पाच महिन्यांपासून हिंगणा पोलिसांना गुंगारा देणारा घरफोड्या अखेर जेरबंद
गजानन ढाकुलकर, हिंगणा

पाच महिन्यांपासून हिंगणा पोलिसांना गुंगारा देणारा घरफोड्या अखेर जेरबंद
CCTV, AI अन् गुप्त माहितीचा ‘फॉर्म्युला’ ठरला निर्णायक
हिंगणा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ७ गुन्ह्यांची उकल
गजानन ढाकुलकर, हिंगणा
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर/ हिंगणा, (दि १): शहरातील हिंगणा परिसरात घरफोडी व चोरीच्या घटनांनी डोकेदुखी वाढविणाऱ्या आरोपीला अखेर हिंगणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल ५ महिन्यांपासून सुरू असलेल्या तपासाला अखेर यश आले असून, एका आरोपीच्या अटकेमुळे घरफोडी व वाहन चोरीचे तब्बल ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी ₹२ लाख ४७ हजार ९३३ किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल शिवदास राठोड (वय २४, रा. शिरपूर, ता. खकनार, जि. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) याला हिंगणा परिसरातील देशी दारू दुकान फोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
दारू दुकानाचे दरवाजे तोडून ४१ हजार ६०० रुपयांवर डल्ला
धनगरपुरा रोडवरील व्ही. ए. चानपुरकर यांच्या देशी दारू दुकानाला चोरट्याने लक्ष्य केले. २५ ऑगस्टच्या रात्री दुकान बंद झाल्यानंतर चोरट्याने मुख्य तसेच मागील दरवाज्याची कडी-कोंडा तोडून दुकानात प्रवेश केला. काउंटरमध्ये ठेवलेली ₹ ४१,६०० रोख रक्कम लंपास करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी CCTV फुटेज तपासले. फुटेजमध्ये टोपी, पांढरा-काळा टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या स्लीपर घातलेला संशयित दिसून आला.
CCTVपासून AIपर्यंत तपासाची साखळी
या प्रकरणाचा तपास करताना हिंगणा पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज बारकाईने तपासले. संशयिताची चालण्याची पद्धत, त्याचा वेश आणि उपलब्ध छायाचित्रांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर AI प्रणालीच्या मदतीने मिळालेल्या छायाचित्राचा आधार घेत पोलिसांनी गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढत राहुल राठोड याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून इतर चोरीच्या घटनांची माहिती समोर आल्याने पोलिस तपासाला मोठे यश मिळाले.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दुचाकी जप्त
या कारवाईत ₹ ३९,८०० रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, चांदीच्या विविध वस्तू तसेच Honda Unicorn दुचाकी जप्त करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹ २,४७,९३३ असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, नथ, कानातले, सोन्याचे नाणे, चांदीचे पैजण, चांदीचा चमचा, समई, चांदीचे प्याले, कुंकवाचा करंडा आदी वस्तूंचा समावेश आहे.
DCP ऋषिकेश सिंगा रेड्डी यांच्याकडून हिंगणा पोलिसांचे कौतुक
या कारवाईबाबत परिमंडळ क्रमांक १, नागपूर शहरचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश सिंगा रेड्डी यांनी हिंगणा पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस आयुक्तश्री विश्वास नागरे पाटील, मा. सह पोलिस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी मा. अपर पोलिस आयुक्त दक्षिण विभाग श्री. वसंत परदेशी सहाय्यक पोलिस आयुक्त एमआयडीसी विभाग श्री यशवंत नलावडे नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या तपासाला अखेर यश मिळाल्याबद्दल उपायुक्त रेड्डी यांनी हिंगणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
जितेंद्र बोबडे यांच्या पथकाची कामगिरी
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संतोष राठोड तसेच पोलीस कर्मचारी कैलास चव्हाण, अरुण कांबे, अतुल तलमले, कार्तिक हेडाड, अनिल झाडे आणि प्रणित बंड यांनी केली.
पाच महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या चोरट्याचा अखेर पर्दाफाश झाल्याने हिंगणा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. CCTV, तांत्रिक तपास, AI प्रणाली आणि गुप्त माहितीचा अचूक मेळ साधत हिंगणा पोलिसांनी केलेली ही कारवाई कौतुकास्पद ठरली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू आहे.



