शिक्षणसेवेशी भुमेश्वरी सातपुते यांचे ऋणानुबंध; साथ सोडलेल्या शरीराला, मनाची देणगी
रजत डेकाटे, प्रतिनिधी

शिक्षणसेवेशी भुमेश्वरी सातपुते यांचे ऋणानुबंध; साथ सोडलेल्या शरीराला, मनाची देणगी
मालेवाडा येथील शिक्षिकेची प्रेरणादायी जिद्द ; अर्धांगवायूने घेरले, तरी शिक्षणसेवेची आस कायम!
रजत डेकाटे, प्रतिनिधी
मालेवाडा वृत्तसेवा
मालेवाडा : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मनात जिद्द आणि आपल्या कार्याप्रती निष्ठा असेल, तर संकटांवरही मात करता येते. याची प्रचिती भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथील शिक्षिका भूमेश्वरी सातपुते यांच्या जीवनप्रवासातून येते. सप्टेंबर २०१८ मध्ये अर्धांगवायूच्या आजाराने सातपुते यांना अचानक घेरले. या आजारामुळे त्यांच्या शारीरिक क्षमतेवर मोठा परिणाम झाला. त्या दीड ते दोन वर्ष सुट्ट्यावर राहिल्या नंतर त्यांची अर्धांगवायूने घेरलेली परिस्थिती हळूहळू चांगली होऊ लागली. दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, या संकटामुळे त्यांच्या मनातील शिक्षणसेवेची तळमळ मात्र कमी झाली नाही.
शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पेरण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे अध्यापन क्षेत्राशी आणि विद्यार्थ्यांशी त्यांचे असलेले भावनिक नाते आजही कायम आहे. आजारपणामुळे शरीराने साथ सोडली असली तरी मनाने मात्र त्या शिक्षणसेवेशी जोडलेल्या आहेत.
अर्धांगवायूसारख्या गंभीर आजाराचा सामना करताना अनेकांना आयुष्य निराशाजनक वाटू शकते. मात्र भूमेश्वरी सातपुते यांनी परिस्थितीसमोर हार न मानता सकारात्मक विचार आणि जिद्दीने जीवनाचा प्रवास सुरू ठेवला. त्यांच्या या संघर्षातून ‘शरीराला मर्यादा असल्या तरी मनातील ध्येयाला मर्यादा नसतात’ हा संदेश मिळतो.
मालेवाडा येथील शिक्षिका म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेली सेवा आणि आजारपणानंतरही शिक्षण क्षेत्राविषयी कायम असलेली आस्था अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या जिद्दीला आणि शिक्षणाप्रती असलेल्या निष्ठेला परिसरातून कौतुकाची दाद मिळत आहे.



