“नवरंग : स्त्री मनातले”; भाग :8
लेखिका: अनिता व्यवहारे, अहिल्यानगर
“नवरंग : स्त्री मनातले”; भाग :8
रंग आजचा : जाणिवेचा
लेखिका: अनिता व्यवहारे, अहिल्यानगर
नवरात्रोत्सवातील नवरात्रीचा रंग आठवा गुलाबी गुलाबी, दृढ विश्वास घेऊन येते देवी महागौरी मयूरता, सदभावना, सुंदरता, अन् समृद्धीचे प्रतिक शोभते सदोदित महागौरी आपणास शुभाशीर्वाद देते. आजचे महागौरीचे रूप आणि आजचा रंग…: गुलाबी… ” हा रंग आम्हा स्रियांच्या आवडीचा. कारण यातून मनातल्या प्रेम आत्मीयता आणि आपुलकीच्या भावनांच्या विविध छटा प्रतीत होतात.. तसं ही स्त्री मन हे भावभावनांचं मिश्रण असतं!… म्हणून तर जशी वेळ तसे स्वभाव बदलतात त्या… आणि आयुष्याशी तडजोड करतात.. असाच एक प्रसंग..!
काल आमच्या कॉलनीतल्या बायका (अर्थात आम्ही सर्व सख्या )ची भिशी पार्टी होती. रुपाली सोडून आम्ही सर्वजणी हॊतॊ.ती गेल्या सहा महिन्या पासून आलीच नव्हती.. मात्र जेव्हा भिशीला सुरवात केली तेव्हा पहिला नंबर तिनेचं घेतला होता…. पण त्यानंतर आठ दिवसातचं तिच्या कडे मोठा प्रॉब्लेम झालेला…. वडील आजारी… तेव्हा माहेरी आर्थिक मदत करावी लागली… त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात मिस्टरांची कंपनी बंद पडली…. कर्जाचे हप्ते, त्यासाठी जप्ती असं बरंच काही घडून गेले. त्यामुळे थोडी बदनामी वगैरे… म्हणून दोघं उभयंता घराला कुलूप लावून कुणाला ही न सांगता रात्रीचेचं निघून गेले. त्यामुळे आम्हा सर्व मैत्रिणीना काळजी वाटू लागली. आपले 40 हजार बुडणार. सगळ्यांनी रुपाला फोन केले.. कुठे गेली.? काय झालं…? पण कसलाच थांग पत्ता लागला नाही.
सर्व जणी माझ्या घरी येऊन येऊन खूप बडबड करू लागल्या.. मला ही रूपाचा रागच आला… किमान कुणाला तरी सांगून जायचं, असं वाटलं.. प्रत्येक महिन्याला भिशीचा नंबर काढताना प्रत्येक जण तिला कोसत.. काही बाही बोलत .. नाव ठेवीत. आज त्या गोष्टीला सहा महिने झाले होते.. काल ही सर्वांनी खूप बडबड केली होती… मी सुद्धा…..! पण आज सकाळी अचानक काहीही कल्पना न देता ती माझ्या घरी आली… मी ही तिच्याशी जरा आढेवेढे घेतच बोलले…. पाहिजे तितके आस्थेने चौकशी केली नाही… ती जरा शांतच होती. थोड्या वेळाने मी तिच्यासाठी चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये गेले… तिला पाणी दिलं… ती घटाघट पाणी प्याली. मी चहा आणायला आत गेले.. चहा घेऊन येते तर काय? ती गायब…! पुन्हा मला राग आला.. तेवढ्यात माझी नजर समोरच्या टिपॉय कडे गेली… टीपॉय वर एक पाकीट ठेवलेलं होतं…. आणि त्यावर एक चिठ्ठी ठेवलेली होती. मी अगोदर पाकीट उघडून पाहिलं तर काय… त्यात आमचे सर्व चाळीस हजार रुपये व्याजासकट परत केलेले. आणि त्या चिट्ठीत आतापर्यंत तिच्यावर ओढवलेल्या सर्व प्रसंगाबद्दल तिने लिहिलेलं होतं…!
मी तशीच तिला शोधत बाहेर आले.. तर बाहेर ती कुठेच दिसेना.. मग सगळ्या मैत्रिणींना फोन करून बोलावून घेतलं.. सगळ्यांना चिठ्ठी वाचून आणि पैसे पाहून खूप वाईट वाटत होतं…. आपण उगीचच तिला नाव ठेवले. काही बोललो याचा प्रत्येक जण पश्चाताप करत होते … हे सर्व पैसे तिला परत करायचे…. तिची माफी मागायची… तिला या संकटातून बाहेर काढायचा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला… दसऱ्या नंतर तिचा शोध घ्यायचा… तिच्या मिस्टरांचा गेलेला जॉब मिळवून द्यायचा. तिलाही कुठे तरी जॉब शोधून द्यायचा…. असं बरंच प्लँनिंग करून झालं… बहुतेकांच्या डोळ्यात पाणी होते… कुणी हळहळत होतं.. उगीचच तिला नावं ठेवली म्हणून स्वतःला दोष देत होत.कुणी तिची मनोमन क्षमा मागत होतं. हे सगळं पाहून मला आश्चर्य वाटलं.
आजच्या आठव्या माळेचा गुलाबी रंग हाच का…?? जसे या रंगात प्रेम, आपुलकी, आत्मीयता हेच भाव मिसळलेले असतात… तशा आज माझ्या सख्यांच्या मनातले वेगवेगळे रंग मला दिसतं होते… सर्व भावभावनांच मिश्रण इथे पहायला मिळत होतं….! हाच होता आमच्यासाठी आठव्या माळेचा रंग. परिस्थितीची जुळवून घेणारा जाणिवेचा रंग…!!
नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
(क्रमश:)
सौ अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि अहमदनगर
सदस्य मराठीचे शिलेदार समूह



