्यांतून मी माझं प्रतिबिंब पाहिलं आहे. ‘अभिमानाचं, समाधानाचं आणि कधी काळजीचं.’

कधी चुकले, घसरले, रडलं… तेव्हा त्यांनी फक्त एक वाक्य उच्चारलं — “उठ, मी आहे ना!” आणि त्या एका वाक्याने जग जिंकल्यासारखं वाटलं. माझ्या प्रत्येक अपयशावर त्यांनी “हेच खरी शिकवण” असं ठामपणे सांगितलं, आणि माझ्या प्रत्येक यशात ते हळूच मागे सरले. आजही त्यांच्या उत्साही देह पहिला वाळलेल्या बोटांतील काळजीचा स्पर्श, आणि दररोजची छोटीशी विचारपूस $हीच माझ्या जीवनाची शिदोरी आहे’.

वडील म्हणजे केवळ ‘बाबा’ नव्हे, ते एक संस्थाच आहेत. ते कधी रडत नाहीत, पण मनात सतत आमचं ओझं वाहून नेतात. ते कधी थकत नाहीत, पण आमच्या स्वप्नांसाठी दिवस-रात्र झिजतात. आणि ते कधी सांगत नाहीत, पण आमच्या प्रत्येक हसऱ्या क्षणामागे त्यांचा त्याग असतो. माझे वडील माझा ‘आधारवड’ — जीवनाच्या वावटळीत मला सांभाळणारा, पावसातही न हलणारा, आणि उन्हात सावली देणारा. त्यांचं मूक प्रेम, त्यांची बांधिलकी, आणि त्यांचं माझ्यावरचं निरपेक्ष प्रेम मला प्रत्येक क्षणी जगायला बळ देतं. आयुष्यात कितीही उंची गाठली, तरी त्यांच्या पायाशी विसावायला मिळणं हेच खरं सुख आहे… आणि त्यांच्या सावलीखाली आयुष्यभर राहणं हेच खरं भाग्य….!!

वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजी नगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे