‘होळीचे बदलते रंग’ : एक चिंतन…!!!
प्रा. कु.अंकिता प्रशांत ठाकरे. सिलवासा, दादरा नगर हवेली

‘होळीचे बदलते रंग’ : एक चिंतन…!!!
फाग, फाल्गुन, फाल्गुनी पौर्णिमा, हुताशनी, होळी, वसंतोत्सव, रंगोत्सव रंगपंचमी किंवा धुळवड…. मराठी वर्षातला हा शेवटचा उत्सव. या निमित्ताने एक आठवतं.
‘जुने जाऊ द्या मरणालागुनि….
जाळूनि अथवा पुरूनि टाका….’
वाईट ते सगळं नष्ट होऊ दे, नवीन चांगलं उजळू दे, रुजू दे, फुलू दे, फळू दे आणि त्याचा आनंद कायम टिकून राहू दे ही प्रार्थना करण्याचा हा दिवस. येत्या एक दोन दिवसात आपण होळी आणि धुलीवंदन दोन्ही सण मोठ्या उत्साहाने साजरे करणार आहोतच. तसं पाहता सर्वच सणांचं स्वरूप काळानुरूप आधुनिक होत आहे याला हे दोन्ही सण कसे अपवाद असणार? होळीचे रंग काळानुसार बदलले, परंतु तिचा आत्मा आजही तोच आहे. ‘वाईटावर चांगुलपणाचा विजय’. नात्यांतील कटुता दूर करून स्नेहाचा रंग भरणे आणि जीवनात नवचैतन्य निर्माण करणे.
‘होळी’ हा शब्द उच्चारला की मनात रंगांची उधळण, हास्याची लय आणि आठवणींची सर येते. लहानपणी होळी म्हणजे, फक्त रंगांचा खेळ, पिचकारीची मजा आणि गोडधोड खाण्याचा आनंद असा माझा समज होता. परंतु आज एक तरुणी म्हणून जीवनाच्या अधिक व्यापक जाणिवांतून या सणाकडे पाहताना मला जाणवते की, ‘होळीचे रंग केवळ बाह्य स्वरूपात नाही, तर सामाजिक आणि मानसिक स्तरावरही बदललेले आहेत’. पूर्वीच्या होळीला साधेपणाचे सौंदर्य लाभलेले होते. गावातील चौकात सगळे एकत्र जमून होळी प्रज्वलित करून मनोभावे पूजा केली जाई. त्या अग्नीज्वाळांमध्ये केवळ लाकूड नव्हे, तर मनातील कटुता, मतभेद आणि अहंकारही जळून राख होत असत. दुसऱ्या दिवशी धुळवडीत फुलांच्या पाकळ्यांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरले जात. त्या रंगांमध्ये निरागसतेचा स्पर्श आणि नात्यांची ऊब दडलेली असे. सण म्हणजे एकमेकांच्या जवळ येण्याचे, मनातील अंतर मिटवण्याचे निमित्त होते.
आजच्या काळात होळीचे स्वरूप बदलले आहे. आजची तरुणाई….. जुने विसरून आधुनिकतेच्या लाटेवर स्वार होताना दिसतेय. आज सणाचे रूप अधिक दिखाऊ झाले आहे. कृत्रिम रंग, मोठ्या ध्वनिक्षेपकांवर वाजणारे कर्णकर्कश संगीत आणि पाण्याची उधळण या सर्वांनी सणाच्या शांत आणि सुसंस्कृत रूपाला मागे टाकल्यासारखे वाटते. आज होळीचे रूप डीजे, रेन डान्स आणि मोठ्या प्रमाणावर आयोजित कार्यक्रम हे आधुनिक होळीचे वैशिष्ट्य झाले आहे. सोशल मीडियामुळे सणाचे प्रदर्शन अधिक वाढले आहे. सोशल मीडियावरचे फोटो, स्टेटस आणि व्हिडिओ यांतून होळी अधिक ‘दिसणारी’ झाली आहे. पण कधी कधी ती ‘जगली’ जात नाही, अशी खंत मनात दाटून येते.
तथापि, या बदलांमध्ये आशेचे रंगही आहेत. अनेक तरुणी आणि तरुण पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा आग्रह धरत आहेत. पाण्याची बचत, सेंद्रिय रंगांचा वापर आणि संयत उत्सव याकडे कल वाढताना दिसतो. समाजातील विविध स्तरांतील लोक एकत्र येऊन सण साजरा करतात. ही एकतेची भावना आजही टिकून आहे, हे समाधान देणारे आहे. ‘होळीचे बदलते रंग मला जीवनाचा धडा देतात’. जसे रंग मिसळले की, नवीन छटा निर्माण होतात, तसेच काळानुसार संस्कृतीत बदल होतात. परंतु या बदलांच्या प्रवाहात परंपरेची मुळं घट्ट रोवून ठेवणे हीच खरी जबाबदारी आहे. सणांचा आत्मा जपणे, त्यामागील तात्त्विक संदेश समजून घेणे आणि त्या संदेशाला आपल्या आचरणात उतरवणे हेच तरुण पिढीचे कर्तव्य आहे.
एक तरुणी म्हणून मला वाटते, “होळीचे खरे सौंदर्य बाह्य रंगांमध्ये नसून अंतःकरणातील निर्मळतेत आहे”. चेहऱ्यावरचे रंग काही क्षणांत धुऊन जातात. पण मनावर उमटलेले प्रेम, स्नेह आणि समतेचे रंग कायमचे ठसतात. म्हणूनच आजच्या बदलत्या काळातही मी अशीच होळी साजरी करू इच्छिते, ‘जिथे रंगांपेक्षा नात्यांना अधिक महत्त्व असेल, दिखाव्यापेक्षा संवेदनांना अधिक स्थान असेल आणि उत्सवापेक्षा मूल्यांची उधळण अधिक असेल’.
कारण खऱ्या अर्थाने होळी तेव्हाच साजरी होते, जेव्हा मनातील अंधार जळून जातो आणि जीवन नव्या आशेच्या रंगांनी उजळून निघते. होळीच्या ज्वालेत जाळायचे असते ते फक्त लाकूड नव्हे, तर मनातील अहंकार. धुळवडीच्या रंगात मिसळायचे असते ते केवळ पाणी नव्हे, तर प्रेम आणि आपुलकी. जर आपण या सणाचा खरा अर्थ समजून घेतला, तर होळी आणि धुळवड हे केवळ परंपरेचे नव्हे, तर आत्मशुद्धीचे आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरतील. शेवटी, रंगांची उधळण क्षणिक असते…पण नात्यांवर चढलेले प्रेमाचे रंग आयुष्यभर टिकतात. म्हणूनच होळी आणि धुळवड साजरे करताना बाह्य रंगांपेक्षा अंतःकरणातील रंग अधिक तेजस्वी ठेवणे हीच खरी सणाची सार्थता आहे.
प्रा. कु.अंकिता प्रशांत ठाकरे.
सिलवासा, दादरा नगर हवेली
============



